कोकमठाण शिवमंदिर कोकमठाण – kokmathan shivmandir kokmathan

कोकमठाण शिवमंदिर कोकमठाण

नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ८ कि. मी. अंतरावर कोकमठाण गावात प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर इ. स. च्या १३ व्या शतकातील असावे. अंतराळ, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची पूर्वाभिमुख संरचना आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून बारीक नक्षीकाम केलेल्या छोट्या शिखारांपासून बनलेले आहे. गर्भगृहाच्या वितानावर नृत्य करणाऱ्या आणि वाद्य वाजवणाऱ्या यक्ष व गंधर्वांची शिल्पे आहेत. मुख्य शिखरावर लिंग आणि अनंतासायी विष्णू यांचे शिल्प आहे.

मंदिराला पूर्वेला मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिम बाजूने सुद्धा प्रवेशद्वार आहे. गाभाऱ्यात शिवपिंड आहे, आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूचे शिल्प उभे करून ठेवले आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. तसेच इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात. तसेच सुरसुंदरी, वाद्य वाजवताना यक्ष-गंधर्व, दिगपाल, आणि बरेच देवी देवतांची शिल्पे आहेत पण मंदिराची पडझड झाल्यामुळे शिल्प मात्र ओळखता येत नाही. शांत निर्वात गोदावरीच्या काठावर वसलेले हे मंदिर कोपरगावचे भूषण आहे.