श्री क्षेत्र कर्दळीवन

श्री क्षेत्र कर्दळीवन

श्री क्षेत्रर्दळीवन दुर्गम पण जागृत तपस्थान

श्री क्षेत्र कर्दळीवनन: आंध्रप्रदेश, श्रीशैल्याम-पाताळगंगा-कर्दळीवन
त्पुरूष: श्री नरसिह सरस्वती, अक्कलकोट स्वामी समर्थ
विशेष: अक्कम्मा गुहा, श्री स्वामी प्रकटस्थान, श्री नृसिहसरस्वती महाराज पादुका, तपस्थान

दत्तसंप्रदाय हा सर्व आध्यात्मिक मार्गाला सामावून घेणारा व सर्व परंपरांचे मूळ तत्त्व आहे. जो सत्याला आपला धर्म मानतो, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो दत्तात्रेयांनी आखून दिलेल्या मार्गावर चालत असतो. खऱ्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परमेश्वराने श्रीदत्तात्रेयांच्या रूपात अवतार घेतला. कोणतीही व्यक्ति, मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो तसेच ती विद्यार्थीदशेतील, गृहस्थाश्रमातील किंवा संन्यासी असो, ती व्यक्ती दत्तसंप्रदायाने आखून दिलेल्या भक्तिमार्गाचा अवलंब करू शकते. कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती शेवटी जगताचा मार्गदर्शक असलेल्या अशा श्रीदत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखाली येते. ऐश्वर्यसंपन्न असे श्रीदत्त चराचरात सामावलेले आहेत. श्रीदत्त हे सर्वश्रेष्ठ मायावी असून त्यांनीच मांडलेल्या मायेच्या खेळातून अनेक उदाहरणे निर्माण करुन साधकाचा उद्धार ते स्वत:च करत असतात. तेच ब्रह्मा, तेच विष्णू आणि तेच रुद्र आहेत. तेच इंद्र आहेत आणि स्वर्गातील इतर देव-देवता व जीवही तेच, धरती आणि तेच आकाश आहेत. तेच परमतत्त्व असून हेच श्रीदत्तात्रेयाच्या अस्तित्त्वाचे वैभव आहे.

श्रीगोरक्षनाथांनी ‘सिद्धसिद्धार्थ’ या ग्रंथात ‘अवधूत’ या शब्दाची व्याख्याच सांगितली आहे. “सर्वान् प्रकृति विकारान् अवधूनितो इति अवधूत: ।” अर्थ असा की ज्यांनी प्रकृति विकाराचा त्याग केला आहे ते अवधूत, आनंदी, मस्तीत राहणारा योगी, वासनात्याग, निरामय वक्तव्य, शुद्धचित्त, नि:संग, अलिप्त असूनसुद्धा ते अवधूत लोकाभिमुख असतात. बालोन्मत्तपिशाच्चवृत्ती, लहान मुलासारखे खेळतात, यांना जेवणाचे घास भरवावे लागतात, धान्याची उलथापालथ करणे, घास भरवावा लागणे अशा प्रकारचे लहान बालकांचे गुण त्यांच्या ठायी असतात. पाण्यामधून चालणे, अंतराळातून विहार करणे अशाप्रकारे अनेक योगिक चमत्कार ते करू शकतात.

श्रीदत्तात्रेयांचा योगावतार आपल्याला आपले प्रत्येक कर्म कौशल्याने व स्फूर्तीने करण्यास शिकवतो. योगाला कोणत्याही प्रकारच्या साधनांची तसेच अतिपरिश्रमाची गरज नसते, तर फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून आत्मनिरीक्षण करुन, एक विशिष्ट बदल आपल्यात प्रस्थापित करण्याची गरज असते.

‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अन्य तीर्थक्षेत्रांप्रमाणे कर्दळीवनाची परिक्रमा सहज किंवा थोड्याशा परिश्रमाने साधणारी नाही. तसेच या स्थानाबद्दल फारशी माहितीही सहजी उपलब्ध अशी नाही. त्यामुळे त्याबद्दल सांगोवांगीच्या कथा आणि गूढ फार असे असते, तेव्हा अधिकारवाणीने बोलणाऱ्यांना ऊत येतो, आणि ते सांगतात त्याची शहानिशा करणे शक्य होत नाही. मग ते सांगतात ते सत्य मानून चालणारे तरी दिसतात किंवा सगळ्याच भाकडकथा आहेत, असे मानणारे भेटतात. परिणामी दंतकथा आणि समज-अपसमज वाढत जातात आणि भाविक नकळत सत्यापासून दूर जायला लागतो. अशा विषयांबाबत स्वत: शोध घेण्याची अनेकांना इच्छा तरी नसते किंवा इच्छा असली तरी अन्य कारणांमुळे ते शक्य होत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेले तेच, समाजमनात दृढ होते. मात्र जिद्दीने आणि ध्यासाने अशा विषयांचा शोध घेणारेही काही लोक आहेत. पण ते थोडेच आहेत.


कर्दळीवन स्थान महात्म्य

कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान. श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे. अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव, भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही. शिवाय, श्रीदत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. काही असो, परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे, गेल्या सात-आठ वर्षांतील आहे, ही वस्तुस्थिती आहे.

फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे. कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते. त्या सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली आहेत. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्त्विक-भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो. एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते. मन आनंदाने भरून उठते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचा वास आहे, जेथे श्रीदत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे माहात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही.

कर्दळीवनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे. महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलीवन किंवा काडलीवन असे म्हटले जाते. एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही. कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला कर्दळीवन म्हणतात हा समज चुकीचा आहे. श्रीनृसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्दळीवनात गेले, त्या बुट्टीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते.


कर्दळीवन परिक्रमा मार्ग

कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि. मी. चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्य येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण १० ते १२ कि. मी. वर अक्कमहादेवी गुंफेकडे जाणारा मार्ग आहे. पण हा प्रचलितच नाही. व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील १० ते १२ कुटुंबियांची कच्ची घरे आहेत. कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळते. गरज असल्यास सामान वाहण्यासाठी सेवेकरी मिळतात. त्यांना योग्य ते मानधन द्यावे लागते. एका दिवसाची ५०० रु. एवढी रक्कम ते घेतात. तसेच वाट दाखविण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात. मात्र या सर्वांची भाषा तेलगू आहे. एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते. येथे आधी सांगितल्यास चहा, नाष्टा, निवासही करता येतो. मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय, संडास, बाथरूम, गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही. तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे साहाय्य उपलब्ध करून देतात. सध्या मोबाईल सेवेमुळे त्यांचेशी संपर्क साधून आधी व्यवस्था करता येऊ शकेल.

श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्रीदत्तप्रभू व श्रीस्वामी-समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसर टप्पा ६ कि. मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मधे थोडाफार चढ-उतार येतो. मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या रस्त्याची सुरूवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. हा वृक्ष ५००० वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे.


कर्दळीवन परिक्रमेसंबंधी नियम आणि सूचना

कर्दळीवनामध्ये आधी जाऊन आलेल्या जाणकार व्यक्तीबरोबरच जावे.
किमान १०-१२ जणांचा ग्रुप असेल तरच कर्दळीवनात प्रवेश करावा.
अगदी गरजेपुरतेच व स्वत:ला उचलता येईल एवढेच सामान बरोबर असावे. अंथरूण-पांघरूण, पाण्याच्या बाटल्या बरोबर घेणे आवश्यक आहे. तसेच सुका फराळ, चिवडा, लाडू असे खाद्यपदार्थ जवळ असावेत.
डोंगर चढणीचा मार्ग असल्याने हातात काठी असावी. डोक्यावर टोपी वा पंचा असावा.
स्वत:ला लागणारी नेहमीची औषधे, आवश्यक कपडे, पोथी, पूजासाहित्य, फोटो. इ. जवळ असावेत.
जाता-येता समूहानेच असावे. एकट्या दुकट्याने पुढे जाऊ नये किंवा मागे राहू नये. आपल्या गटापासून हाकेच्या अंतरावर राहावे.
वाटेत दिसणाऱ्या वारुळांना, वृक्षांना काठी मारू नये, तसेच जंगलातील कोणत्याही पशू, पक्षी, प्राणी यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये.
कर्दळीवन परिक्रमे दरम्यान राजकीय, भौतिक व घरगुती चर्चा कटाक्षाने टाळाव्यात, वाद घालू नयेत.
रात्रीच्या मुक्कामात एकटे बाहेर जाऊ नये. दोन तीन जणांना बरोबर घेऊनच जावे. सोबत प्रखर उजेडाची बॅटरी हाती घ्यावी.
कर्दळीवन परिक्रमा करत असताना श्रीगुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि आपल्या आवडत्या ग्रंथाचे वाचन करावे.
जाताना आपण जितके दिवस राहणार आहोत त्यासाठी किमान लागणारा तांदूळ, रवा, पोहे, बटाटे, चहा-साखर इ. तसेच सर्वांसाठी मोठी ताडपत्री, पातेली, पत्रावळी वगैरे बरोबर घ्यावे.

कर्दळीवन परिक्रमेमध्ये प्लॅस्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी आहे. कोणतीही प्लॅस्टीकची वस्तू बरोबर घेऊ नये. काही अपरिहार्य कारणामुळे प्लॅस्टिकची वस्तू घ्यावी लागल्यास ती येताना परत आणावी. काही झाले तरी कर्दळीवनात टाकू नये.
कर्दळीवन परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू, सिगारेट, विडी, गुटखा, पानमसाला, सुपारी खाण्यास बंदी आहे. तसेच दारू आणि इतर अमली पदार्थांच्या सेवनाला सक्त मनाई आहे. कोणतीही व्यक्ती व्यसन करताना आढळल्यास जबर दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते.
कर्दळीवनात श्रीअक्कमहादेवी गुहा आणि श्रीस्वामी-समर्थांचे मूळ स्थान या ठिकाणी स्नान करताना कोणत्याही प्रकारे अंगाला साबण, कपड्यांचा साबण वापरण्याला बंदी आहे. तसेच शॅम्पूचे सॅशे, तेलाच्या बाटल्या, पाऊच तेथे नेऊ नयेत. कोणत्याही रसायनांचा वापर तेथे करू नये. त्यामुळे तेथील पवित्रतेला बाधा येते हे ध्यानात घ्यावे. कोणीही या गोष्टींचा वापर करताना आढळल्यास जबर दंड आणि तुरुंगवास अशी शिक्षा होऊ शकते.

कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. तेथील वातावरणात दिव्य लहरी आणि दैवी स्पंदने भरलेली आहेत. कर्दळीवन हे संपूर्ण जगातील फार मोठ्या आध्यात्मिक शक्ती केंद्रांपैकी एक अद्वितीय केंद्र आहे. या ठिकाणी आकर्षण-शक्ती फार जास्त प्रमाणात आहे. तेथे जाण्यासाठी आणि एकदा गेल्यावर पुन्हा जाण्यासाठी जबरदस्त ओढ लागते. कर्दळीवन ही देवभूमी आहे. तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे. कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे. श्रीस्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताने श्रीस्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या कर्दळीवनास भेट देऊन जेथून श्रीस्वामी समर्थ आले तेथील दैवी स्पंदनाचा अनुभव घेतला पाहिजे.


कर्दळी वनाबाबत एक वेगळा मतप्रवाह

जे कर्दळीवन आज दाखवले जाते त्याचा व श्रीगुरुचरित्रातील कर्दळीवनाचा काहीही संबंध नाही. श्रीदत्तसंप्रदयातील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या श्रीवामनराज त्रैमासिकाच्या कार्तिक शके १९३५ च्या अंकामध्ये छापलेल्या ‘कृष्णातिरीच्या वसणा-या’ या प्रवचनात याविषयी खूप मौलिक माहिती दिलेली आहे. जिज्ञासूंनी सदर प्रवचन आवर्जून वाचावेच. त्यात ते म्हणतात, “मूळ कर्दळीवन नामक दिव्य तपोभूमी ही प्रत्यक्ष श्रीदत्तलोकातच आहे, आणि त्या श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात जाण्याचा मार्ग हा श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगामधूनच सुरू होतो. त्या लिंगात योगबलाने प्रवेश केला असता तेथून थेट श्रीदत्तलोकातील त्या दिव्य कर्दळीवनात जाता येते. श्रीदत्तसंप्रदायाच्या सांकेतिक भाषेत, स्थूलमानाने श्रीमल्लिकार्जुन लिंग आणि त्याभोवतीच्या साडेतीन कोस परिघाच्या परिसरालाच ‘कर्दळीवन’ असे म्हणण्याचा प्रघात आहे!”
भगवान श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज वर वर्णन केलेल्या पध्दतीनेच श्रीदत्तलोकातील कर्दळीवनात निघून गेले. लौकिक अर्थाने ते पृथ्वीतलावरून अदृश्य झाले. पण ज्यांना श्रीदत्तसंप्रदायाचे रहस्यच माहीत नाही; खरा संप्रदाय माहीत नाही असे लोक व्यर्थच पाताळगंगेच्या पैलतीरावरील अघोरी उपासना चालणा-या व त्याज्य मानलेल्या कर्दळवनाचा स्वतःच्या फायद्यासाठी सध्या खूप प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. कलियुगाचा विचित्र महिमा म्हणूनच की काय, अशा स्थानांशी अनेक दंतकथांचा संबंध जोडून आज शेकडो लोक भलत्याच कर्दळीवनाच्या यात्रा करीत आहेत.

सध्याच्या काळात कर्दळीवन यात्रा हा फार मोठा धंदा झालेला आहे. अनेक धूर्त लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. भोळ्या भाविक लोकांना भावनिक स्तरावर ब्लॅकमेल करून, त्यांच्या श्रध्देशी खेळून या यात्रेला येण्यासाठी भरीस पाडले जात आहे. एवढेच नाही तर, सरकारी अभयारण्य असलेल्या या कर्दळीवनाच्या विकासासाठी संघ, संस्था, गोशाळा इत्यादी स्थापून त्यांच्या नावावर देश-विदेशातून बख्खळ पैसा जमवला जात आहे. ही भाविक भक्तांची घोर फसवणूकच आहे. भाविकांनी असल्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये.
गेल्या एक-दोन वर्षात या कर्दळीवनाचे खोटेच माहात्म्य सांगणारे अनेक ग्रंथ बाजारात आलेले दिसतात. पध्दतशीर मार्केटिंग करून, लोकांच्या मानसिकतेवर वारंवार मारा करून या ग्रंथाच्या हजारो प्रती खपवल्या जात आहेत. लोकांच्या श्रध्देशी खेळून, त्यांची हकनाक दिशाभूल करुन आपली तुंबडी भरण्याचा हा हीन उद्योग किळसवाणाच आहे. अशा एकजात सर्व पुस्तकांमध्ये छापलेले अनुभव देखील अतिशय सामान्य स्तरावरील भावनिक व मानसिक खेळच आहेत. शास्त्रांच्या दृष्टीने त्यांना अनुभव देखील म्हणता येणार नाही. ते शुध्द कल्पनाविलासच आहेत. पण व्यवहारात जेव्हा अशा गोष्टी विविध माध्यमांमधून वारंवार समोर येतात, तेव्हा स्वाभाविक मानसिकता म्हणून मग लोकांना त्यात तथ्य असावेसे वाटू लागते. हीच पध्दत वापरून खोट्या नाट्या प्रसिध्दीचा पध्दतशीर अवलंब करून सध्या कर्दळीवन यात्रांचा धंदा तेजीत चालू आहे.
आज जे कर्दळीवन ‘महान पवित्र ठिकाण’ म्हणून दाखविण्यात येते. तिथे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कधीच गेलेलेही नाहीत. मग तेच श्रीस्वामी समर्थ म्हणून तेथून पुन्हा प्रकटले, हेही खोटेच ठरते. शिवाय ते स्थान अपवित्र, अयोग्य म्हणूनही मानलेले आहे. अशा ठिकाणी मोठ्या श्रध्देने यात्रा करून, प्रचंड कष्ट सोसून काय पदरात पडणार? जंगलात निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर मग कर्दळीवनच कशाला हवे? इतरही जंगले आहेतच की! एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. श्रीदत्तसंप्रदायातील कारंजा, पीठापूर अशी स्थाने प्रथमतः प. प. श्रीमत् टेंब्येस्वामींनी शोधून काढली. कुरवपूर, नृसिंहवाडी, औदुंबर इत्यादी प्रमुख श्रीदत्तस्थानांचा विकासही त्यांनीच करवला. पण त्यांनी या कर्दळीवनाचा साधा उल्लेखही कुठे केलेला नाही आपल्या वाङ्मयात. ते आसेतुहिमाचल भ्रमण करीत असताना मल्लिकार्जुनाला गेले पण कर्दळीवनात अजिबात गेले नाहीत. म्हणजे जे स्थान त्यांना मान्यच नव्हते, त्याचे महत्त्व (?) आजच्या या लोकांच्या आध्यात्मिक प्रगतीची स्वत:हूनच ठेकेदारी घेतलेल्या तथाकथित बाजारबुणग्यांना जाणवले; असे म्हणायचे का? का या थोर (?) महाभागांचा अधिकार श्रीमत् टेंब्येस्वामींपेक्षा मोठा आहे? असल्या या तद्दन भंपकपणाला भाविकांनी अजिबात भीक घालू नये आणि कर्दळीवनाच्या यात्रांच्या फंदातही पडू नये, हीच कळकळीची विनंती! प्रचंड हाल-अपेष्टा सोसून या कर्दळीवनात यात्रेला जाण्यापेक्षा घरी बसून केलेली यथाशक्य उपासना देखील जास्त लाभदायक ठरेल!
प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या प्रवचनातून या भयंकर प्रकाराला सर्वप्रथम वाचा फोडलेली असून, फार मोलाची माहिती त्यात सांगितलेली आहे. भाविकांनी ती मुळातून वाचावी व असल्या भलत्याच यात्रांच्या भानगडीत पडून आपली आर्थिक, मानसिक आणि भावनिक फसवणूक करून घेऊ नये. यासाठीच अत्यंत तळमळीने हा लेखन-प्रपंच करीत आहे. संतांच्या ग्रंथातील वरवर न समजणारी रहस्ये अधिकारी विभूतींकडूनच समजून घेतली पाहिजेत. विद्वान असेल पण सद्गुरुकृपा व संप्रदायोक्त साधना नसेल तर अशांच्या म्हणण्याला काडीची किंमत नसते. आज प्रचंड खप होणारी ही कर्दळीवनाबद्दलची सर्व पुस्तके भलतीच माहिती सांगणारी आहेत. त्यात संप्रदायाला धरून काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे उगीचच अशा भूलथापांना, कल्पनाविलासाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, ही सादर विनंती!
अशा कोणत्याही गोष्टींना, आपल्या सारासार विवेकाच्या मोजपट्टीवर व अधिकारी संतांच्या आधाराने तपासून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा, त्यातच आपले खरे हित असते!


श्री क्षेत्र कर्दळीवन समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *