उंचनिंच नेणे कांहीं – संत तुकाराम अभंग – 1135
उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥
दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥
चर्म रंगूं लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेले विणी ॥२॥
सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥
नरहरीसोनारा घडु फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी ॥४॥
नामयाची जनी सवें वेची सेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥५॥
नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥६॥
अर्जुनाचीं रथीहोय हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे ॥७॥
गौळियांचे घरीं अंगें गाई वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥८॥
यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥९॥
मिराबाई साठी घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥१०॥
घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी ॥११॥
पुंडलिकासाठी अझूनि तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१२॥
अर्थ
भक्त उच्च जातीचा आहे की नीच जातीचा आहे हे काहीही भगवंत पाहत नाही तर त्याची शुद्ध भक्तिभाव पाहूनच देव त्याचे कार्य करण्यास तत्पर असतो. विदुर दासीपुत्र आहे तरी देवाने त्याच्या घरी कण्या खाल्ल्या आणि दैत्याच्या म्हणजे हिरण्यकश्यपूचा घरी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. रोहिदासांच्या मागे कातडे रंगू लागला तर कबीरांच्या मागे शैले विनवू लागला. सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला तर सावतामाळी बरोबर त्यांचा मळा खुरपु लागतो. नरहरी सोनार यांच्याबरोबर भट्टी फुकून सोने घडू लागला तर चोखा महारा बरोबर त्यांची मेलेली ढोरे ओढू लागला. नामदेवांची दासी जनी हिच्याबरोबर गौर्या वेचु लागला .आणि धर्मराजाच्या घरी पाणी वाहून त्याची घरे झाडली ,नामदेवां सोबत जेवण्यासाठी देवाने कोणताही संकोच धरला नाही आणि ज्ञानदेवा साठी याने भिंत चालवली. अर्जुनाच्या रथावर हा देव सारथी म्हणून स्वार झाला आणि गरीब सुदाम्याचे पोहे याने आवडीने सेवन केले .नंदराजाच्या घरी याने गायी वळल्या आणि बळीराजाच्या दाराचा हा भगवंत द्वारपाल झाला .एकनाथांच्या घरी भक्तीचे ऋण फेडण्या करिता त्याने गंगेचे पाणी कावडीने आणले आणि अंबरीश राजासाठी देवाने दहा गर्भवास सोसिले. ज्यावेळी मिराबाई ला विष दिले गेले त्यावेळी तिला जगविण्यासाठी देवाने स्वतःला ते विष प्राशन केले आणि दामाजीपंतांच्या हुंडीची भरपाई करण्याकरता देवच पाडेवार झाला. गोरोबाकाकांच्या बरोबर गाडगे तयार करू लागला आणि त्यासाठी डोक्यावर मातीही वाहू लागला आणि नरहरी मेहत्याची हुंडी देवाने स्वतः भरली .तुकाराम महाराज म्हणतात भक्त पुंडलिकासाठी हा देव अजूनही तिष्ठत उभा आहे ही त्याची कथा धन्य आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
उंचनिंच नेणे कांहीं – संत तुकाराम अभंग – 1135
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.