देवाच्या प्रसादें करा रे भोजन – संत तुकाराम अभंग – 10
देवाच्या प्रसादें करा रे भोजन ।
व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट ।
नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र ।
अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
इच्छादानी येथें वळला समर्थ ।
अवघेंचि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं ।
पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें ।
कामारीसांगातें निरुपम ॥५॥
अर्थ
संतसज्जनांच्या उच्छिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्ममार्गातील अधिकारी व्हाल .देवादिकांनाही न मिळणार हे उच्छिष्ट कनिष्ट मानु नका .सर्वांना पुरुन उरेल इतका ज्ञानरस ईथे भरला आहे, त्याचा सेवन करण्याचा अधिकार येथे सर्वांना आहे .जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पूरविणारा इच्छादानी विठ्ठल येथे सर्वांची नमोकामना पूर्ण करीत आहे .या प्रसादाच्या सेवनात जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा आहे, त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते . तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी तयार करते तिच्याच हातून या भोजनाचा लाभ व्हावा.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देवाच्या प्रसादें करा रे भोजन – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.