परमार्थी तो न म्हणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥१॥
थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥
पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥२॥
तुका म्हणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥३॥
अर्थ
जो परमार्थी आहे, ब्रम्हनिष्ठ आहे, हरीभक्त आहे त्याला आपण कोणतेही नाते जोडू नये त्याला आपला म्हणू नये त्याच्याशी लहान असला म्हणून त्याची अवहेलना करु नये कारण त्याचा अधिकार मोठा असतो. अग्नीची ठिणगी थोडी लहान जरी असले तरी लाकडाच्या संयोगाने ती मोठया अग्नीत रुपांतर करते त्याचप्रमाणे हा परमार्थी मनुष्य लहान जरी असला ज्ञान आणि भक्तीच्या साहाय्याने तो मोठा अधिकारी असतो. ज्याच्या अंत:करणात नित्य देव वसलेला असतो अश्या पुत्राला बापानेही नमस्कार करावा. तुकाराम महाराज म्हणतात, “खापराच्या भांडयामध्ये नवनीत म्हणजे लोणी असेल तर त्या खापराला सुध्दा आपल्या डोक्यावर वाहावे लागते. जरी ते खापर मातीचे असले तरीही तसेच त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे ब्रम्हनिष्ठ माणसाला परमार्थामध्ये किंमत असते त्यामुळे त्याचा देह, वय, कुळ, जात ही जरी हीन असली तरी तो सर्वांना पूज्य आहे.”
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.