अहमदनगर जिल्ह्यात नगर दक्षिणेला ३० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात साधारणत पाच हजार लोकवस्ती असणारे गुंडेगाव हे ऐतिहासिक गाव वसले आहे. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात प्रवेश केल्यानंतर अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा आपल्याता जागोजागी आढळतात. गावात मरगळनाथ व रामेश्वर ही दोन यादवकालीन मंदिरे उभी असून गावापासून जवळच शुढळेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर उभे आहे. गावातून वाहणारी शुद्धला नामक नदीच्या नावावरून येथील शिवलिंगाला शुद्धळेश्वर हे नाव प्रचलित झाले असावे. (शुद्धळेश्वर महादेव मंदिर, गुंडेगाव)
शुद्धलेश्वर महादेवाचे मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना दिसून येते. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून रंगरंगोटी करून कळस व सभामंडप नव्याने बांधण्यात आला आहे. मंदिराचा सभामंडप चार स्तंभावर तोललेला असून यादवकालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य असलेला उलटा नाग आपल्याला स्तंभावर दिसून येतो. अंतराळात नंदी तर गर्भगृहात दक्षिणोत्तर शिवलिंग विराजमान आहे. गर्भगृहात नागशिल्प, श्री गणेश व एक झीज झालेली मूर्ती आपापल्या दिसते.