प्राचीन राघवेश्वर मंदिर कोपरगाव शहरापासून पश्चिमेला जेमतेम ८ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरीच्या तीरावर उभे आहे. हे मंदिर अंदाजे १३ व्या शतकातील असावे. मंदिर अखंड शिळेमध्ये आहे व त्यावर अप्रतिम कलाकुसर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत देखणे आणि आकर्षक शिल्पाकृती वितान म्हणजे सिलिंग.
मंदिर गोदावरीच्या काठावर असून नदीपासून पंचवीस फूट उंचावर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेस आहे. एक दरवाजा पश्चिमेसही आहे. मंदिराचा सभामंडप पस्तीस फूटांचा असून गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सभागृहाला बारा खांब आहेत, त्यावर विविध धार्मिक प्रसंग व देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्टकांमध्ये नवग्रहांच्या मूर्ती आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार पेशव्यांच्या फौजा पुण्याहून ग्वाल्हेरला पुणे, संगमनेर, वावी, मंजुर, मुखेड, येवला या मार्गानि जात, तेव्हा त्या राघवेश्वर मंदिर परिसरात काही काळ थांबत. पुरंदरे यांनी त्या मंदिराची पाहणी केलेली आहे. गोदावरीला वारंवार येणाऱ्या पुरोचे हे मंदिर साक्षीदार आहे. मंदिराचे बांधकाम भक्कम स्थितीत आहे.
ref: discovermh