शिळा मंदिर लोहगाव (पुणे) – Shila mandir lohagav (Pune)

शिळा मंदिर लोहगाव (पुणे)

 

लोहगाव हे संत तुकाराम महाराजांचे आजोळ. तुकाराम महाराजांचे लोहगावला नेहमी जाणे येणे होते. तुकोबांचा आणि लोहगावचा संबंध महीपती बाबांनी सुद्धा भक्ती विजय या ग्रंथात वर्णन केलेला आहे. तूकोबा लोहगावला गेल्यानंतर ज्या शिळेवरती बसून स्नान करीत त्या शिळेचा उल्लेख महिपती बाबांच्या भक्ती विजय या ग्रंथामध्ये येतो. सद्गुरु वीरनाथ महाराज औसेकर आणि शंभर एक वारकरी मंडळी आळंदी आणि आळंदीहून पुढे लोहगावात गेले. लोहगावी गेल्यानंतर त्यांनी तुकोबांच्या आजोळ घराविषयी आणि या शिळे विषयी काही वयोवृध्द मंडळींना विचारले यावर ग्रामस्थांकडून स.विरनाथांना असे समजले की ती शिळा कोठे आहे .

आता काही त्याची कल्पना नाही. आपणच सांगावे ती कोठे आहे .यावर स. विरनाथ महाराज म्हणाले की गावाती कुंभाराचे घरी कुंभारचे मातीची भांडी घडवण्याचे चक्र आहे. या चक्राच्या खाली जमिनीत आठ गज अंतरावरती ती शिळा आहे. स. विरनाथांचे हे बोल ऐकून काही टवाळ मंडळींनी प्रतिप्रश्न केला. असे जर झाले नाही तर काय करावे ?यावर स.वीरनाथ महाराज म्हणाले जर जमिनीखाली शिळा नाही सापडले तर आपण मला दंड करावेत आणि ग्रामातून बाहेर काढावे. ग्रामस्थ मंडळींनी विरनाथांनी सांगितलेल्या जागेवरती खणण्यास सुरुवात केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ गज अंतरावरती खाली जमिनीमध्ये शिळा सापडली. या शिळेचे विरनाथ महाराजांनी आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलेला आहे. आजही लोहगाव मध्ये हे शिळा मंदिर पहावयास मिळते.

यानंतर पुढे काही दिवस विरनाथ महाराजांचा लोहगावी मुक्काम होता. लोहगाववरून विरनाथ महाराज निलावती (निलंगा) या ठिकाणी जाण्यास निघाले असता ग्रामस्थांनी त्यांना काही दिवस राहण्याची विनंती केली. विरनाथ महाराजांनी सांगितले की आदिनाथ षष्ठीचा जो कृपाप्रसाद विठुरायाकडून मिळालेला आहे तो उत्सव जवळ आला आहे आणि म्हणून उत्सवासाठी जावे लागेल. परंतु ग्रामस्थांनी विरनाथ महाराजांना लोहगावातच राहून हा उत्सव करावा अशी विनंती केली.

यानंतर निलावती नगरीतून आदिनाथांचा प्रसाद पालखीमध्ये दिंडीसह लोहगाव आणण्यात आला आणि लोहगाव मध्ये नाथषष्ठीचा उत्सव संपन्न झाला .पुढील तीन वर्ष ग्रामस्थांच्या आग्रहाखातर नाथषष्ठीचा हा उत्सव लोहगावातच संपन्न झाला .या उत्सवाला आळंदीचे हैबतबाबा आले होते असा उल्लेख विरनाथ महाराज चरित्र ग्रंथांमध्ये आहे.

प्रा.अपर्णा गुरव


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या