श्री संत नागेबाबा मंदिर (श्रीक्षेत्र भेंडा)
भेंडा परिसरात अमूल्य कार्य करणारे, अनेक भक्तांना मार्गदर्शन करून त्यांना उत्तम जीवनमार्ग देणारे, समाजात आदर्श तत्वांचा प्रसार करणारे श्री संत नागेबाबा यांचे हे भव्य मंदिर. याच ठिकाणी श्री संत नागेबाबा यांनी इसवी सन १७०० मध्ये संजीवन समाधी घेतली. इथला शांत, रम्य व भक्तिमय परिसर भाविकांच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतो.
संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त इथे दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात. मंदिराच्या परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री महादेव, शनिदेव, श्री हनुमान यांचीही मंदिरे आहेत. भेंडा गावाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे या ३२५० एकर क्षेत्र असलेल्या गावात एकही आंब्याचे झाड नाही.
भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे हे देवस्थान अतिशय जागृत आहे. दरवर्षी श्री संत नागेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त व श्रावणी तिसऱ्या सोमवारी विविध अध्यात्मिक व सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहाचे राबवले जातात. श्रावणी तिसऱ्या सोमवारी २० ते २५ हजार लिटर आमटी प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराच्या जवळच भव्य असे श्री संत नागेबाबा भक्तनिवास आहे. नागेबाबा परिवार भक्तांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असतो.