श्री क्षेत्र सटाणे

श्री क्षेत्र सटाणे

श्री क्षेत्र सटाणे

श्री उपासनीमहाराजांच्या आश्रमाच्या हैद्राबाद, नागपूर, सुरत, सटाणे, धरमपूर या ठिकाणी शाखा आहेत. सटाण्याच्या आश्रमात श्रीकोटिलिंगेश्र्वर मंदिर, श्रीहनुमानमंदिर आणि श्रीदत्तमंदिर आहे. महाराजांच्या वडिलोपार्जित घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला, त्याच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना रण्यात आली आहे. समाधी घेण्याच्या आदल्या दिवशीच महाराजांनी स्वहस्ते त्यांची स्थापना केली. ज्योतिर्लिंगे शुभ्र स्फटिकाची असून तळघरात आहेत.

कोटिलिंगेश्र्वराच्या मंदिरावर श्रीहनुमानमंदिर आहे. श्रीमारुतीरायाने श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई यांच्या मूर्ती स्कंधावर धारण केल्या आहेत. मंदिरात पूजा-अर्चा व त्रिकाळ आरती चालते.

तेथून थोड्याश्या अंतरावर आराम नदीच्या काठी श्रीदत्तमंदिर वसलेले आहे. संत देव मामलेदारांच्या स्मारकापासून जवळच महाराजांच्या आजोबांची समाधी असून त्या समाधीवरच दत्तमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. १९२९ च्या सुमारास हे मंदिर बांधण्यात आले. दत्तात्रेयांची मूर्ती तीन मुखी आहे. मंदिरात नियमितपणे पूजा-अर्चा व त्रिकाळ आरती होते. प्रतिवर्षी श्रीदत्तजयंतीचा उत्सव साजरा होतो. मंदिर परिसर अतिशय प्रसन्न आहे.

जगावेगळ तिर्थक्षेत्र- सटाणा, मंदिर एक सरकारी अधिकाऱ्यांचे.

शिर्षक वाचुनच तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की जगावेगळ म्हणजे नक्की काय? अस काय आहे सटाण्यात की ते जगावेगळ आहे. होय सटाणा हे तिर्थक्षेत्र नक्कीच जगावेगळ आहे. आपण आजपर्यंत अनेक तिर्थक्षेत्र बघीतले असतील. भारतात अनेक देवीदेवतांचे, संतांचे, महापुरुषांची मंदीरे आहेत. पण सटाणा हे गाव त्याला अपवाद आहे. याचे कारण म्हणजे सटाणा येथे मंदीर आहे ते एका सरकारी अधिका-याचे. भुतलावर एखाद्या सरकारी अधिका-याचे मंदीर सटाण्याशिवाय कोठेही नाही हेच ह्या गावाचे विशेष आहे. आजचे सरकारी अधिकारी किंवा सरकारी कार्यालयांबाबत सामान्य जनतेची काय भावना असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण त्या काळात सटाण्यात असे काही घडले की जनतेने एका शासकीय अधिका-याला देव व त्यांच्या तहसील कचेरीलाच मंदीर बनवीले ते काही एवढ्या सहजासहजी नाही. बागलाणचा मागील इतीहास बघीतला तर तो अतीशय रंजक आणि तेवढाच अंगावर काटे आणणारा आहे. त्या काळातले सटाणा आणि आजचे सटाणा यात जमीन आसमानाचा फरक आहे. यशवंतराव महाराजांना सटाण्याला ह्या स्तरापर्यंत आणण्यासाठी अपार मेहनत, कष्ट व शासन दरबारी प्रयत्न करावे लागले होते तेव्हा कुठे हे शक्य झाले होते. जर ते सटाण्यात मामलेदार म्हणुन आलेच नसते तर आज देखील सटाणा हे दुर्लक्षीत आदिवासी बाहुलभाग म्हणुनच राहीले असते. त्यांच्या योग्य नियोजनाने व दुरदृष्टीने सटाण्यासारख्या दुर्लक्षीत भागाचे आज आपण नंदनवन झालेले बघतोय ही फक्त आणि फक्त देवमामलेदारांचीच कृपा आहे. नोकरी निमीत्ताने केवळ चार-पाच वर्षांच्या वास्तव्यानेच सटाणा वासियांच्या पिढ्यांपिढ्या करीता कुलदैवताच्या स्थानी विराजमान झालेल्या देवमामलेदारांचे कार्य हे आज देखील बागलाण वासियांना कृतकृत्य करते. श्री यशवंत महादेव भोसेकर हे सटाण्याला येण्याआधी सिंदखेडा येथे मामलेदार पदावर कार्य करीत होते. इंग्रजांचा आत्याचार, त्यातच भयंकर दुष्काळ अशा परिस्थीतीचा सामना करत जनता आपले जिवन जगत होती. पण यशवंतरावांसारख्या संवेदनशील, मातृहृदयी मामलेदार ह्या सिंदखेड्यात असल्यामुळेच येथील जनता सुखकर जिवन जगत होती. त्यामुळे खानदेशातील जवळपास सर्वच लोक भोसेकर रावसाहेबांना देवासमान मानत होते. यशवंत भोसेकर रावसाहेब हे जणमानसात लोकप्रिय व्यक्तीमत्व होते.खानदेशात यशवंतरावांचे भक्तमंडळ दिवसेंदिवस वाढतच होते त्यामुळे इंग्रजांना ही धोक्याची घंटा वाटु लागली.त्यांचा स्वच्छ पारदर्शी व लोकाभिमुक कारभार इंग्रजांना अडचणीचा ठरु लागला होता हे असेच चालु राहीले तर लवकरच आपल्याला येथुन हद्दपार व्हावे लागेल अशी भिती इंग्रजांना वाटु लागली होती. त्यामुळे एखादे कारण शोधुन ह्या मामलेदाराची बदली एखाद्या अडगळीच्या ठिकाणी करण्याचे षडयंत्र इंग्रजांनी रचले. सर्व काही सुरळीत चालु असतांनाच दि ८ मे१८६९ रोजी यशवंतरावांच्या हातात बदलीचा आदेश पडला व सटाणा येथे मामलेदार म्हणुन रुजु व्हावे असा हुकुम झाला. पण त्यांना सटाणा हेच गाव का देण्यात आले ? इंग्रजांनी नक्की कोणती कुटील निती वापरुन सटाण्यासारख्या अडगळीच्या ठिकाणी त्यांची बदली केली असावी. कारण त्या काळात सटाणा म्हणजे अतिशय दुर्लक्षीत आदिवासी बहुलभाग म्हणुन प्रचलीत होते व तेथे सरकारी कचेरी देखील नव्हती. नाशिक जिल्ह्यात सटाणा हे गाव देखील कुणालाही अधिक परीचीत नव्हते. पण तरीही ब्रिटीश शासनाने सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन केली व यशवंतरावांना येथे मामलेदार म्हणुन रुजु होण्याचा आदेश दिला. पुर्वीचे सटाणा म्हणजे अतिशय भयंकर भाग. वाघांची संख्या लक्षणीय असल्यामुळे इंग्रज ह्या भागाला बागलँड ( वाघांची जागा ) म्हणुन संबोधत. तुळ्या नाईक सारख्या मातब्बर दरोडेखोरांच्या एकुण ८० टोळ्या ह्याच भागात उच्छाद मांडत असत त्यामुळे दरोडे, खुन, घातपात, जंगली प्राण्यांचे नेहमीचे हल्ले अशा वेगवेगळ्या घटनांनी हा भाग सतत डिस्टर्ब असायचा. त्यामुळे बागलाण च्या ह्या आदिवासी मुलखात सोयी सुविधा तर दुरच पण इतर भागातील जनतेचा देखील संपर्क नसायचा. अशा भागात यशवंतरावांची बदली केली तर ते कायमचे तेथेच अडकतील. बागलाणातील जनतेला ना देवा धर्माची गोडी ना कसलीही आवड. सततच्या अशांत राहणा-या बागलाणात शांतता व स्थिरस्थावरता आणण्यात एकदा का हे यशवंत मामलेदार अडकले की त्यांचे धार्मिक कार्य आपोआपच बंद पडेल असा समज इंग्रजांचा झाला व म्हणुनच त्यांनी यशवंतरावांची बदली बागलाणात केली. पण ज्यांच्या नसानसातच देवपण असेल तर त्यांना कसली भिती.

सुरवातीच्या काळात यशवंतरावांना देखील येथील जनतेचा खुप त्रास सहन करावा लागला होता. मात्र हळुहळु येथील जनतेला त्यांच्यातील चांगुलपणाचा पदोपदी अनुभव येउ लागला होता. त्यामुळे सामान्य मानवासह, चोर, लुटारु, दरोडेखोर देखील त्यांचे हे निस्सीम प्रेमळ रुप बघुन चांगले जिवन जगण्याची उमेद त्यांच्यात जागृत होउ लागली होती. हीच तर खरी महाराजांची दैवी शक्ती होती जीने त्यांना एका सामान्य मानवापासुन ते सर्वोच्च थेट “देवमामलेदार” ह्या पदापर्यंत जाउन पोहचवीले होते. यशवंतराव महाराजांचे संपुर्ण जिवनच एक मार्गदर्शक आहे. त्यामुळे आपणा सर्वांना आयुष्यात एकदा तरी संत दादामहाराज रत्नपारखे यांनी ओविबध्द स्वरुपात लिहीलेला “श्री यशवंत लिलामृत” हा ग्रंथ वाचायलाच हवा. मात्र हा मुळ ग्रंथ खुप मोठा असल्याने वेळेअभावी तो सर्वच जण वाचु शकत नाही. मित्रांनो त्यामुळेच मी ह्या ग्रंथातील २१ अध्यायांचे आपल्या सोप्या भाषेत रुपांतर केले असुन ते उद्या दि. २३ नोव्हेंबर २०१७ ते दि.१३ डिसेंबर २०१७ पर्यंत रोज एक अध्याय असे एकुण २१ अध्याय ह्या २१ दिवसांत आपल्या समोर सादर करणार आहे. व महाराजांचा जन्म ते मृत्यु पर्यंतची सर्व माहिती ह्या अध्यायांत मांडणार आहे. तरी ते अध्याय तुम्ही वाचावे व देवमामलेदारांच्या आदर्श जिवनकार्याचे स्मरण करावे ही विनंती.

तेव्हा उद्यापासुन ते महाराजांच्या पुण्यतिथी दिनापर्यंत सलग २१ दिवसांत हे २१ अध्याय आपण न चुकता वाचावे म्हणजे आपणांस देवमामलेदारांचा संपुर्ण जिवनपट व्यवस्थितपणे आभ्यासता येईल व त्या निमीत्ताने त्यांच्या पवित्र कार्याचे स्मरण होईल.


श्री क्षेत्र सटाणे माहिती समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

 

1 thought on “श्री क्षेत्र सटाणे”

  1. अरुण रामचंद्र खैरनार

    श्री देवमामलेदर यशवंतराव महाराज हे आमचे ग्रामदैवत आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही सटाणा वासि सुखात आनंदात आहोत. त्यांच्या पदस्पर्शाने आणि कार्याने पवित्र झालेली सटाणा नगरीचे आम्ही रहिवासी खरोखरच भाग्यवान आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *