नव्हें हो गुरुत्व मेघवृष्टिवाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥१॥
आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥
देहपिंड दान दिला एकसरें । मुळिचें तें खरें टांकसाळ ॥२॥
तुका म्हणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥३॥
अर्थ
हे लोकांनो मी कोणालाही माझा गुरु पणा दाखविण्यासाठी उपदेश वाणी करत नाही तर मेघवृष्टी ज्या प्रमाणे सर्वाना सारखीच होते त्याप्रमाणे सर्वांना माझी उपदेश वाणी मी सांगत आहे तुम्हा संत जणांना ऐकावी.माझे शब्द बोबडे जरी असले तरी ते देवाचेच आहे आणि मी जे काही बोलतो आहे ते तोच मला बोलवीत आहे.मी माझा देह या हरीला केव्हाच अर्पण केलेला आहे त्यामुळे मी जे काही बोलतो आहे ते सर्व हा हरीच बोलत आहे कारण तो माझ्याशी एकरूप झालेला आहे आणि मी जे काही बोलतो ते शब्द माझ्या टाकसाळीतून बोलत आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून हरिनाम रुपी नवनीताचा झरा स्रवत आहे आणि जे कोणी हे नवनीत सेवन करीन ते तृप्त होतील समाधानी होतील.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.