कैं वाहावें जीवन – संत तुकाराम अभंग – 1134
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥
जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥
कैं भौज्य नानापरी । कैं कोरड्या भाकरी ॥२॥
कैं बसावें वाहनीं । कैं पायीं अनवाणी ॥३॥
कैं उत्तम प्रावर्णे । कैं वसनें तीं जीर्णे ॥४॥
कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥
कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥
तुका म्हणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥
अर्थ
अहो कधी आपल्या प्रारब्धानुसार डोक्यावर पाणी वाहण्याची वेळ आली तर पाणी देखील वहावे तर कधीकधी सुखाने पलंगावर झोपावे. जशी वेळ येईल त्याप्रमाणे बदल करून घ्यावे. कधीकधी विविध प्रकारचे पंचपक्वान्न खावे तर कधीकधी प्रारब्धाने कोरड्या भाकरी मिळाल्या तर त्या देखील खाव्यात. कधी चांगल्या प्रकारच्या वाहनात(बैल गाडी घोडे हत्ती) बसून फिरावे तर कधी अनवाणी पायी देखील जाण्याची वेळ आली तर चालावे. प्रारब्धानुसार आपल्याला जर चांगल्या प्रकारचे वस्त्र मिळाले तर कधी ते घालावे तर कधीकधी जीर्ण फाटलेले वस्त्र देखील घालण्याची वेळ आली तर घालावे. कधी संपत्तीचा भोग घ्यावा तर कधी विपत्तीचा देखील भोग घ्यावा. कधीकधी संत सज्जनांची संगती मिळते तर कधी कधी दुर्जनांशी गाठ भेट पडते. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानी लोक तेच जाणावे की ज्यांना सुख आणि दुःख हे सर्व समान आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कैं वाहावें जीवन – संत तुकाराम अभंग – 1134
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.