श्री क्षेत्र साकुरी

श्री क्षेत्र साकुरी

स्थान: नगर जिल्ह्यात शिर्डीचे जवळ.
त्पुरूष: श्री उपासनी महाराज.
विशेष: १९२९ ला दत्तमंदिराची मूर्ती स्थापना, दत्त मंदिरात २४तास टाळ पहारा असतो, मातृमंदिर, बापूसाहेब जोग समाधी. श्री गोदावरी माता धर्मरक्षण पीठ, दत्तमंदिर.

श्रीसाईबाबांमुळे जसे शिरडीस महत्त्व प्राप्त झाले, तसेच श्रीउपासनीबाबांमुळे साकुरी प्रसिद्धीस पावली. श्रीउपासनीमहाराज हे विसाव्या शतकात महाराष्ट्रात एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासावर दीप्ती चढवली व देशाचे मुखमण्डल उजळ केले, अध्यात्मिक तत्त्वावर साचलेली काजळी दूर केली व सनातन वैदिक धर्माची ध्वजा जगात फडकत ठेवली.
श्रीउपासनीमहाराज मूळचे नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचे. १५ मे १८७० रोजी ते जन्मास आले. बालपणापासूनच त्यांना ईश्र्वरी साक्षात्काराची ओढ होती, व तत्त्वचिंतनाचे वेड होते. सद्गुरुंच्या शोधार्थ भ्रमण करताना त्यांची शिर्डीच्या साईबाबांची भेट झाली. त्यांच्या कृपेने सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर त्यांनी शिरडी सोडली. त्यानंतर खडगपूर वगैरे ठिकाणी भ्रमंती केल्यावर नगर जिल्ह्यातील साकुरी या खेड्यात या सिद्धपुरुषाचे पाय विसावले. महाराजांनी गावाबाहेर स्मशानभूमीत वास्तव्य केले, परंतु या महापुरुषाच्या चरणस्पर्शाने स्मशानाचे वैकुंठकैलासात रूपांतर झाले. महाराजांच्या लोकोत्तर विभूतिमत्वाच्या अद्भूत आकर्षणामुळे असंख्य लोक त्यांच्याकडे आकर्षिले गेले. महाराज अक्षरश: दिगंबर अवस्थेत होते. छोटेसे गोणपाट हेच काय ते त्यांच्या कायेचे भूषण होते. सुरुवातीस थंडीगारठ्यापासून त्यांना कशाचाच निवारा नव्हता. म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी पाचटाचे एक झोपडे बांधले. जसजशी दर्शनार्थ येणाऱ्या यात्रेकरूंची गर्दी वाढू लागली तसतसे त्यांच्या सोयीसाठी हलके-हलके राहण्यास निवासस्थाने व धर्मशाळा बांधण्यात आल्या, प्रार्थनेसाठी मंदिरांची स्थापना झाली, आणि शून्यातून एका महान् तीर्थक्षेत्राची, उपासना केंद्राची आणि धर्मपीठाची निर्मिती झाली.

स्थान विशेष

साकुरीस्थानात झोपडी आणि मंदिरे यांचा समावेश होतो. ज्या भागात महाराजांची झोपडी आहे, तो भाग झोपडी म्हणून ओळखला जातो. पूर्वी ज्या ठिकाणी झोपडी होती, तिथे आता सिमेंटकाँक्रीटचा हॉल बांधण्यात आला आहे. पूर्वीच्या झोपडीचे छप्पर स्मृतिदाखल तसेच राखण्यात आले आहे. या झोपडीतच महाराजांची समाधी आहे. १९४१ साली पौष शु. सप्तमीस महाराज समाधिस्थ झाल्यावर येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. महाराजांच्या समाधी शेजारीच त्यांचा बांबूचा पिंजरा आहे. या पिंजऱ्यात त्यांनी १९२२ मध्ये स्वत:स लोककल्याणासाठी बंद करून घेतले होते. या पिंजऱ्यात असतानाच महाराजांच्या प्रवचनास प्रारंभ झाला. त्यांच्या ज्ञानाची गंगोत्री येथेच उगम पावली. त्यांची सारी प्रवचने उपासनीवाक्सुधा या ग्रंथामधून समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांची प्रवचने म्हणजे ज्ञानाचे अमोलीक भांडार असून त्यांची विचारतत्त्वे जागोजाग विखुरली आहेत. महाराजांच्या झोपडीपासून समोरच मातृमंदिर आहे. महाराजांच्या मातोश्रींचे हे समाधिमंदिर आहे. येथून लगतच सभामंडप आहे. तेथून थोड्याशा अंतरावर कन्याकुमारीमंदिर आहे. कन्याकुमारीचे ते चिरंतनचे स्मारक आहे. तेथून जवळच यज्ञमंडप आहे. येथे वर्षातून सात यज्ञ होतात. श्रीमाताजींचे नेतृत्वाखाली कन्यांच्या द्वारा हे यज्ञ होतात. झोपडीपासून काहीशा अंतरावर बापूसाहेब जोग यांची समाधी आहे. तेथून समीपच मंदिरे आहेत. त्यामध्ये श्रीदत्तमंदिर हे प्रामुख्याने आपल्या नजरेत भरते. त्याच्या सभोवतीच श्रीमारुतीराय, श्रीगणेश, श्रीखंडोबाराय, श्रीमहादेव आणि श्रीशनिदेव यांची छोटीशी पण सुबक राऊळे असून ती तेथील सनातन वैदिक धर्माच्या वातावरणाची ग्वाही देतात.

दैनिक कार्यक्रम

स्थानातील कार्यक्रमाची अशा रीतीने मांडणी करण्यात आली आहे की, पहाटे उजाडल्यापासून रात्री निद्राधीन होईपर्यंत साधकाचा दरेक क्षण भगवच्चिंतनात जावा. त्रिकाळ आरती, भजन, पूजन इत्यादी सत्कर्मांनी साऱ्या दिवसाचा कार्यक्रम भरगच्च भरलेला असतो. त्यामुळे येथील वातावरण भगवंताच्या नामघोषाने निरंतर दुमदुमत असते. याशिवाय प्रसंगोपात् हिंदूंचे लहान मोठे सण आणि उत्सव साजरे होतात व यज्ञयाग होतात.

कन्याकुमारीस्थान आणि यज्ञसंस्था ही या स्थानाची लोकोत्तर वैशिष्ट्ये होत. भारतात ब्रह्मवादिनी स्त्रियांच्या फारच थोड्या संस्था असून त्यांमध्ये ही अग्रगण्य आहे. येथील ब्रह्मचारी कन्यांनी आध्यात्मिक तत्त्वासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. श्रीगोदावरीमाताजींनी स्थानाच्या प्रमुख म्हणून महाराजांच्या पश्र्चात् स्थानाचे धर्मजागृतीचे कार्य पुढे चालविले. यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे ही देखील महाराजांच्या कार्याची अपूर्वाई आहे. कन्याकुमारी यज्ञकार्यात निष्णात बनल्या असून त्यांपैकी काही घनपाठी आहेत. साकुरीखेरीज श्रीमाताजींनी कन्यांसह आजवर पुणे, मुंबई, नागपूर, कटणी, जबलपूर, हैदराबाद, सुरत इत्यादी भारतातील प्रमुख ठिकाणी यज्ञ करुन यज्ञसंस्थेचे कार्य दूरवर पोचविले आहे. सध्या जे टोलेजंग मंदिर आपल्या दृष्टिस पडते, ते बांधून होण्यापूर्वी त्याच जागी श्रीदत्तात्रेयांचे छोटेसेच मंदिर उभे होते. इ. स. १९२२ सालाच्या सुमारास ते बांधले गेले व तेथे सद्गुरूंच्या पादुकांची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासूनच मंदिरात पूजा-अर्चा व त्रिकाळ आरती सुरू झाली.
१९२९ सालामध्ये त्याच जागी हल्लीचे भव्य मंदिर बांधण्यात आले. ग्वाल्हेर संस्थानच्या राजघराण्यातील एका बाईने उदार मनाने दिलेल्या देणगीतून मंदिराचे बांधकाम करण्यात आले. घराण्यात दत्तक घेण्याच्या प्रश्र्नाच्या विवंचनेत असताना यांनी अनेक साधु-संतांची स्थाने धुंडाळली. सरतेशेवटी श्रीमहाराजांचा लौकिक ऐकून साकुरीस त्या दर्शनार्थ आल्या. महाराजांच्या आज्ञेनुसार साकुरीस काही महिने त्यांनी वास्तव्य केले व त्या सेवाभावाने राहिल्या. अखेर दत्तकाचा प्रश्र्न त्यांच्या मनासारखा समाधानकारक सुटला गेला. महाराजांच्या कृपेचे हे फळ मानून कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने त्यांनी दत्तमंदिर नव्याने बांधून काढले. मंदिराचा दर्शनी भाग अवलोकन केला की, उत्तर हिंदुस्थानी शिल्पसौंदर्याचा साक्षात्कार घडतो. या मंदिराच्या बांधकामासाठी खास ग्वाल्हेरहून काँट्रॅक्टर, इंजिनियर आणण्यात आले. इंजिनियर वाळिंबे या तज्ञ स्थापत्यविशारदाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सुमारे १२ वर्षेपर्यंत मंदिराचे बांधकाम चालू होते. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर १९२९मध्ये श्रीदत्तपादुकांची स्थापना करण्यात आली आणि इ. स. १९४२ साली मंदिरामध्ये श्रीदत्तमूर्तींची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

श्रीदत्तात्रेयांची मूर्ती इटलियन मार्बलची असून मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. तालीम यांनी घडविली आहे. जरी १९४२ साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तरी ही मूर्ती महाराजांनी आपल्यासमोर १९३० मध्येच घडवून घेतली होती, श्रीदत्तात्रेयांची मूर्ती एकमुखी आहे. एकेकाळी श्रीपादुकांवर रात्रं – दिवस अभिषेकाचे पहारे चालत. कालान्तराने ते बंद झाले असून हल्ली प्रसंगाविशेषीच पादुकांवर अभिषेक करण्यात येतो. श्रीदत्तमंदिरात रात्रं – दिवस अखंड टाळपहारा असतो. १९२२ च्या सुमारास महाराजांनी स्वत:स पिंजऱ्यात बंद करुन घेतल्यावर या पहाऱ्यास प्रारंभ झाला, तेव्हापासून आजतागायत तो अखंडपणे चालू आहे. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पहाहाऱ्यात भाग घेतात. दिवसाचे पहारे स्त्रिया सांभाळतात, तर रात्रीचे पहारे पुरुष सांभाळतात. दरेक तासागणिक पहारेकरी बदलतो. पहारा करताना टाळ वाजवावा लागतो व मुखाने नामसंकीर्तन करावे लागते. अशाप्रकारे पन्नासहून अधिक वर्षे नामसंकीर्तन चालू असून रात्रं – दिवस भगवन्नामाच्या घोषाने हे मंदिर दुमदुमत आहे.

दर गुरुवारी श्रीदत्तात्रेयांची पालखी निघते. लाकडी रथामध्ये श्रीसाईबाबा, श्रीउपासनीबाबा आणि श्रीउपासनीबाबांच्या मातोश्री यांच्या प्रतिमा असून श्रींच्या पादुका ठेवतात. दर गुरुवारी मंदिरासमोरील चौकात तासभर भजन होते, त्यावेळी तीनदा रथासह मंदिराची प्रदक्षिणा होते.
देवळातील शेजारतीनंतर रथासह दिण्डी टाळ मृदुंगाच्या घोषात निघते आणि झोपडीत जाते. झोपडीतील शेजारती झाल्यानंतर दिण्डी मंदिरात परत जाते. महाशिवरात्री, जन्माष्टमी वगैरे महत्त्वाचे सण आणि उत्सव असले की, पालखी काढतात; छत्र, चामर, अब्दागिरी, पताका अशा सर्व साजासह पालखी निघते. प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तजयंती साजरी केली जाते.


श्री क्षेत्र साकुरी माहिती समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

View Comments