मोहिनीराज मंदिर श्री क्षेत्र नेवासा
बांधकाम
मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी स्थापत्यशैली आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या मूर्ती दगडावर आहेत. मंदिर पूरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाईचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तर कडे आहे. प्रवेश द्वारावर भालदार, चोपदाराच्या मूर्ती असून सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता, भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कंबरपट्टा, डोक्यावर मुकुट, पायात तोडे व पितांबर परिधान केलेली ४.५ फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजाची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते. शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे.
आख्यायिका
समुद्रमंथन झाले असता १४ रत्ने बाहेर आली. त्यापैकी अमृत हे एक होय. अमृताचे वाटपाचे काम देवांनी श्री विष्णूकडे सोपवले. श्री विष्णूनी मोहिनीचे (अर्धनारीनटेश्वर) रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मदिरा यांचे वाटप युक्तीने केले. देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरासमोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांना सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. हे फक्त राहू व केतू या दानवांना लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले. मोहिनीरूप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले परंतु त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व सुदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. परंतु त्यांचे शीर अमर झाले. श्री विष्णूने मोहिनीरूप घेऊन अमृताचे वाटप केले ते नेवासे येथे. म्हणून मोहिनीराजाचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे.
उत्सव
श्री मोहिनीराजाचा उत्सव माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमीपासून सुरू होतो. पौर्णिमेच्या दिवशी कुलार्म कुलाचार करतात. मंदिरात भागवत सप्ताह ही सुरू होतो व उत्सव पुढे पाच दिवस चालतो. या उत्सवात कीर्तन, गायन व भोजन असे कार्यक्रम होतात. उत्सवाची सांगता काल्याने होते.