दगडुशेठ हलवाई यांचे दत्तमंदिर
स्थान: पुणे (महाराष्ट्र राज्य), पुण्याच्या मध्यभागी बुधवार पेठेत हे प्राचीन दत्त मंदिर आहे
सत्पुरूष: प. प. माधवनाथ यांचे प्रेरणेने स्थापन, इटालियन मार्बल मधील तेज:पुंज मूर्ती
पुण्यामध्ये असलेल्या अनेक दत्तमंदिराचा आपणांस परिचय आहे. रास्तेवाडा, सोमवार पेठेतील परांजपे यांचे दत्तमंदिर, हत्तीगणपती जवळील दत्तमंदिर, कर्वेरोड वरील वासुदेव निवासातील दत्तस्थान, कमला नेहरु-पार्क जवळील ‘श्रीगुरुदेव दत्तमंदिर’ अशी काही स्थाने महत्त्वाची आहेत.
लक्ष्मीरस्त्यावरून पूर्वेस निघाल्यावर बेलबाग चौकात उजवीकडे वळल्यावर दगडुशेठ यांचे दत्तमंदिर येते. या दत्ताची प्रसिद्धी फार आहे, दगडुशेठ यांचे गुरू इंदूरचे माधवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हे मंदिर १८९८ मध्ये तयार झाले. भाविकांना या मंदिराची ओढ नेहमीच असते. मंदिरात तीनमुखी दत्ताची मूर्ती आहे. पुढे चांदीच्या पादुका आहेत. मंदिराचा कारभार विश्वस्तांमार्फत चालतो. गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणात होतो.
या मंदिराच्या निर्मितीमागे एक कथा आहे. दगडुशेठ यांची दोन मुले निवर्तल्यावर त्यांना उदासीनता प्राप्त झाली. आपले कुळ अजरामर कसे होईल? या चिंतेत ते होते. परंतु माधवनाथांनी त्यांना गणपतीची मूर्ती स्थापन करण्यास सांगितले. पुढे यांच्या पत्नीने दत्तात्रेयांच्या मंदिराची निर्मिती केली. मूर्ती जयपुरहून आणली आहे. या मंदिरामुळे दगडुशेठ यांचे नाव सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे.
येथे रोज ठरावीक वेळी होणारी पुजा अर्चा, वैदिक पठाण व अनुष्ठाने, या मुळे येथील पावित्र्य अधिकच वृद्धिंगत झालेले आहे. येथे सध्या रुद्राभिषेक, दत्तयाग हेही करण्याची सोय दत्तभक्तांसाठी मंदिर व्यवस्थापनाने केलेली आहे. पुण्यनगरीतील ही अतिशय पवित्र व प्रासादीक वास्तु आहे. येथील दत्तमूर्तीच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे मात्र खरे !