हरीजनाची कोणां न – संत तुकाराम अभंग – 1061
हरीजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥१॥
रूपा येऊनियां धरी अवतार । भक्तं अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥
दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जाळित फिरे ॥२॥
द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥३॥
न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । दुराविला सखा बळिभद्र ॥४॥
तुका म्हणे अंगीं राखिली दुर्गंधी । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥५॥
अर्थ
हरीभक्तांची कोणीही निंदा करु नये कोणाकडूनही त्याची निंदा घडू नये आणि जर तसे झालेच तर ते गोविंदाला सहनच होत नाही. हा गोविंद भक्तांकरता अवतार धारण करतो आणि भक्तांना अभय देतो आणि दुष्टांना कष्ट देतो भय देतो. दुर्वास ऋषी अंबर ऋषींना छळण्याकरता आले पण हे भगवंताला सहन झाले नाही त्या हरीने आपले सुदर्शन त्यांच्या पाठीशी लावले व ते सुदर्शन त्यांना पीडा देत फिरु लागले. कौरवांनी भरसभेत द्रौपदीचा अपमान केला त्यामुळे या श्रीपती भगवानाला ते सहन झाले नाही ते रागावले व त्यांनी पांडवांना साहाय्य करुन या कौरवांची मदनशांती केली. ब्रभू हा पांडवांचा शत्रू होता ते हरीला सहन झाले नाही आणि आपल्या मोठया बंधूचे म्हणजे बलरामदादाचे दुर्योधनावर प्रेम होते असे असले तरी युध्दाच्या काळी हरीने बलरामदादाला योजना करुन तीर्थयात्रेस पाठवले व कौरवांचा नाश केला. तुकाराम महाराज म्हणतात, “अश्वत्थाम्याने गुपचूप हल्ला करुन पांडवांच्या पाचही पुत्रांचा वध केला त्यामुळे या भगवंताने त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील मणी काढून त्याच्या सर्व अंगाला दुर्गंध येईल असे केले.”
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हरीजनाची कोणां न – संत तुकाराम अभंग – 1061
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.