तरुवर बीजा पोटीं – संत तुकाराम अभंग – 1119
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा शेवटीं ॥१॥
तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥
उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥
तुका म्हणे बिंबछाया । ठायीं पावली विलया॥३॥
अर्थ
बीजातून वृक्ष फळाला येतो आणि शेवटी वृक्षातूनच त्याचे पुन्हा बीज उत्पन्न होते, हे देवा तुझे माझे देखील तसेच आहे, म्हणजेच तुझ्यातून मी जन्माला आलो आणि माझ्यातून तू, म्हणजेच माझ्यात तू आता इतका सामावला आहेस की माझा मीपणा जाऊन, द्वैत जाऊन शेवटी तूच राहणार आहेस.ज्याप्रमाणे पाण्यापासूनच तरंग निर्माण होतात आणि शेवटी ते पाण्यातच सामावतात.म्हणजेच तरंग उदकापासून वेगळे नसून त्या पाण्याचे अंगचं आहे.
तुकाराम महाराज म्हणतात ज्याप्रमाणे छाया जशी ज्या बिंबापासून निर्माण होते आणि शेवटी ती त्या बिंबातच विलीन पावते.म्हणजेच कितीही अशा गोष्टींमध्ये दुजेपण किंवा वेगळेपण दिसून आले तरी शेवटी ते एकच असतात हे कळून येते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तरुवर बीजा पोटीं – संत तुकाराम अभंग – 1119
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.