ज्ञानियांचे घरीं चोजवितां – संत तुकाराम अभंग – 1040
ज्ञानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥१॥
म्हणोनियां अवघे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥
वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥२॥
पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥३॥
आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥४॥
तुका म्हणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥५॥
अर्थ
ज्ञानी मनुष्याच्या घरी मी देव पाहाण्यास गेलो तर मला तेथे फक्त शब्दज्ञानाचा अहंकार त्याच्या पाठी लागलेला आहे असे दिसले. म्हणूनच देवा आता मी सर्व उपाय टाकून दिलेले आहेत आणि तुझे पाय दृढ धरलेले आहे. वेदपठन करणारे पंडीत वाचक यांच्यामधे जाऊन पाहिले तर ते त्यांचे मत मांडतात व प्रत्येकाचे मत वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे एकमेकांमधे मत मिळत नाही. हरीभक्तीमध्ये भक्तीभाव कसा असतो आत्मनिष्ठा त्यांची कशी असते हे पाहाण्याकरीता गेलो पण तेथे सारा त्यांचा दंभ स्वैराचार चेष्टा हे विपरीत प्रकार दिसून आले. योगी यांच्याकडे गेलो तर समाधी स्थितीने शांत ते झाले नाही असे मला दिसले तर याउलट ते लोकांवरच गुरगुर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “म्हणून हे विठ्ठला मला या सर्वांचे परीक्षण केल्यानंतर यापैकी कोणाचाही अंकीत करु नकोस.”
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ज्ञानियांचे घरीं चोजवितां – संत तुकाराम अभंग – 1040
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.