मानी भक्तांचे उपकार – संत तुकाराम अभंग – 1006

मानी भक्तांचे उपकार – संत तुकाराम अभंग – 1006


मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वर्णितां ॥१॥
म्हणोनि जया जे वासना । ते पुरवितो पंढरिराणा । जाला भक्तांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥
अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भक्तींचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥२॥
म्हणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भक्तीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥३॥
अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवढे भक्तीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥४॥
पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥५॥
भावभक्तीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । म्हणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥६॥

अर्थ

हा देव आपल्या भक्तांचा उपकार निरंतर मानत असतो आणि तो त्याभक्तांचा निरंतर ऋणी आहे असेही म्हणतो.कारण भक्ताने हा निर्गुणनिराकार आहे त्याला आपल्या मुखाने त्याची कीर्ति वर्णन करून सगुण साकार केले आहे.म्हणूनच त्याच्या भक्तांना जी काही मना मध्ये इच्छा आहे ती सर्व इच्छा आहे हा पंढरीराणा पूर्ण करतो.व भक्तांचे हे ऋण फेडण्याचा करता तो भक्तांचा पोसना दास झालेला असतो.अंबऋषीला वाचवण्याकरता त्याला मिळालेल्या शापामुळे या नारायणाने त्याचा शाप स्वतःवर घेऊन अनेक जन्म घेतले आहे.भक्तांनी केलेल्या सेवेमुळे तो त्यांच्या दासांचाही आणि दास होतो.भक्ताने कोणतेही काम सांगितले तरीही तो त्याची लाज बाळगत नाही म्हणूनच तर तो पाताळामध्ये बळीचा द्वारपाल म्हणून उभा आहे.तो त्याच्या भक्तांच्या भक्तीचा आभारी आहे त्यामुळे भक्तांचे घर सोडून कुठेही एक दुसरीकडे कडेला तो जात नाही.सर्वेश्वर अर्जुनाचा रथांच्या घोड्यांची काळजी घेतो कारण अर्जुनाने भक्ती केली आहे त्यामुळे या रथाचे घोडे वागवितो त्यांना लागणारा चारा खरारा सर्वकाही हा सर्वेश्वर करतो.भक्तांच्या भक्तीचे हाइतके उपकार मानतो की तो सतत त्या भक्तांच्या मागे मागे फिरतो.भक्तांची तो तेवढी काळजी घेतो अर्जुनाने त्याची भक्ती केली म्हणूनच तर तो त्याच्या मागे मागे फिरतो त्याच्या घोड्यांचा चारा खरारा वगैरे इत्यादी करतो.हा हरी पुंडलिकाच्या दारामध्ये त्याने फेकलेल्या विटेवर त्याचे समचरण घेऊन उभा आहे.हा हरी कमरेवर त्याचे दोन्ही कर ठेवून वीटेवर उभा आहे तेथून तो कोठेही जात नाही.तुकाराम महाराज म्हणतात हा देव भक्तीचा अंकित आहेम्हणूनच तर त्याला दीनानाथ हे नाव शोभते.म्हणूनच तर मी त्याचे दोन्ही चरण धरून निवांत राहिलो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

झुंजार ते एक विष्णुदास – संत तुकाराम अभंग – 1006

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.