पारनेर हे गाव अहमदनगर जिल्हयातील एक ऐतिहासिक शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. पारनेर तालुका तसा प्रसिद्ध आहे तो राळेगणसिद्धी व हिवरेबाजार सारख्या प्रगत गावांमुळे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी. पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वसिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचेता श्री वेद व्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषि, पारनेर शहरामध्ये महादेवाची बारा ज्योर्तिलिंग आहेत त्यामुळे पारनेर शहराला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरमध्ये राम मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर अशी काही प्राचीन मंदीरेही आहेत. सिद्धेश्वर मंदिर, पारनेर,
पारनेर शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या, त्यातील एक घंटा येथे असून ही घंटा एका चतुष्कीच्या बांधकामात टांगलेली आपल्याला दिसून येते. सध्याचे मंदिर हे पेशवे काळातील आहे परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तीचे अवशेष तसेच तेथील चतुष्की हे सगळ पाहिल्यावर कदाचित जुने मंदिर यादव काळातील असावे अस वाटते. पुढे कदाचित परकीय आक्रमणात ते पडले आणि मग पेशवे काळात त्याची उभारणी पुन्हा झाली असावी.
जवळच मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा दिसून येते. त्याच्या पुढे पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या सध्या असणाऱ्या मंदिरांता रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते. मंदिर हे अत्यंत साधे असून आतमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला आवारात गणपती, विष्णु, शंकर पार्वती यांच्या जुन्या मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. कदाचित प्राचीन मंदिरात या मूर्ती असाव्यात असे वाटते. मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हाददायक असा असून पावसाळ्यात तर येथील सौंदर्य पाहण्याजोगे असते.