संगमेश्वर मंदिर सुपा
नगर पुणे रस्त्यावरील सुपे हे ऐतिहासिक गाव मध्ययुगीन काळात जहागिरीचे गाव म्हणून ओळखले जात असे. मराठयांच्या इतिहासात पुणे जिल्ह्यातील सुपे, चाकण, इंदापूरला जेवढे महत्त्व तेवढच नगर जिल्ह्यातील सुपे गावाला महत्त्व होते. या गावाला १६ व्या शतकाची उज्वल परंपरा आहे. गावात नगर-पुणे हमरस्त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला ऐतिहासिक सुंदर, संगमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. (संगमेश्वर मंदिर सुपा)
संगमेश्वराचे मंदिर दोन ओढयांच्या संगमावर बांधण्यात आले आहे. त्याचे संपूर्ण बांधकाम दगडी असून अतिशय रेखीव आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. मंदिरातील गाभाऱ्यात एक शिवलिंग व समोर चौथऱ्यावर रेखीव नंदी आहे. मंदिरावर पंचधातूचा साडेचार फूट उंचीचा मुख्य कळस व इतर छोटे-मोठे २६ कळस गतवर्षी बसविले आहेत. मंदिराच्या शेजारी एक सती मंदिरही आहे. समितीच्या वतीने याही मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आता आहे.
ref: discovermh