सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥
भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
म्हणोनि विवेकें । कांहीं करणें ते निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
अर्थ
सर्व भूतमात्रांना अन्न जरूर खायला द्यावे परंतु धन देतांना विचार करून द्यावे. जेथे बीज टाकल्यावर उत्कृष्ट प्रकारे ते बीज उगवेल तेथेच बीज टाकावे. दया बुद्धीने सर्पाला जर दूध पाजले तर ते पुण्य होत नाही तर पाप होते .अघोरी मंत्र जप केले तर पाप होते आणि दुःख विकत घेतल्या सारखे होते. भूमी सर्वत्र एकच आहे पण तिचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजेच माळ जमीन, काळी जमीन, उत्तम जमीन, मध्यम जमीन, कनिष्ठ जमीन असे वेगवेगळे जमिनीचे भेद आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कोणतेही कर्म करताना विवेकबुद्धीने कर्म करावेत ते केव्हाही चांगलेच जसे मिष्टांन्न आहे पण त्याला चवच नाही तर ते फिके आहे म्हणजे ते जेवणार्याला आवडत नाही ते अन्न चविष्ट नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.