अगा करुणाकरा करितसें – संत तुकाराम अभंग – 1140
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥
ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥
मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥
उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥
उरलें तें एक हेंचि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥
तुका म्हणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥
अर्थ
हे करूणाकरा मी तुझा मनापासून धावा करत आहे त्यामुळे तुम्ही लवकर धावत या आणि मला या भवसागरातून सोडवा. माझी करूण वचने ऐकून माझ्या भेटीकरिता उतावीळ व्हावे .देवा मी मागेपुढे पाहिले तर मला तुमच्या वाचुन सर्व ओस दिसले त्यामुळे मी तुमच्या चरणावर माझा भक्तीभाव अर्पण करून आता तुमची वाट पाहत आहे. विठ्ठला मायबापा तुम्ही आता माझ्या भेटी करता थोडा देखील उशीर करू नका माझ्यासाठी आता तुमच्या भेटीवाचुन काहीच उरले नाही .आणि या जगाविषयी श्युन्य मत माझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुम्ही एवढेच करा की तुमचे विटेवरचे समचरण मला लवकर दाखवा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
अगा करुणाकरा करितसें – संत तुकाराम अभंग – 1140
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.