श्री भगवती देवी मंदिर धामापूर मालवण – Shri Bhagwati Devi mandir Dhamapur Malvan

श्री भगवती देवी मंदिर धामापूर मालवण

 

कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव.       सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायऱ्या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. १६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले.

जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरुपी बंधारा बांधला. सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे. गावातील ग्रामस्थ व बंधा-याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे.

मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. हेमाडपंथी शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. शके १८२७ ला सभामंडपाचे बांधकाम झाले असल्याची नोंद सापडते.

मंदिरामध्ये देवी भगवतीची पाषाणात कोरलेली सुमारे चार फूट उंचीची सुबक मूर्ती आहे. पुराणात महिषासूरमर्दिनीचे जे वर्णन करप्प्यात आले आहे ते वर्णन तंतोतंत येथील मूर्तीला लागू पडते. देवीच्या एका हातात शंकराची आयुधे आहेत. तर दुस-या हातात शक्तीची आयुधे आहेत. यामुळे मूर्तीमध्ये शिव आणि शक्तीचा सुंदर मिलाप पहावयास मिळतो. भगवतीची मूर्ती चतुर्भूज असून विविध आभुषणांनी युक्त आहे. देवी भगवतीचे मंदिर कौलारू असले तरीही मूळ गाभारा दगडी आहे.

मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री

फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसऱ्या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले.

त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.

ref: discovermh