श्री नागेश्वर मंदिर पारनेर – shri nageshwar mandir parner

श्री नागेश्वर मंदिर पारनेर

पारनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक गाव असून तालुक्याचे ठिकाण आहे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी. पराशर ऋषींच्या नावावरूनच पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वसिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचेता श्री वेद व्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषि पारनेर शहरामध्ये महादेवाची बारा ज्योर्तिलिंग आहेत त्यामुळे पारनेर शहराला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथे अनेक पुरातन मंदिरेही आहेत.

पारनेर बसस्थानकापासून थोडयाशा अंतरावर नागेश्वर गल्लीत श्री नागेश्वर मंदिर व पुरातन दगडी बारव आपल्याला दिसून येते. मंदिर पुरातन असून मंदिराला रंगरंगोटी व जीर्णोध्दार केल्यामुळे त्याचे मूळ सौंदर्य हरवले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते.

मंदिराच्या प्रवेशद्वारावर चौकटीत महिषासुरमर्दिनीचे शिल्पं असून सभामंडपात श्री गणेशाच्या तीन सुरेख मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर छोट्याशा चौथऱ्यावर नंदी व नंदी शेजारी नागशिल्पे आपल्याला दिसून येतात.

मंदिराच्या डाव्या बाजूस पूरातन बारव आपल्याला पाहायला मिळते. पराशर ऋषींच्या पावन पारनेर पंचक्रोशीतील बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक नागेश्वर मंदिर आहे. पारनेरकरांचं हे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या शेजारी पेशवेकालीन श्रीराम मंदिर देखील आपल्याला पाहता येते.

ref: discovermh