रामेश्वर मंदिर धर्मवीरगड पेडगाव
रामेश्वर मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्थ खांबावर तोललेले आहे. सभामंडपात भव्य दगडी कासव आकारलेला होता. गर्भगृहात पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची ३ फुटी मूर्ती ठेवलेली आहे, तर उजव्या बाजूला एक ३ जैन तिर्थंकरांची मुर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीला एक गणेशाची २.५ फुटी मुर्ती टेकून ठेवलेली आहे. बाकीची दोन गर्भगृहे रिकामी आहेत.
सभामंडपातील रंगशीळा तोडलेली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला दोन मूर्ती आहेत, पण त्या झिजलेल्या असल्याने ओळखता येत नाहीत. त्यातील उजव्या बाजूची मूर्ती नरसिंहाची असावी. मंदिरासमोर फुलझाडे लावलेली आहेत. काळाच्या ओघात बरीच मोडतोड झाली आहे. मंदिराचा कळस कोसळलेला आहे. चोरीच्या उद्देशाने बन्याच वेळा मंदिराचे उत्खनन झाले आहे. अजूनही होत आहे. मंदिर संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे.