काय एकां जालें तें कां – संत तुकाराम अभंग – 1003

काय एकां जालें तें कां – संत तुकाराम अभंग – 1003


काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥
देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥
काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥२॥
कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥३॥
कां हें आवडलें प्रियापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥४॥
कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न म्हणती ॥५॥
काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥६॥
काय करिती हे बांधलिया काळें । तुका म्हणे बळें वज्रपाशीं ॥७॥

अर्थ

या संसाराची संगती करून एकेकाची काय दुर्दशा झाली आहे हे लोकांना ठाऊक नाही काय?या लोकांना काय काय म्हणून समजून सांगावे?या संसाराची दुर्दशा हे डोळ्यांनी पाहतात कानाने ऐकतात आणि पुराणात काय सांगितले आहे हे ही त्यांना माहीत आहे.हे शरीर खरे आहे की जाणार आहे हेही सगळ्यांना माहीत आहे.आपले स्वहित कशात आहे हे सगळ्यांना का बरे करू नये आणि बालक व तारुण्य वृद्धावस्था यामध्ये किती दोष आहेत हेही सर्वांना माहीत आहे.आप्तइष्ट हे यांना इतके का आवडले आहेत अखेरीस कोणी कोणाच्या कामाला आले आहे काय?हा उत्तम असा जन्म या लोकांनी का बरे वाया घातला आहे का बरे हे लोक राम राम म्हणत नाहीत?कित्येक लोकं मरताना हे पाहत असतात तरीही या लोकांना या संसाराच्या शाश्वत पानाचा भ्रम पडलेला का आहे?तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपल्या बलाने या लोकांना वज्रपशाशी बांधले तर हे लोक काय करतील.त्यामुळे नेहमी हरिभजन करावे असे महाराज सांगतात व हरिभजन केल्यानेच आपण तरू शकतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय एकां जालें तें कां – संत तुकाराम अभंग – 1003

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.