हरी तूं निष्ठुर निर्गुण – संत तुकाराम अभंग – 108
हरी तूं निष्ठुर निर्गुण ।
नाहीं माया बहु कठिण ।
नव्हे तें करिसी आन ।
कवणें नाहीं केलें तें ॥१॥
घेऊनि हरीश्चंद्राचें वैभव ।
राज्य घोडे भाग्य सर्व ।
पुत्र पत्नी जीव ।
डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा वियोग ।
विघडिला त्यांचा संग ।
ऐसें जाणे जग ।
पुराणें ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती ।
कृपाळु दया भूतीं ।
तुळविलें अंतीं ।
तुळें मास तयाचें ॥३॥
कर्ण भिडता समरंगणीं ।
बाणीं व्यापियेला रणीं ।
मागसी पाडोनी ।
तेथें दांत तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वें उदार ।
जेणें उभारिला कर ।
करूनि काहार ।
तो पाताळीं घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरीं ।
धरणें मांडिलें मुरारी ।
मारविलें करीं ।
त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥
तुज भावें जे भजती ।
त्यांच्या संसारा हे गति ।
ठाव नाहीं रे पुढती ।
तुका म्हणे करिसी तें ॥७॥
अर्थ
हे हरी, तू फार कठोर आहेस तू निर्गुण, निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस, कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस .सत्यवचनि राजा हरीश्चंद्राला त्याच्या पत्नी व् पुत्रा पासून दूर केलेस, त्याचे राज्य वैभव हिरावुन घेतलेस, त्याला डोंबाघरी पाठविलेस .पुराणात संगीतल्या प्रमाणे नल-दमयंतीच्या प्रेमसंमंधात विघ्न आणून नल-दमयंतीचा वियोग घडून आणलास .कृपाळू, दयाळु शिबिराजाला स्वतःच्या मंडीचे मास कापायला लाउन त्याची परीक्षा घेतलीस .दानशुर कर्ण समरांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दांत मागितलेस .ज्या बलिराज्याने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिल , त्याला कपटिने पाताळात गाडलेस .श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागीतलेस .तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हरी तूं निष्ठुर निर्गुण – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.