न कळे तें कळों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
न दिसे तें दिसों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
न बोलों तें बोलों येईल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
न भेटे तें भेटों येईल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
अलभ्य तो लाभ होईल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
तुका म्हणे जीव आसक्त सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
अर्थ
श्रद्धेने विठोबाचे नाम घेतले की न कळणाऱ्या गोष्टीही आपोआप कळतात. जे काही अदृष्य स्वरूपात आहे तेही दिसू लागते केवळ विठोबाचे नाम स्मरण केले तर. जे बोलण्यासाठी अवघड आहे ते वेदार्थही आपण सहज बोलू शकतो केवळ विठ्ठलाचे नामस्मरण मनापासून करण्याची आवश्यकता आहे. ज्याची भेट ही अशक्य आहे त्यांची भेट ही आपोआप होईल ते केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने .अलभ्याचाही लाभ पुष्कळ होईल ते केवळ विठोबाचे नामस्मरण निरंतर आपल्या वाचेने केल्यानेच .तुकाराम महाराज म्हणतात जे लोक या भवसागरात आसक्त झालेले आहेत ते मनोभावे विठोबाचे नामस्मरण करतील तर ते देखील तरुण जातील.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.