पावन गणपती मंदिर खंडाळा – pavan ganapati mandir khandala

पावन गणपती मंदिर खंडाळा

 

श्रीरामपूर संगमनेर या राजमार्गावर खंडाळा गांव असून येथील गणपती – मंदिराला अनेक वर्षांची परंपरा लाभली आहे. विघ्नहर्ता देवस्थान या नावाने ते सर्वदूर प्रसिद्ध पावले आहे. या मंदिराविषयी शेती महामंडळामधील जाणकार व जेष्ठ व्यक्तींकडून मिळालेली माहिती अशी की, “खंडाळा गावापासून २ कि.मी. अंतरावर श्री. वाणी यांची शेती होती. ही शेती श्री. दादासाो. डहाणूकर यांनी खंडाने घेतली होती, तसेच खंडाळा, टिळकनगर या परिसरातील शेतजमिनीही खंडाने घेतल्या. श्री. दादासाो. डहाणूकर यांनी टिळकनगर येथे साखर कारखाना सुरू करून त्यांच्या उद्योग समुहाची देखभाल करण्यासाठी वर्क्स मॅनेजर म्हणून श्री. पालेकर सो. यांची नियुक्ती केली होती. श्री. पालेकर साो. खंडाळा आणि परिसरामधील डहाणूकर उद्योग समुहाची देखभाल करीत असतांनाच्या कालावधीत श्री. पालेकर साो. यांना स्वप्नात एका लहान गणपतीच्या मूर्तीचा दृष्टांत झाला.

तेव्हा त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना जमिनीत मूर्ती शोधण्यास सांगितली. दरम्यान शेतामध्ये शेतकरी नांगरणी करीत असतांना त्यास एक लहान व सुंदर गणपतीची मूर्ती दिसली. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सन १९५२ साली पौष पौर्णिमेला श्री. पालेकर साो. यांच्या हस्ते लिंबाच्या झाडाखाली करण्यात आली. त्याच वेळेस त्यांनी या गणपतीला नवस केला होता व त्यांच्या नवसाला हा गणपती पावन होऊन काही दिवसांनी तेथे मातीच्या भेंडयाची व पन्हाडयाचे मंदिर वजा बांधकाम करण्यात आले.”

सन १९६५ साली माजी मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांचेकडून सर्व शेतजमिनी कायद्याप्रमाणे ताब्यात घेऊन तेथे शेती महामंडळ स्थापन केले. नंतर शेती महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी सन १९७२ साली कामगारांच्या देणगीतून मंदिराचे पक्के विट बांधकाम केले. आता सध्या शेती महामंडळाच्या शेतीमध्ये गणपतीचे मंदिर असून या गणपतीचा जिर्णोद्धार सन १९९७ साली करण्यात आला व या नवीन मंदिराचे भूमिपूजन कामगार नेते श्री. अविनाश आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिराच्या बांधकामासाठी मुंबई, अहमदनगर, श्रीरामपूर, खंडाळा, राहता, राहुरी व आजुबाजूच्या असंख्य भाविकांनी आर्थिक सहाय्य दिले असून सदरहू मंदिराचे बांधकाम सुंदर व सुबक झाले आहे.

या गणपतीचे देवस्थानासाठी सध्या शेती महामंडळाचे अकरा व्यक्तींचे मंडळ कार्यरत असून महिन्याचे प्रत्येक संकष्टी व अंगारकी चतुर्थीचे मिळालेल्या दानपेटीतील रकमेने सध्या मंदिराचा विकास चालू आहे. या गणपती मंदिरामध्ये दरवर्षी पौष पौर्णिमेला अभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. मंदिराची स्थापनेची दिवशी सुरूवातीला १०० ते १५० भाविक साधारणपणे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येत असत. परंतु, नंतर या नवसाला पावणाऱ्या गणपतीची प्रचिती बऱ्याच भाविकांना आल्यानंतर दिवसेंदिवस गणेश भक्तांची संख्या वाढतच चालली असून साधारणपणे आता प्रत्येक संकष्टी चतुर्थीला दोन ते तीन हजार व अंगारकी चतुर्थीला साधारणपणे पाच हजार भाविक श्री गणेश दर्शनाचा लाभ घेतात. तसेच काही भाविक अभिषेक करून प्रसादाचा वाटपही करतात.

श्री गणपती मंदिराची व परिसरातील शेती महामंडळाची माहिती जानेवारी २००० मध्ये दूरदर्शनवर “आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात दाखविण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने या स्थळास ‘पर्यटन स्थळ’ म्हणून घोषित केले असून या पर्यटन स्थळास महाराष्ट्र शासनाने १९ लाख ५५ हजार इतका निधी विकासासाठी घोषित केला असून या ठिकाणी भक्तांची जास्त वर्दळ वाढणार आहे.

“श्री गणराय” हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आराध्य दैवत असून राज्यात अनेक ठिकाणी श्री गणेशाची मंदिरे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा या गावामध्ये श्री गणेशाचे मंदिर असून या गणेशाची महती दिवसेंदिवस वाढत चालली आहे व या भागातील असंख्य भाविकांचे ते श्रध्दास्थान बनलेले आहे.

हे देवस्थान श्रीरामपूर तालुक्यात असून श्रीरामपूर शहरापासून १० कि.मी. अंतरावर असून श्रीरामपूर शहरापासून ३३ कि.मी. अंतरावर शिर्डी येथे श्री साईबाबांचे पवित्र मंदिर असून, २२ कि.मी. अंतरावर पुणतांबा येथे श्री. चांगदेव महाराज यांचे मंदिर आहे. ६० कि.मी. अंतरावर श्री. शनी महाराज यांचे जागृत देवस्थान शनी शिंगणापूर येथे आहे तसेच, श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबास टेकून ‘ज्ञानेश्वरी’ हा पवित्र व अनमोल ग्रंथ लिहीला ते पैस मंदिर असलेले नेवासा शहर ४० कि.मी. अंतरावर असून, त्रिमूर्ती श्री. दत्त गुरू यांचे प्रसिद्ध मंदिर देवगड येथे असून ते साधारणपणे ४७ कि.मी. अंतरावर आहे. ही सर्व पवित्र तिर्थस्थाने असून श्री गणेश देवस्थान, खंडाळा या पवित्र तिर्थस्थानाची त्यात भर पडलेली आहे.

मध्यंतरी श्रीरामपूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. जयंतरावजी ससाणे यांचे आमदार निधीतून श्रीरामपूर संगमनेर राजमार्गापासून मंदिराचे परिसरापर्यंत २ कि.मी. – रस्त्याचे डांबरीकरण व सौरऊर्जेवर चालणारे पाच दिवे बसविलेले आहेत. परंतु सदरहू देवस्थानाचा अधिक विकास व्हावा अशी त्यांची महत्वाकांक्षा असून ते ही या गणेशाचे परमभक्त आहेत. परंतु सदरहू रक्कम विकासाच्या दृष्टीने तुटपूंजी पडत असून या जागृत देवस्थानाच्या विकास कार्यासाठी मेडिटेशन हॉल, प्रसादासाठी स्वयंपाकघर, प्रसादालय, भाविकांसाठी शौचालय आणि सुंदर व सुबक उदयानाचे बांधकाम करण्यात यावे अशी सर्व भाविकांची इच्छा असून त्या दृष्टीने वास्तुशिल्पकार व वास्तुरचनाकार श्री. जे. एन्. साळुंके यांनी स्वेच्छेने बांधकामाचे आराखडे तयार करून दिले असून या देवस्थानासाठी, उदयानासाठी व पार्किंगसाठी शासनाने शेती महामंडळाकडून जमीन उपलब्ध रून द्यावी व या सर्व कामासाठी शासनाकडून विकासनिधी पुरविण्यात यावा अशी सर्व भक्तगणांतर्फे विनंती.