श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर, पुणे
स्थळ: पुणे शहर, जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर
सत्पुरूष: प. प. सद्गुरू जंगलीमहाराज
विशेष: श्री जंगली महाराज समाधी, ध्वजस्तंभ
मंदिर परिसर
पुण्यनगरीत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व अग्रगण्य स्थान आहे. जंगलीमहाराज या नावात अशी काही जादू भरलेली आहे की दर्शक त्या स्थानाकडे आपोआप आकर्षिला जातो. जिमखान्यावरून निघालेल्या ८० फुटी प्रशस्त रस्त्याच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या अलीकडील विस्तीर्ण चौकाच्या थोड्या अलीकडे डाव्या हाताला थोड्याशा उंचवट्यावरील गर्द झाडीत हे स्थान असून जवळच पांडव लेणी उर्फ पाताळेश्वर लेणी ही गुंफाही आहे. नगारखान्यातील मंदिराच्या प्रवेशद्वारातून सतरा अठरा पायऱ्या चढून वर गेले की प्रशस्त पटांगण आणि पुढे फरसदार मंडप लागतो. पटांगणात डाव्या बाजूला जवळ जवळ पंच्याहत्तर फूट उंचीचा ध्वजस्तंभ असून भगवा ध्वज सदैव फडकत असतो. मंडप हंड्या, झुंबरांनी सुशोभित असून तेथेच डाव्या हाताला नगारा आणि उजव्या हाताला छोटेखानी पण टुमदार अशी समाधी आहे. ती त्यांच्या गुरुंची आहे असे कित्येकांचे म्हणणे आहे. नगाऱ्याच्या डाव्या हाताला एका छोटेखानी देवळात पादुकांची स्थापना करण्यात आलेली असून जंगली महाराज तेथे स्नान करीत असत असे सांगतात.
मंडपाच्या आतील बाजूस दोन-तीन पायऱ्या चढून गेले की दक्षिणोत्तर अशी प्रशस्त समाधी असून त्या समाधीच्या मागे जवळ जवळ नऊ-दहा फूट उंचीचे अतिभव्य आणि चित्ताकर्षक असे तैलचित्र आहे. वास्तविक ते तैलचित्र नसून प्रत्यक्ष महाराजच उभे आहेत असा नुसता भास नव्हे तर साक्षात्कार होतो. तासन् तास पहात राहिले तरी मनाचे समाधान होणार नाही. उलट मनाचा गूढपणा मात्र वाढतच जाईल. असे प्रभावी व्यक्तिमत्त्व ज्या तैलचित्रात दृष्टिगोचर होते ते चित्र म्हणजेच साक्षात श्री सद्गुरू जंगलीमहाराजच होय.
मानेपासून कमरेपर्यंत पाठीवर रुळणारा रेखीव जटासंभार, उभ्या गंधाने सुशोभित झालेली भव्य कपाळपट्टी, चंद्र-सूर्याचे तेज दर्शविणारे भावपूर्ण डोळे, सरळ तरतरित नासिका, कमल पाकळ्यांसारखे ओष्ठद्वय, उभट, गोल, रेखीव चेहरा, चटकन नजरेत भरतील असे कान, समर्थ पुष्ट अशी गर्दन, भरदार तसाच पिळदार देह, अलौकिकात भर घालणारे आजानुबाहुत्व आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी कसे भरलेले आहे यांची संपूर्ण कल्पना देणारी षड्दर्शन चक्रांकित अशी ती प्रतिमा पाहिली की त्या प्रतिमेवरून नजरच दूर होत नाही.
आज आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो. दर्शन करून पावन होऊ शकतो. पण पाऊणशे वर्षापूर्वी तेथे काय होते? ते शिवाजीनगरही नव्हते आणि शनिवारवाड्यासमोरचा आज आहे तसा नवा पूलही नव्हता. नदीच्या पलीकडे होत्या पेरूच्या बागा, फुलांचे ताटवे, बोरी बाभळीची वने आणि निवडुंगाचे आगर. मनुष्यवस्ती जवळजवळ नसलेली अशी एक निर्जन जागा. पण त्याच जागेवर श्री जंगली महाराज हाच एक चमत्कार घडला.
सद्गुरू श्री जंगलीमहाराज मंदिराची काही वैशिष्ट्ये
ध्वजस्तंभ
सद्गुरू श्रीजंगलीमहाराज यांचे मंदिरात प्रवेशद्वारातून सतरा-अठरा पायऱ्या चढून वर गेल्यानंतर डाव्या हाताला ‘ध्वजस्तंभ’ आहे. याच ठिकाणी पूर्वी कमी उंचीचा स्तंभ होता. तो हलू लागल्यामुळे त्यावर चढावयास धोकादायक व त्रासदायक होऊ लागल्यामुळे नवीन स्तंभाची उभारणी दि. १०-४-१९६७ (गुढीपाडवा) रोजी वैकुंठवासी ह.भ.प. सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर यांचे शुभहस्ते करण्यात आली. जवळ जवळ पाच फूट उंचीच्या षटकोनी सिमेंटच्या चौथऱ्यावर दोन फूट उंचीच्या कमलाकृतीत सध्याचा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला असून सोन्याचे पॉलिश केलेला कळस बसविलेल्या ह्या स्तंभाची उंची जवळ जवळ पंचाहत्तर फूट आहे. त्याठिकाणी भगवा ध्वज सदैव फडकत असतो.
वटवृक्ष
गुढी पाडवा दि. १०-४-१९६७ या दिवशी वैकुंठवासी ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांचे शुभहस्ते उजव्या हाताच्या धर्मशाळेजवळ एक छोटे वडाचे रोपटे लावण्यात आले. तेही आता चांगलेच फोफावले आहे.
बेलवृक्ष
अशाच प्रकारचे एक बेलाचे झाड, दत्तस्वरूपी विलीन झालेले दत्तयोगी पू. गुळवणी महाराज यांचे हस्ते (१९७२ मध्ये) मंदिरात त्यांचा सत्कार व त्याच वेळी हळदी कुंकू, तिळगूळ समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता त्या प्रसंगी लावण्यात आले होते. तो बेलवृक्ष आता पू. गुळवणी महाराज यांचे सतत आठवण करून देत आहे.
मुक्तद्वार मंदिर
सद्गुरू श्रीजंगलीमहाराज मंदिर हे सर्व धर्मीयांकरिता मुक्तद्वार मंदिर म्हणून प्रसिद्ध असून मंदिरात येणाऱ्या सर्व धर्मीय भक्तांना समानतेने वागविले जाते. त्यामुळेच अखिल भारतभर पसरलेली सद्गुरूंची भक्तमंडळी प्रतिवर्षी उत्सवप्रसंगी आतुरतेने धाव घेतात. सद्गुरूंनी इ.स. १८९० मध्ये समाधी घेतली तेव्हापासून आजमितीपर्यंत म्हणजे जवळ जवळ १२७ वर्षे झाली. मंदिरात समाधिस्थानाजवळ अखंड नंदादीप तेवत आहे.
सद्गुरू श्रीजंगलीमहाराज मंदिरातील कार्यक्रम
रोज सूर्योदयापूर्वी महाराजांचे समाधीस मंगलस्नान घालून गंधलेप पूजा केली जाते. गलफ चढविण्यात येऊन पुष्पहार घालण्यात येतात. त्यानंतर सद्गुरूंची कापूर आरती केली जाते. आरतीचा हा सोहळा आल्हाददायक असतो. रोज माध्यान्ही भक्तजनांकडून येणारा नैवेद्य सद्गुरूंना समर्पण केला जातो. सूर्यास्तास आरती व सायंप्रार्थना होते. रोज रात्री ठीक नऊ वाजता पंचपदी होऊन शेजारती केली जाते. रोज सकाळ संध्याकाळ आरतीनंतर आणि गुरूवारी संपूर्ण दिवस प्रसाद वाटण्यात येतो. प्रत्येक गुरूवारी तर पहाटे पाचपासून रात्री बारापर्यंत हजारो भक्त दर्शनासाठी येतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदा, विजयादशमी आणि नरकचतुर्दशी या दिवशी महाराजांचे समाधीस अभ्यंगस्नान घालण्यात येते. यावेळी भक्त मंडळी फार मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सद्गुरूंनी समाधी घेतल्यापासून प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा करण्यात येतो व पंधरा दिवस चालतो. नित्य पूजाअर्चाव्यतिरिक्त अखंडवीणा, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, गायन, भजन असे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात. ज्यादिवशी सद्गुरूंनी समाधी घेतली त्याचे आदले रात्री फार मोठा जनसमुदाय उपस्थित राहतो. त्याच दिवशी खिरीचा प्रसाद वाटण्यात येतो. या प्रसादासाठी दूरदूरचे भक्त मुद्दाम आलेले असतात. अशा प्रकारे प्रतिवर्षी होणाऱ्या पुण्यतिथी सोहळ्यास भक्तगण एकत्र येऊन सेवेचा लाभ घेतात.
दर गुरूवारी आणि चातुर्मासातील एकादशीस रात्री भजनाचा कार्यक्रम होत असतो. ह्या भजनात भांबुर्डा गावठाणातील व इतर ठिकाणची भजनी मंडळी भाग घेत असून गेली ८८ वर्षे ही परंपरा अखंडपणे चालू आहे. मंदिरात होणारा भजनाचा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण म्हणण्याचे कारण त्याचा प्रत्यक्ष लाभ घेतल्याशिवाय त्याची कल्पना येणार नाही. सद्गुरूं कडे ज्या भावनेतून पहावे त्या भावनेप्रमाणे भक्तांना ते दिसतात. येथे येऊन असंख्य भक्तांना आपल्या इच्छापूर्तीचा आनंद मिळत असतो. भक्तांना येणारी प्रचिती हे तर खास वैशिष्ट्य आहे. दररोज नित्य नियमाने विशिष्ट वेळीच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तमंडळीत ५० ते ६० वर्ष नियमित येणारी मंडळी आहेत. जंगली महाराज मंदीर व मंदीराबाहेरील परिसर अत्यंत रम्य मनोहर व मांगल्याने परिपूर्ण आहे.
श्री गुरूपादुकाष्टक
(भजनानंतर हे अष्टक नेहमी म्हटले जाते)
ज्या संगतीने विराग झाला । मनोदरीचा जडभास गेला ।
साक्षात परमात्मा मज भेटवीला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ १॥
सद्योग पंथे परि आणियेले । अंगेच माते परब्रह्म केले ।
प्रचंड बोध तो रवि उदेला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ २॥
चराचरी व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची ।
परंपदी पूर्ण संगम झाला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ३॥
जो सर्वदा गुप्त जनात वागे । प्रसंग भक्ता निजबोध सांगे ।
सद्भक्ति भावाकरिता भुकेला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ४॥
अनंत माझे अपराध कोटी । नाही मनी घालूनि सर्व पोटी ।
प्रबोधिता त्या श्रम फार झाला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ५॥
काही मला सेवाहीन झाले । तथापि तेणे मज उद्धरिले ।
आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ६॥
माझा अहंभाव असे शरीरी । तथापि तो सद्गुरू माझा अंगिकारी ।
नाही मनी अल्प विकार ज्याला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ७॥
आता कसा मी उपकार फेडू । हा देह ओवाळूनि दूर सांडू ।
म्या एकभावे प्रणिपात केला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ८॥
जया वाणिता वाणिता वेदवाणी । म्हणे नेति तिला जे दुरूनी ।
नाही अंत ना पार ज्याच्या रूपाला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ ९॥
जो साधुचा जीव अंकित झाला । त्याचा असे भार निरंजनाला ।
नारायणाचा भ्रम दूर केला । विसरू कसा मी गुरू-पादुकाला ॥ १०॥