श्रीराम मंदिर पारनेर
पारनेर हे गाव अहमदनगर जिल्हयातील एक ऐतिहासिक शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी, पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वसिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचेता श्री वेद व्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषि पारनेर शहरामध्ये महादेवाची बारा ज्योर्तिलिंग आहेत त्यामुळे पारनेर शहराला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरमध्ये राम मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर अशी काही प्राचीन मंदीरही आहेत. श्रीराम मंदिर पारनेर.
पारनेर बसस्थानकावरून काही अंतरावर रस्त्याच्या कडेलाच एका जुन्या वाड्याची बाह्य भिंत आपल्याला उभी दिसते. याने रस्त्याची एक बाजूच तयार झाली आहे. बाहेरून ही वाड्याची भिंत जरी वाटत असली तरी आत मध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांचे प्रशस्त दगडी मंदिर आहे. मंदिर पेशवेकालीन असून ‘फडणीस यांच्या खाजगी मालकीचे आहे. ते सध्या पुण्याला असतात. तिथे राहणान्या एक आजी मंदिराची काळजी घेतात.
मंदिराचा गाभारा मोठा प्रशस्त आहे. मंदीर संपूर्ण दगडी असून कळसाचा भाग चुन्यात बनवला आहे. पुढे सभामंडप असून तो अलिकडे बांधलेला असावा. मंदिराच्या भिंती फार कलाकुसर किंवा नक्षीकाम नसलेल्या आहेत. पीठावर काही ठिकाणी गजशिल्प दिसून येतात. गर्भगृहात राम, लक्ष्मण व सीता यांच्या शाळीग्राम शिळेतील सुंदर मुल्य असून या मूर्त्याच्या खाली संगमरवरी विष्णू मूर्ती आहे. देवकोष्टकात दास मारुतीची एक स्थानक मूर्ती देखील आपल्याला दिसून येते.
पारनेर तालुका ऐतिहासिक वास्तूंनी, मंदिरांनी समृद्ध आहे. तेव्हा पारनेर तालुक्याच्या भटकंतीत शहरातील श्रीराम मंदिर व जवळच असणारे संगमेश्वर व सिद्धेश्वर या प्राचीन मंदिरांना देखील आवर्जून भेट द्या. आपता एक ऐतिहासिक वारसा पाहिल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल.