श्री कनकेश्वर देवस्थान मापगांव
सुमारे ४५० पायऱ्यांची दमछाक करणारी चढण चढून नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आपण पहिल्यांदा पोहोचतो पालेश्वराच्या छोटेखानी देवळाजवळ तिथुन काही शे पायऱ्या पुढे गेल की गर्द झाडीत चहुबाजुने पायऱ्या व प्रवेशद्वारे असणाऱ्या विशाल ब्रह्मकुंडापाशी पोहोचतो. तिथेच मिशीवाल्या मारुतीरायाची सौष्ठवपूर्ण प्राचीन मूर्ती एका नव्याने बनवलेल्या देवळात स्थापित केलेली दिसते. अजून पन्नास-शंभर पायऱ्या चढून पुढे गेल्यावर अचानक उतार सुरु होतो व दुरुनच श्रीकनकेश्वराचे किमान एक हजार वर्षे प्राचीन देवालय दृष्टीस पडते.
एकुण ७०० च्या आसपास पायया चढल्यावर आपण कनकेश्वराच्या प्राचीन देवळापाशी पोहोचतो. वाटेत काहीही मिळण्याची शाश्वती नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवावे.
देवळाच्या बाह्य भिंतींवर नृत्यमग्न गणपती, नटराज अशी सुंदर शिल्पे दिसुन येतात जी बटबटीत रंगात रंगवुन काढली आहेत. शिल्पांकन खुप नाहीय. सभामंडप आधुनिक काळातला असला तरी अंतराळ व गर्भगृह प्राचीन आहे. गर्भगृहाची द्वारपट्टी शिल्पसमृद्ध असली तरी बरीचशी शिल्पे भंगलेली आढळतात.
गर्भगृह पुष्कळ खोल असून ७-८ पायऱ्या उतरल्यावर आपण श्रीकनकेश्वराच्या चांदीने मंडित अश्या प्राचीन शिवलिंगापाशी येतो!
स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात इथे सोन्याचे शिवलिंग स्थापन उपासना केली, कनक म्हणजे सोने. यामुळेच नाव पडले कनकेश्वर आता सोन्याचे लिंग राहिले नसुन सध्या ते पूर्णपणे चांदीच्या मुखवट्याखाली असते.
कालांतराने स्थानिक राजांनी देवालय आज दिसते तसे बांधुन काढले. देवळाच्या मागेव एक विशाल कुंड असुन ब्रह्मकुडाहूनही केकपटीने मोठे व खोल आहे, चारी बाजुनी पायन्या असलेले. त्याच्या भोवती रामेश्वर, विष्णु, व १९व्या शतकात बांधलेले श्रीरामसिद्धिविनायक देवालय आहे. इथे सिद्धीविनायक दोन्ही भार्या ऋद्धी व सिद्धीसहित आणि दोन मुलांसहित विराजमान असुन जयपुरच्या शिल्पकाराने हि देखणी मूर्ती तिथे वास्तव्य करुन असलेल्या एका गाणपत्य पतींना भेट दिली. त्यांची शेजारीच समाधी असुन त्यावरही सुंदर अशी गणपतीची मूर्ती विराजमान आहे.
संपूर्ण कनकेश्वर देवालयाची व्यवस्था बरी ठेवलेली आढळते. वरती र खाण्यापिण्याची दुकान असुन साधना करण्यास येणाऱ्यांकरता मुक्कामाचीही सोय होते असे कळते, परिसर गर्द वनश्रीने व्याप्त असुन खूप रमणीय, शांत व आध्यात्मिक साधना करण्यास अनुकूल आहे.
ref: discovermh