केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दान सत्यत्वेशीं । नेईन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥
ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥
अर्थ
मी अशी प्रतिज्ञा म्हणजे निश्चय केला आहे की मी त्या पंढरीराया ला त्याच वेळी दान मागेल ज्यावेळी हा पंढरीनाथ मला मूळ पाठवून त्याच्याकडे पंढरीला बोलवेन. त्यावेळी मी मला जे हवे आहे ते मागेन. तोपर्यंत मी माझे पोट भरण्याचे काम करेन .आजपर्यंत मी मला हे नको ते नको असा व्यर्थ बोभाटा केला आहे त्यामुळे मला परमार्थाची खरी वाट सापडली नाही व मी स्वैर पणाने फिरत होतो .जो आपल्या स्वामी चा आदर करतो स्वामी त्याच्यावर कृपा करतात. स्वामी ने केलेल्या आज्ञेचे पालन केल्यावर स्वामीच्या मित्रत्वाचा अनुभव येतो .तुकाराम महाराज म्हणतात आता माझा माय बाप पांडुरंग याच्या सत्तेने जे घडायचे असेल ते घडो आता त्यात कसली चिंता मी करणार आहे मी आता केवळ पंढरीला जाण्याची वाट पाहत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.