सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥
तुका म्हणे होय भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥
अर्थ
सर्व भेद अभेद बाजूला सारुन हरीचे नाम प्रेमाने उच्चारावे हीच खरी हरीची सेवा आहे. हरीचे नाम घेण्याकरता कोठे बाहेर यावे जावे लागत नाही फक्त घरी बसूनच हरीचे नाम घेतल्याने सर्व लाभ होतात. देवाचे नाम हेच गंध, पुष्प, अलंकार सर्व साधने पूजेचे साधने समजून देवाच्या शीरावर अर्पण करावेत. तुकाराम महाराज म्हणतात, “हा देव केवळ भक्तीभावानेच संतुष्ट होतो म्हणजे हरीनाम घोष चालू आहे तेथेच हा हरी राहात असतो.”
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.