श्री क्षेत्र गरुडेश्वर

श्री क्षेत्र गरुडेश्वर

स्थान: ता. नंदोड गुजराथ, बडोदा-राजपिंपला मार्गावर, नर्मदा किनारी.
त्पुरूष: श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती.
विशेष: श्री वासुदेवानंद सरस्वती समाधी स्थान. दत्तमंदिर, गरुडेश्वर महादेव, नारदेश्वर महादेव, श्री टेम्बे स्वामी पादुका, रोटेश्वर महादेव.

श्री क्षेत्र गरुडेश्वर स्थान माहात्म्य

या स्थळी पूर्वीच्या अति बलशाली असा गजासूर राक्षस रहात होता. त्याने हत्तीचे रूप घेऊन गरूडाशी भीषण युद्ध केले या युद्धात गरूडानी गजासूराचा जीव घेतला. त्याची हाडे पर्वतावर पडून राहिली. कालांतराने त्याची हाडे नर्मदेत वाहून आल्याने त्याचा देह पवित्र झाला. गजासूराने नर्मदा नदीत राहून १०० वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे भगवान शंकर त्यावर प्रसन्न झाले. भगवान शंकराने गजासूरास सांगितले, ‘मी तुझ्या भक्तिमुळे संतुष्ट झालो आहे, हवा तो वर माग’ तेव्हा गजासूराने असा वर मागितला कि जे कोणी या ठिकाणी स्नान संध्या, देवपूजा, तर्पण, तसेच दान करेल त्याचे पाप नष्ट होईल. अमावस्या, संक्रांति, विशेष पर्व, ग्रहण आणि अधिक महिन्यात, रवि-सोमवारी जे स्नान करतील त्यांना अन्य क्षेत्रीच्या लाखपट फळ मिळेल आणि केवळ स्नान करण्याने प्राणीमात्रांच्या पापाचे परिमार्जन होईल. हे स्थळ कुरूक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध होईल. आपला श्रेष्ठ गण म्हणून मला स्थान द्या. तसेच माझ्या शरीराचे कातडे (चर्म) आपण धारण करा. गरूडाच्या हातून माझा मृत्यु झाला आणि मला हा अलभ्य लाभ प्राप्त झाला. म्हणून आपले नाव गरूडाबरोबर जोडून या ठिकाणी वास करून सद्भक्तांची मनोकामना पूर्ण करावी.
गजासूराची प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले, ‘तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी मी तुझ्या शरीराचे कातडे घालीन, तसेच या स्थानी राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करीन. तू त्या स्थळी गरूड नावाच्या लिंगाची स्थापना कर. जे ‘गरूडेश्वर महादेव’ या नावाने ऒळखले जाईल. तसेच तुझ्या गजदेहाची कवटी (खोपडी) नर्मदेत पाण्यात पडली, त्यामुळे तुझा देह दिव्य होऊन हा लाभ मिळाला. म्हणून ह्या नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर. जे ‘करोटेश्वर महादेव’ या नावाने प्रसिद्ध होईल. भगवान शंकराच्या आज्ञे प्रमाण गजासूराने एक लिंग पर्वतावर आणि दुसरे लिंग नर्मदाकिनारी स्थापन केले.

भगवान शंकरांनी पुन्हा म्हटले, ‘जे कोणी या दोन्ही लिंगाचे पूजन दक्षिण दिशेकडे तोंड करून भावनेने करतील, त्यास लगेच फळ देईन. शुक्लपक्ष आणि कृष्णपक्षाची अष्टमी आणि चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी भक्तिभावाने पूजन करून जागरण करतील, त्याच्या एकवीस पिढयांचा उद्धार करीन येथे नाभी पर्यंत नर्मदेच्या पाण्यात उभे राहून, जे पितृतर्पण करतील, त्यांच्या पूर्वजांना कैलासात घेऊन जाईन. येथे एका ब्राम्हणास भोजन घातले असता एक लाख ब्राम्हण भोजन घातल्याचे पुण्य देईन ज्यांच्या अस्थि (हाडे) नर्मदेत पडतील आणि त्या नर्मदेत राहीपर्यंत मी त्यास कैलासास नेऊन सुखी करीन. शेवटी श्रीमंताच्या घरी त्याला जन्म देऊन राजवैभवाचा अनुभव करवीन जर तो संपूर्णपणे निष्काम असेल तर विदेह कैवल्य (मुक्ति) प्राप्त करवीन. गजासूरा ! या विषयी कोणतीही शंका घेऊ नकोस. मी तुला माझ्या गणांमध्ये स्थान देईन. हे तीर्थ महात्म्य जे कोणी भक्तीभावनेने श्रवण करतील, त्याची सर्व पापातून मुक्ती करीन. असे सांगून भगवान श्री शंकर गुप्त झाले आणि विमानाने गजासूरास कैलासावर घेऊन गेले त्या दिवसापासून नर्मदेच्या उत्तर किनारी गरूडेश्वर क्षेत्राचे निर्माण झाले. करोटेश्वर मंदिराच्या पूर्वेस नारदेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी नारदांनी तपश्चर्या करून हरिहराला प्रसन्न केले होते ह्या स्थळी नारदजींनी लिंग स्थापित केले होते, जे ‘नारदेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरांनी, नारदांना वर दिला होता कि ‘नारदेश्वरांची पूजा करणाऱ्यास शिवपद प्राप्त होईल’ तसेच या स्थळी शास्त्राभ्यास किंवा योगाभ्यास लगेच सिद्ध होईल.

श्री क्षेत्र गरुडेश्वर व श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज

श्री दत्तप्रभूंचे उपासक आणि दत्तात्रेयांवर संस्कृत तसेच मराठी मध्ये विपुल लेखन संपदा करणारे आचरणनिष्ठ दंडी सन्यासी प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज शके १८३५ चैत्र वद्य षष्ठी शनिवारी गरूडेश्वर महादेव मंदिराच्या ओटयावर उतरले होते. तेव्हा येथे गाढ जंगल होते नंतर प. प. स्वामीजी एकांतात नारदेश्वर महादेव मंदिरात ध्यान- जपादि कार्य करण्यास जात असत. प. प. स्वामीजीचे वास्तव्य गरूडेश्वरी आहे, असे कळल्यावर स्वामीजींचे भक्त मोठया प्रमाणात गरूडेश्वरी येऊ लागले. ते वेदांत, धर्माचरण, ज्योतिषविद्या, आयुर्वेद वगैरे विविध विषयांवर प्रवचने करीत, तसेच भक्तांच्या समस्येवर योग्य मार्गदर्शन देत असत. सध्या समाधी मंदिराच्या जागी स्वामीजींची पर्णकुटी होती. त्रिविध तापांनी पीडित लोकांना स्वामीजी योग्य उपाय सुचवित असत. बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी श्री दत्तमूर्ती बनवून आणली, आणि प.प.स्वामीजींना अर्पण केली. श्री दत्ताज्ञेने त्यांची प्रतिष्ठा श्री रामचंद्रशास्त्री प्रकाशकर यांनी चार ब्राम्हणासह आश्विन शु.९ या दिवशी श्री धोंडोपंत कोपरकरांच्या हस्ते करविली. लहानशा सिंहासनावर विराजमान श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीची पूजा अर्चना आजही श्री दत्तमंदिरात होते.

वैशाख महिन्यात गांडाबुवांना भरूचहून बोलावून पू.स्वामीजीनी सांगितले ‘ह्या देहाचा भरोसा नाही, म्हणून ही मूर्ती वाडी किंवा गाणागापूर येथे जाऊन ठेवून या अथवा एखाद्या योग्य भक्तास दे’ त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाबुवांना स्वप्नात येऊन सांगितले, ‘येथे आम्हास कायम लीला करावयाचे आहे, म्हणून या स्थळी श्रद्धावंत भक्तांच्या मदतीने मंदीर बांधून घे. ह्या स्थानाचे महात्म्य वाडी, गाणगापूर प्रमाणे हळूहळू वाढेल म्हणून येथे मूर्ती ठेवून पुजाऱ्याची व्यवस्था कर. गांडाबुवांनी स्वप्नातील गोष्ट सांगण्यासाठी एक विनंतीपत्र तयार केले. ते प्रत्येक भक्तास दाखवून कोणाकडून ही पैसे न मागण्याची गोष्ट केली. नंतर श्री दत्तमंदिराची पायाभरणी प.प.स्वामीजीचे प्रियभक्त श्री छगनलाल कुबेरलाल भट्ट यांच्या हस्ते संवत १९७० वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी केली. आज श्री दत्तमंदिरात मध्यभागी श्री दत्तप्रभु तसेच त्यांच्या उजवीकडे पू. आद्य शंकराचार्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वती मातेची मूर्ती आहे. ह्या तीन्ही मूर्ती संगमरमरी आहेत, ज्यांची प्रतिष्ठा पू. ब्रम्हानंद स्वामींनी केली होती. पू.स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे. समाधी समोर श्री स्वामीजीच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे. १९१४ मध्ये गरूडेश्वर मुक्कामी नर्मदामातेच्या कुशीत समाधी घेतली. स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत म्हणूनच प्रत्येक दत्तभक्तांसाठी गरूडेश्वर हे श्रद्धास्थान आहे.

प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी समाधीस्थान

परम पूज्य टेंबे स्वामींनी अंतिमसमयी सेवा करणाऱ्या सेवकास कमंडलू, छाटी किंवा वस्त्रापैकी काय हवे ते मी तूला देतो असे म्हणाले. सेवेकराने मात्र पादूकांसाठी हट्ट धरला. प. पू. टेंबेस्वामींनी सांगितले की मी पाद्तत्राणे धारण करु शकत नाही. शेवटी मात्र सेवेकऱ्याला नर्मदामाईतील (नर्मदे हर हर) मोठा गोटा आणायला सांगितले. त्यावर प. पू. टेंबेस्वामी एक प्रहर म्हणजे तीन तास ऊभे राहीले. त्यांच्या पायाचे उमडलेले हे ठसे आहेत. सेवेकऱ्याने ह्या पादूका स्वत:च्या घरी न नेता मंदिरासमोर स्थापन केल्या. समाधी मंदिराचा जिर्णोद्धार करतांना पादूकांना समाधीसमोर स्थान दिले आहे. धन्य त्या पाषाणातील पादूका आणि धन्य तो सेवक.
दर्शनीय स्थळे

श्री गरूडेश्वर महादेव मंदिर, श्री करोटेश्वर मंदिर, श्री नारदेश्वर महादेव मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री समाधी मंदिर, श्री रंग कुटीर, श्री मन:कामनेश्वर महादेव मंदिर, पू. तात्याबाबा समाधी मंदिर, श्री नर्मदा मंदिर, श्री हनुमान (गुफा) मंदिर, श्री गायत्री मंदिर, श्री भाथीजी मंदिर, भादरवा (३ कि.मी.), पू. स्वामीजीनी तिलकवाडा येथे चातुर्मास केला होता, ते स्थळ (१८ कि. मी.), पैराणिक श्री शूलपाणेश्वराचे मंदिर ( ७ कि. मी.), नर्मदा धरण (१३ कि. मी.), श्री दशावतार मंदिर, रामपुरा (१५ कि. मी.).

आजि आनंद आनंद । मनी भरला पूर्णांनंद ।।१।।
वाचे बोलता तो न ये । बुद्धिबोध स्तब्ध राहे ।।२।।
नित्यानंद सद्गुरुरूपा । पाहता हरल्या जन्मखेपा ।।३।।
तया माझा नमस्कार । जेणे हरलो आपपर ।।४।।
ते हे वासुदेवचरण । हृदयी येता झालो धन्य ।।५।।

श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे साजरे होणारे उत्सव

गुढीपाडवा (चैत्र शुद्ध -१), पू. स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव (आषाढ शुद्ध १), स्वामी महाराजांची जन्म जयंती (श्रावण वद्य ५), जन्माष्टमी, श्री दत्त जयंती, दिवाळी, तुलसी विवाह, होळी, गंगा दशहरा, नृसिंह जयंती, शिवरात्री, नर्मदा पूजन, गुरूपोर्णिमा वगैरे.
या क्षेत्री असे जावे

या ठिकाणी योगीराज वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. हे स्थान नर्मदा नदीच्या तीरावर आहे. सर्व प्रमुख दत्त स्थानात या स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. एक अपत्य झाल्यावर पत्नीसह बालकाचे निधन झाले. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्तअवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला. असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले. दत्तसंप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते.

रस्ता मार्गाने: गुजरात राज्य परिवहन निगमची बस उपलब्ध, राजपिपळा, भरूच, अंकलेश्वर, वडोदरा, छोटाउदेपूर, बोडेली, लुणावाडा, डेडियापाडा, धरमपूर, शाहदा, नंदूरबार. (बडोद्याहून खासगी व शासकीय अशी व्यवस्था आधिक आहे)

रेल्वे मार्ग : अंकलेश्वर, भरूच, वडोदरा, डभोई, गरूडेश्वर येथे रेल्वे लाईन नसल्यानी उपरोक्त स्टेशनहुन रस्ता मार्गे गरूडेश्वरला येता येते.

विमान मार्गे : जवळील विमानघर वडोदरा, तेथून एक्सप्रेस हाईवे वरून डभोई रोड वरून रस्ता मार्गे येता येते.

निवास व्यवस्था
साधी खोली किंवा विशेष सोईची खोली ३ दिवसांसाठी मिळते. पारायण, अनुष्ठान वगैरे साठी सतत ७ दिवस खोली मिळविण्यासाठी साधकाने संपर्क करावा. नवीन धर्मशाळा बांधल्या जात आहेत. संस्थानतर्फे अतिशय माफक दरात व्यवस्था होते.

भोजन व्यवस्था
रोज दुपारी आरती नंतर अत्यंत माफक दरात भोजनशाळेत महाप्रसाद देण्यात येतो. प्रसादासाठी सकाळी ११:०० वाजेपूर्वी पास मिळविणे आवश्यक आहे.

श्री गरुडेश्वर दत्त संस्थान,
व्हाया राजपीपडा, गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा, पिनकोड- ३९३१५१, गुजरात.


श्री क्षेत्र गरुडेश्वर माहिती समाप्त


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४