श्री क्षेत्र मुरगोड

श्री क्षेत्र मुरगोड

श्री क्षेत्र मुरगोड (श्री चिदंबर महास्वामी लिला क्षेत्र)

स्थान: ता. सौदत्ती, जिल्हा बेळगाव (कर्नाटक राज्य)
सत्पुरूष: श्री महास्वामी चिदंबर दीक्षित
विशेष: श्री मार्तंडेश्वर मंदिर, श्री चिदंबर मंदिर, औदुंबर ट्टा (वृक्ष), श्री बनशंकरी मंदिर

 

श्रीक्षेत्र मुरगोड कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्य़ातील सौंदत्ती तालुक्यामधील मुरगोड गावापासून उत्तरेला दोन फर्लाग अंतरावर आहे. बेळगावपासून ५० कि.मी. अंतरावर हे स्थान आहे. हे क्षेत्र चिदंबर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अत्यंत सुंदर अशा या क्षेत्राला अमरकल्याण असे आणखी एक नाव आहे. आजूबाजूला डोंगर आहेत. त्या डोंगरातील पाणी वाहून एकीकडे साठते. त्या साठलेल्या पाण्याचे एक तळे निर्माण झाले आहे. अक्कलकोटच्या श्रीस्वामी समर्थाच्या बखरीमध्ये त्यांनी मुरगोड येथे एका मोठय़ा यज्ञ समारंभामध्ये तूप वाढण्याची सेवा केली होती, असा उल्लेख आहे. या क्षेत्राच्या महाद्वारातून आत आल्यानंतर एक विलक्षण आनंद व समाधान मिळते.

समोर सभा मंडप दिसतो. त्याला लागूनच एक कट्टा आहे. चिदंबर महास्वामींचे पिता प्रकांडपंडित मार्तंड दीक्षित यांनी तपश्चर्या केलेली जागा ही आहे. येथे परम पवित्र असा औदुंबर वृक्ष आहे. या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालणाऱ्यांची मनोरथे पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. याच वृक्षातून श्रीचिदंबर महास्वामींनी सुवर्ण नाण्यांची वृष्टी केली होती. त्याच्या दक्षिण दिशेस मातोश्री लक्ष्मी माता मंदिर आहे. औदुंबर कट्टय़ाच्या उत्तरेस श्रीचिदंबर महास्वामींचे मंदिर आहे.
महास्वामींच्या समोर एक सुंदर नदी आहे. हे मंदिर तीन भागांमध्ये विभागले आहे. गाभारा, मध्यभाग (नदी मंडप) आणि पूर्वभाग. मंदिराच्या उत्तरभागात श्रीराम मंदिर आणि चिदंबर महास्वामींनी स्थापन केलेले मर्तंडेश्वर मंदिर आहे. याच मंदिरामध्ये महास्वामींनी स्थापन केलेला जागृत मारुती आहे.

चिदंबर महास्वामींच्या मंदिरासमोर एक मोठा अश्वत्थ वृक्ष आहे. येथे श्रीदत्त पादुका आहेत. श्रीचिदंबर महास्वामींचे पिता श्रीमार्तंड दीक्षित यांनी शके १६८५ साली आपल्या तपोनुष्ठानाकरिता या श्रीदत्त पादुका स्थापन केल्या. या मंदिराला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर असे दोन दरवाजे आहेत.

मुरगोड येथे श्रीचिदंबर महास्वामींना रोज वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा, रुद्राभिषेक, षोड्शोपचार पूजा, आरती, शेजारती इ. होते. दर सोमवारी संध्याकाळी शिबीकोत्सव (पालखी सेवा)असते. श्रीचिदंबर महास्वामींनी प्रारंभ केलेले अन्नसंतर्पण आजपर्यंत चालू आहे.


मुरगोड क्षेत्र परिचय

महा अश्वत्थ वृक्ष: हे महा तपस्वी मार्तंड दीक्षित यांना श्रीचिदंबर महाक्षेत्र निर्माणाची दिशा दाखवणारे स्थान. परम पवित्र पावनभूमी म्हणून या वृक्षास ओळखले जाते.

श्रीचिदंबर मंदिर: मूळ अश्वत्थ वृक्षाच्या समोर असलेले महत्त्वाचे स्थान श्रीचिदंबर महामंदिर. येथेच प्रत्यक्ष श्रीचिदंबर महास्वामी वास करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे.


श्रीचिंदंबर लिंग

औदुंबर कट्टा (वृक्ष): पितृश्रेष्ठ ब्रह्मश्री मार्तंड दीक्षित यांचे पवित्र स्थान. येथे त्याकाळी सहा औदुंबर अंकुर फुटलेले होते. त्यापैकी आता दोन आहेत.
लक्ष्मी माता मंदिर: महामाता श्रीलक्ष्मीमाता स्मारक स्थान. (श्रीचिदंबर महास्वामींची आई)

श्रीबनशंकरी मंदिर: श्रीचिदंबर महास्वामींची कुलदेवता श्रीबनशंकरी (शाकंभरी) देवीने दर्शन दिलेले स्थान म्हणजे आता आहे ते मंदिर असे मानले जाते.

श्रीदत्त पादुका: केंगेरी क्षेत्रात प्रथम श्रीदत्त पादुका स्थापना करून श्रीमार्तंड दीक्षितांनी आपल्या तपश्चर्येला, अनुष्ठानाला प्रारंभ केला. हे मंदिर अष्टकोनात बांधलेले आहे.

येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे.


श्री क्षेत्र मुरगोड माहिती समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *