changdev mandir

चांगदेव मंदिर

दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत. तरीसुद्धा खानदेशच्या वास्तुशैलीचे व मांडणीचे तीर्थक्षेत्र चांगदेव मंदिर (changdev mandir) हे उत्तम उदाहरण आहे.

गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याप्रमाणेच मुख्य मंडप व बाजूला ओवऱ्यांची मांडणी, तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते. बौद्धधर्मीयांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे. मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तुकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर केला आहे.

चांगदेव मंदिर (changdev mandir) दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे, चांगदेवाचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. चांगदेव गांव (भुसावळ-इटारसी रेल्वेमार्गावर) सावदा रेल्वे स्टेशनापासून सुमारे आठ किलोमीटर दूर, तापी व पूर्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे.

हिंदू धर्माप्रमाणे योग, मंत्र, तंत्र यांच्या साह्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षाप्रत पोहोचतो. या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक समजले जाते. त्यासाठी मठांची योजना असते. अकराव्या व बाराव्या शतकांत या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. महामंडलनाथ सेऊना किंवा दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले असावे. वाघुलीचे सूर्यमंदिर व संगमश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळीसगावमधील देवळे या राजाच्या कारकिर्दीत झाली.

चांगदेव हे नांव योगी चांगदेवाशी संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोवन याचा सरदार होता व त्यासंबंधीचा आलेख चाळीसगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरावर आहे, या चांगदेवाच्या कारकिर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असा समज आहे. चांगदेव हे नांव प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्र भास्कराचार्य यांच्या नातवाचेही होते. यादव राजा सिंधन याने इ.स. १३०६ मध्ये मोठ्या जमिनी चांगदेवास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका जोमदार नव्या वास्तुप्रकाराचा उगम झाला.

अर्धस्तंभ, मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्ट, लाकडी वास्तुकलेप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी, अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात.


चांगदेव मंदिर (changdev mandir) – चांगदेव

संत चांगदेव

चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी आणि संत होते. चांगदेव हे योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप). तापी-पयोष्णीच्या तीरावरील चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांंना चांगदेव म्हणू लागले.

चांगदेव

एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्यालक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले.

त्यानंतर चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरू मानले. सन १३०५ (शके १२२७)मध्ये चांगदेवांनी समाधी घेतली. (या तारखेबद्दल अनेक मतभेद आहेत.)


चांगदेव मंदिर (changdev mandir) – देवळाची वास्तू

चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे. या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे. देऊळ ३२ मीटर लांब व सुमारे ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत.

या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभावर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा, अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे डॉ. हेन्‍री कुझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी.

शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प, आडवे पट्टे. उभी शिल्पे सामाऊन घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे. भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.


चांगदेव मंदिर (changdev mandir) – चांगदेवाचा उत्सव

प्रत्येक खानदेशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाड्या सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी जमतात. यात्रेच्या काळात शिवरात्री निमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरड्या डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघड्या विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या प्रकाराला वेगळीच असते.

यात्रेत अनेक प्रकारची दुकाने- विशेषतः पितळी भांड्याची दुकाने- रामायण व महाभारत गाऊन दाखविणारी नाटकपथके, ही वैशिष्ट्ये असतात. माघातील तिसऱ्या दिवसापासून अमावास्येपर्यंत हा उत्सावाचा काळ असतो. चंद्र व सूर्यग्रहणाच्या काळांत नद्यांचा संगम असल्यामुळे येथे जत्रा भरते. खानदेशातील खास देवस्थानांत चांगदेवाचे स्थान आहे


चांगदेव मंदिर (changdev mandir) – चांगदेव समाधी

 

पुणतांबा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे. संत चांगदेव यांची समाधी या गावात आहे. येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत.

संत चांगदेव महाराज यांची समाधी १४०० वर्ष जगलेल्या चांगदेव महारांचे मंदिर हे येथील मुख्य मंदिर आहे. दर शंभर वर्षांनी संत चांगदेव वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करीत आणि पुणतांबा हे चौदावे ठिकाण आहे जेथे त्यांनी समाधी घेतली, असे म्हटले जाते. एक आख्यायिका अशी आहे की, संत चांगदेवांना आपल्याकडील असलेल्या शक्तीचा गर्व होता. ते वाघावर आरूढ होऊन व हातात सर्प चाबुक धरून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरवले. ते आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे दृष्य बघून चांगदेवांचे गर्वहरण झाले. त्यांनी त्या भावंडासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागितली.

­चांगदेव मंदिर (changdev mandir) १७ व्या शतकात बांधण्यात आले. मंदिर जरी जुने असले तरी त्याची रचना साधी आहे. मंदिराच्या खालील भागात विठ्ठल – रखुमाई यांच्या पूर्वाभिमुख मूर्ती असून समोर मंडप आहे. त्याचे १० लाकडी खांब आहेत. छतावरती पन्हाळी पत्रे आहेत व ते चारही बाजूंनी उतरते आहेत. चांगदेवांची समाधी याच्या मागील बाजूस आहे. समाधीजवळ चांगदेवांची संगमरवरी मूर्ती व पादुका आहेत. मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. समाधीच्या पश्चिमेला गोदावरी नदीचे मोहक दृश्य दिसते. दरवर्षी येथे कार्तिक मासात यात्रा भरते


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

8 thoughts on “चांगदेव मंदिर”

  1. संपत लक्ष्मण बैलकर

    खरोखर छान उपयुक्त माहिती आहे आभारी आहोत धन्यवाद रामकृष्ण हरी

  2. विजय हिराजी दळवी

    चांगली माहिती देण्यात आली आहे धन्यवाद

  3. अशा पुरातन वास्तू ची माहिती जुळवाजुळव करून स्पष्ट केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद! ?

  4. नारायणडोहो ता.जि. अहमदनगर
    चांगदेव महाराज यांचे जन्म गाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *