सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव नगर शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी असलेला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यातील मांडवगण या गावात मांडव्य ऋषी ची तपोभूमी आणि संजीवन समाधी आहे म्हणून या गावाला मांडवगण असे नाव पडले. पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या गावातील लक्ष्मीनारायण मंदिर पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
मांडवगण गावातून कटाक्ष आणि बटाक्ष या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात याच नदीच्या काठावर सिद्धेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, होळकरांचा वाडा आणि हे पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक लक्ष्मी मंदिर आहेत त्यापैकी एक शहरांमध्ये शिंपी गल्ली मध्ये अगदी दुरावस्थेत असलेले यादवकालीन लक्ष्मी मंदिर, तसेच पांडे पेडगाव भुईकोट किल्ल्यातील म्हणजेच आजच्या धर्मवीर गठावरील लक्ष्मीनारायण मंदिर आणि हे मांडवगण येथील लक्ष्मीनारायण मंदिर, याच मंदिराला गावातील लोक गढी आईचे मंदिर म्हणून ही ओळखतात.
मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरा समोर एक दगडी दिपमाळ नजरेस पडते. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या व गर्भगृहाच्या अशा दोन्ही द्वारशाखेवर उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आपल्याता दिसून येते. मंदिरातील मुख्य लक्ष्मीनारायणाची मूर्ती यवन आक्रमणकारांनी खंडित केलेली दिसते, सध्या मंदिर हे पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून त्याची उत्तम प्रकारे डागडुजी व काळजी पूर्वक पुनर्बांधणी होत आहे.
मंदिराचा पौराणिक संदर्भ काही सापडत नाही, मंदिर यादव कालीन असल्याचे समजते, मंदिराला पूर्वी तटबंदी होती, तसेच सद्यस्थितीत आणण्यासाठी पुरातत्व खात्याला मंदिराभोवती उत्खनन लेपण प्रक्रिया करावी लागली. गावात अनेक पुरातन मंदिरे असून गावाला यादव कालीन आणि पेशवेकालीन पार्श्वभूमी देखील आहे. गावाला भेट देण्यासाठी एकदा नक्की या.