श्री काळा महादेव मंदिर नगरदेवळे – shri kala mahadev mandir ngardevle

श्री काळा महादेव मंदिर नगरदेवळे

नगरदेवळे गावाच्या पश्चिम दिशेला एका उंचवट्यावर श्री काळा महादेव मंदिराची मजबूत पायाभरणी केलेली दिसते. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केल्याने स्थानिक लोक त्याला काळा महादेव म्हणतात. दुसरी एक मान्यता अशी आहे की या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर राहू व केतु विराजमान आहेत. त्यांचा रंग काळा असल्याने या मंदिराला काळा महादेव मंदिर असे म्हटले जाते. असे वैजापूरकर रांनी सांगितले.ही मान्यता अधिक संयुक्तिक वाटते.

या मंदिराची रचना देखील हेमाडपंती आहे. नगरदेवळे परिसरात दोन प्रकारची हेमाडपंती मंदिरे आढळतात. काही मंदिरांना नंदीगृह सभामंडप व गर्भगृह अशी रचना आढळते. ( संगमेश्वर मंदिर ) तर काही मंदिरांना फक्त गर्भगृह आढळते. काळा महादेव मंदिरात फक्त गर्भगृह आढळते. चार दगडी खांबांवर दगडी तुळया मजबूत बसवल्या आहेत.

त्यावरच छताचा समतोल साधलेला आहे . छताचा आकार अष्टकोनी असून मध्यभागी चार मोठ्या पाकळ्यांचे कोरीवकाम केलेले आहे. त्यांच्यात शतदल कमळ मोठ्या खुबीने कोरलेले आहे. या संपूर्ण छतासाठी फक्त पाषाणाची रचना केलेली आहे. कुठेही चुन्याचा वापर केलेला नाही हे बघतांना आपण स्तिमित होतो. या कामासाठी वापरलेल्या दगडी शिळांचे वजन हे टनांमध्ये आहे. एव्हढ्या अवजड शिळांची प्रमाणबद्ध रचना मन अचंबित करून जाते

प्रथमतः या चार स्तंभावरच या मंदिराची रचना केलेली आढळते. नंतरच्या काळात स्तंभांना आधार देण्यासाठी तिचे बांधकाम केलेले दिसते. यामुळे मंदिराता मजबुती आती आज हा बदल स्पष्टपणे जाणवतो. पण त्यामुळे मंदिर सौंदर्य कमी झाले नाही.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय रेखीव आहे. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी दोन किर्तीमुख शिल्पे आढळतात. यांना मेंढयांची शिंगे आहेत व मुख सिंहाचे आहे. बटबटीत डोळे असलेले चेहरे अधिक उम्र दिसतात त्यांच्या मध्यभागी पावरीच्या जागेवर वैशिष्ट्यपूर्ण • गोलाकार कोरीवकाम केलेला दीड फूट उंचीचा स्तंभ आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराचा उंबरठा अधिकच उठावदार दिसतो.

प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गणपती शिवाय एकही मूर्ती शिल्प आढळत नाही. प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूचे तीन तीन दगडी स्तंभ भव्यता वाढवतात. इतर मंदिराप्रमाणे येथे मूर्ती शिल्प पट्टीका आढळत नाहीत. प्रवेशद्वार व गर्भगृहाला ऑईलपेंट ने रंगवल्याने मूळ प्राचीनत्व हरवले आहे.

आता आपण गाभाऱ्यात पोहोचलो. प्रवेशद्वारातूनच शिवपिंडीचे दर्शन होते. सांबून पिंडीची रेखीवता मन तृप्त करते ही पिंडी काळ्या तुकतुकीत पाषाणापासून निर्मित आहे . या शिव पिंडीचे वैशिष्ट म्हणजे यावर राहू विराजमान आहे यामुळे सोडल्यास कालसर्प योग पूजा येथे केली जाते.

पिंडीवर राहू विराजमान असलेले हे शिवलिंग खुप दुर्मिळ मानले जाते. आंध्रप्रदेशात चित्तूर जिल्ह्यात तिरुपतीपासून 36 कि.मी. अंतरावर श्रीकालहस्ती नावाचे एक तीर्थक्षेत्र आहे याचा समावेश 51 शक्तीपीठांमध्ये केला जातो. येथे वापूलिंग रूपात शिव वसलेले आहेत. येथे राहू आणि केतू त्यांच्या समवेत आहेत. सर्वसामान्य माणूस राहू केतू यांना खूप घाबरतो. यांची वक्रदृष्टी झाली तर खूप समस्या निर्माण होतात, विघ्ने येतात असे त्याला वाटते म्हणून त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा मंदिरांमध्ये कालसर्प योग पूजा करावी लागते, असे अतुल महाराज काळे यांचे कडुन कळते.

श्री काळा महादेव मंदिरात देखील हा विधि केला जातो. या पूजेचा संबंध श्रीकालहस्तीशी आहे. त्यामुळे या मंदिराचे वेगळेच धार्मिक महत्व समोर येते. पूर्वी खुप लांबून लोक या पुजेसाठी येत असत. ज्यांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर जाणे शक्य नाही असे भक्त ही पूजा येथेच करत

काही वर्षांपूर्वी गावातील काही भाविक भक्तांनी पुढाकार घेऊन या दुर्मिळ शिवलिंगावर पितळेचे कब बसवले आहे. त्यामुळे राहूचे दर्शन होऊ शकत नाही. परंतु कवच खूपच आकर्षक असल्याने पाहताक्षणी मन मोहून जाते.

मंदिराबाहेर नंदीची आकर्षक मूर्ती आहे. त्यावर रंगकाम मूर्तीचे मूळ रूप दिसू देत नाही. त्यामुळे मूर्ती प्राचीन की अलीकडे स्थापित केली हे कळत नाही. पण नदीच्या शिंगाचा ठो मूर्तीचा समतोल बरोबर सांभाळतो. कानांची रचना अशी केली आहे की जणू तो भक्तांचे गाहाणे ऐकण्यासाठीच बसला आहे येथे एक वैशिष्ट्य म्हणजे नंदिसमोर दगडी पादुका स्थापित केलेल्या आहेत. त्या कुणाच्या आहेत याविषयी मतमतांतरे आहेत. कोणे एके काळी कोणी एक सत्पुरुष गोसावी मंदिराच्या सेवेसाठी होते. बरेच वर्षे त्यांनी सेवा केली . कदाचित त्यांच्या स्मरणपादुका तर त्या नसाव्यात असे मानले जाते. ते सत्पुरुष स्वामी स्वरूपानंद यांच्या समकालीन होते असे म्हणतात.

मंदिर बाहेरचा भाग व कळस अलीकडे बांधलेला आहे. पत्र्याची शेड करून तात्पुरते सभागृह बांधले आहे. मंदिर प्रदक्षिणासाठी छानसा वळसा मार्ग आहे. या मंदिरात बाराही महिने थंड वाऱ्याची झुळूक मनाला प्रसन्न करून जाते. त्यामुळे दर्शनासाठी येणारे समाधानी होतात.

मंदिराच्या बाहेर दोन नंदी भग्नावस्थेत आढळतात. परंतु ते दुसऱ्या कुठल्याश्या मंदिरातून तेथे आणल्यासारखे वाटतात.

मंदिराच्या उजव्या बाजूला उघड्यावर झाडाच्या सावलीत एक पक्षमूर्ती लक्ष वेधून घेते. दोन हातांनी छताचा भार तोललेला व दोन हात गुडघ्यावर अशा अवस्थेत तो यक्ष दगडी खांबाच्या वरच्या दिशेला आधार देणारा आहे. परंतु तशा प्रकारचे बांधकाम येथे नसल्याने ती मूर्ती दुसरीकडून येथे आणली असावी का ? अशी शंका येते. मूर्ती मात्र विलोभनीय आहे. यक्षाच्या बाजूला शिव मूर्ती दिसते ही तांडव स्वरूपात आहे. उजव्या हातात त्रिशूल व डमरू तसेच डाव्या हातात धनुष्य व नृत्यमुद्रा जटाभार मोकळा असून डाव्या बाजूला उठताना दिसतो. त्यामुळे नृत्याची गती मुर्तीकाराने अचूक साधली आहे. चेहऱ्यावरची भावमुद्रा आज लुप्त झाली असली तरी मूळ मूर्ती खूपच सुंदर असावी .

शिव मूर्तीच्या शेजारी पार्वती मूर्तीस्वरूपात आहे. ही पद्मासनात आहे पण महिषासुरावर स्वार आहे झीज झाल्याने निश्चित परीक्षण करता येत नाही. कानातील कर्णले व मुकुटरचना यावरून चेहऱ्यावरील भाव प्रसन्न असावे असे वाटते एका बाजूला आयताकृती शिळेवर दोन आकृत्या कोरलेल्या आहेत. स्थानिकलोक त्यांना मुंजोबा म्हणतात ती स्मृती पण असू शकते ती कुणाची आहे हे माहीत नाही. पूर्वी गावात बालमृत्यू झाला तर मंदिराच्या मागे पुरण्याची प्रथा होती. कदाचित त्याच्याशी पण या स्मृतीशिळेचा संबंध असावा. आता या परिसरात बऱ्यापैकी लोकवस्ती झाल्याने ही प्रथा बंद पडली.

एकंदरीत श्री काळा महादेव मंदिर हे गावातील एक प्राचीन व धार्मिक ठेवा आहे. रंगकाम केल्याने प्राचीनत्व झाकोळले गेले असले तरी मंदिराची भव्यता डोळ्यात भरण्यासारखी आहे • बाहेर उघड्यावर ठेवलेल्या मूर्ती जर छताखाली ठेवल्या तर त्या दीर्घकाळ सुरक्षित राहतील • हे मात्र खरे !

ref: discovermh