parali vaijnath information marathi
परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.
एकदा रावण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करतो. महादेव रावणाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगतात. तेव्हा रावण अतुल शक्तीचे आणि लिंग रुपात महादेवाने लंकेत राहावे असा वर मागतो. महादेव रावणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला दैवी शक्ती प्रदान करतात आणि एक लिंग रावणाला लंकेत जाऊन स्थापन करण्यासाठी देतात. परंतु महादेव रावणाला सांगतात की, ‘हे लिंग लंकेत नेण्यापूर्वी पृथ्वीवर जेथे टेकेल तेथेच माझे कायम वास्तव्य राहील.”
रावणाने महादेवाचे म्हणणे मान्य केले. परंतु शिवलिंग खूप जड असल्यामुळे त्याला त्याचा भार झेपेना. तेव्हा महादेवाने त्या लिंगाला दोन रूपांमध्ये विभागून दिले आणि लिंग कावडीतून घेऊन जाण्यास सांगितले. रावण कावड घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याला लघवी लागली. शिवलिंग खांद्यावर घेऊन लघवी कशी करणार या विचारात रावण पडला, तेवढ्यात त्याला तेथून एक गवळी जाताना दिसला.
रावणाने त्या गवळ्याला कावड थोडावेळ जमिनीला न टेकवता घेऊन उभे राहा असे सांगितले. परंतु गवळ्याला कावडीचे वजन न झेपल्यामुळे त्याने कावड जमिनीला टेकवली आणि ते लिंग तेथेच स्थापन झाले.
रावण परत आल्यानंतर त्याने ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. पुन्हा रावण दुसरे लिंग घेऊन लंकेकडे निघाला तेही शिवलिंग जमिनीला चिकटले. रावण निराश होऊन लंकेला निघून गेला. यानंतर सर्व देव पहिल्या लिंगाजवळ गेले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. महादेवाने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, ‘जो व्यक्ती या लिंगाची मनोभावे सेवा करील त्याला सर्व सुखाचा लाभ होईल.’ त्यानंतर देवांच वैद्य धन्वंतरीने या लिंगामध्ये प्रवेश केला म्हणून या ठिकाणाला वैद्यनाथ असेही म्हटले जाते.
परळी वैजनाथ ज्योतिर्लींगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे व बसेसची सुविधा आहे. परळी येथुन परभणी मार्गे मुंबई, अकोला, नांदेड, नागपुर, तेलंगणा राज्य व लातुर मार्गे आंध्रप्रदेश, कर्नाटका व पश्चीम महाराष्ट्रात जाण्या येण्यासाठी रेल्वेची सोय आहे. परळी येथुन राज्यासह आंध्रप्रदेश व कर्णाटका राज्यात बसची सुविधा आहे.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
View Comments
पूर्वोत्तरे पारलिकाभिधाने|
सदाशिवं तं गिरिजा समेतं ||
सुरासुराराधित पादपद्मं ||
श्रीवैद्यनाथं सततं नमामि ||
नमो वैद्यनाथ
वैद्यनाथ भगवान की जय
ओम नमो शिवाय