स्थान: दक्षिण भारत – नांगर कॉईल पासून चार मैलांवर
विशेष: गौपुरे, स्थाणुमल्ल अयन (शिव, विष्णु , ब्रह्मदेव) मंदिर
दक्षिण भारतात शुचिन्द्रम् हे एक दत्तात्रेयांचे स्थान प्रसिद्ध आहे. कन्याकुमारीकडे निघाले की जाताना नारळीच्या प्रसन्न बागा लागतात. नागरकॉईल पासून चार मैलांवर शुचिन्द्रम् हे लहानसे गाव आहे. गोपूर फार दूरवरून ध्यानात येते. गावाभोवती असलेल्या निसर्गसौंदर्याने हे गाव डोळ्यात भरते.
मुख्य मंदिराजवळ एक मोठा पाण्याचा तलाव आहे. याला ‘मंडपम्’ असे म्हणतात. शुचिन्द्रम् येथे अनेक ‘देवदेवतांचे’ वास्तव्य आहे. दुर्गा, विनायक, हनुमान इत्यादी देवदेवतांचे येथे दर्शन होते. पण सर्वात महत्त्वाचे स्थान स्थाणुमल्लअयन (शिव, विष्णु, ब्रह्मदेव) यांचे मंदिर आहे. स्थापत्यकला, चित्रकारी, कलाकुसर या मंदिरात पहाण्यासारखी आहे. मंदिराचे गोपूर १३४ फूट उंच आहे. पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मन्मथ, रती, अर्जुन आणि कर्ण यांचेही दर्शन येथे होते. नवग्रहांचे स्थान येथील छतावर चांगल्यारितीने कोरलेले आहे. येथील प्रख्यात मूर्ती म्हणजे हनुमंताची होय. ही मूर्ती १८ फूट ऊंच आहे. आणि सर्वांचे लक्ष वेधून घेते. श्रीदेवी, भूदेवी यांच्या विष्णुसहित मूर्ती पहाण्यासारख्या आहेत. येथील नटराजही प्रसिद्ध आहे.
मुख्य मूर्ती स्थाणुमल्लअयन यांची आहे. या संबंधी एक कथाही प्रसिद्ध आहे. अत्रि व अनसूयेचे सत्त्व हरण करण्यासाठी ब्रह्मा, विष्णु, महेश येथे आले. त्यांनी अनसूयेचे सत्त्व हरण करण्याचा प्रयत्न केला. व शेवटी त्यांना बालरूपांत येथे राहावे लागले. एका वृक्षाच्या बुंध्याशी त्यांना निवास करावा लागला. मंदिरातील या वृक्षाचे दर्शन येथे होते.
आम्ही गेलो होतो तेव्हा मंदिरातील सरस्वतीच्या मूर्तिपुढे एक मोर पिसारा उभा करून नाचत होता. अगदी दोन तीन फुटांवर. त्याचे हे नृत्य मोठे आकर्षक वाटत होते. या मंदिरातील स्थाणुमल्लास वरण्यासाठी कन्याकुमारी हातांत हार घेऊन गेली अनेक शतके उभी आहे.