मानवी जीवनात शक्तीच्या उपासनेला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे. दु:खितांचे दु:ख दूर करणारी, भक्ताला शक्ती व युक्ती प्रदान करुन जीवनात येणाऱ्या संकटांना निर्भिडपणे सामोरे जाण्यासाठी धैर्य देणारी, जीवनात भगवतीमातेचे स्थान काही वेगळेच मानले जाते. कोल्हार भगवतीपूरच नव्हे तर महाराष्ट्रामधील असंख्य भाविकांनी देवी भगवतीला मातेच्या रुपात मानले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र कोल्हार श्री भगवतीमाता भगवतीपूरचे ग्रामदैवत म्हणजेच श्री भगवतीमाता सर्वत्र प्रसिध्द आहे. हे एक जागृत देवस्थान आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड रस्त्यावरील प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या या भगवतीमाता मंदिरात तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता, माहुरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवती माता असे साडेतीन शक्तीपीठांचे एकत्रीत आणि दुर्लभ वस्तीस्थान आहे. श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर येथे भक्तगण मोठया संख्येने येतात. या साडेतीन शक्तीपीठाचे एकत्रीत वस्तीस्थान लाभलेल्या पूण्यभूमीत तीर्थक्षेत्राचे स्वरुप लाभले आहे. नवसाला पावणाऱ्या, भक्तांची मनोकामना पूर्णत्वास नेणाऱ्या श्री भगवतीमातेचा महिमा जितका वर्णावा तितका थोडाच.
श्री भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे जुने बांधकाम हेमांडपंथी होते. मंदिराच्या जिर्णोद्धारकार्यात मंदिराच्या समतलापासून ४०-४५ फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीपथास आला नाही. अथवा मंदिर निर्मिती संदर्भातील शिलालेख सदृश्य अन्य पुरावा सापडला नाही. त्यामुळे मंदिर अनादीकालीन असल्याची साक्ष पटते. भगवती माता मंदिरात असलेली व्याघ्रशिल्पे इ.स. १३ व्या शतकात झाली असावी. असे काही तज्ञ जाणकारांचे मत आहे. कोल्हार भगवतीपूर हे पूर्वी जहागिरीचे गांव होते. पानोडीची ही जहागिरी होती. त्याकाळी म्हणजे सुमारे २५० वर्षांपूर्वी त्यांनी भगवतीमातेचे छोटेसे मंदिर बांधले असावे असे काही जाणकारांचे मत आहे.
कोल्हार भगवतीपूर गावाच्या नावाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा प्रचलीत आहेत. त्यापैकी एक अशी, महाभारतात वर्णिलेल्या देव-दानवांच्या अमृतमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी अमृतकुंभातील अमृत प्राशन करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे दानवश्रेष्ठ राहू देवांमध्ये मिसळला. मोहिनी रूपातील विष्णुंनी त्याचे कपट ओळखून सुदर्शनचक्राने त्याचा शिरच्छेद केला. राहूच्या वधामुळे प्रवरा परिसरात देव-दानवांमध्ये झालेल्या तुंबळ युध्दामुळे एकच कोलाहल माजला म्हणून प्रवरा तीरावरील या गावाला ‘कोलाहल-कोल्हाळ-कोल्हार’ असे नाव प्राप्त झाले अशी कथा आहे. याठिकाणी देव-दानवांचा कोलाहाल झाला. तो कोलाहाल शमविण्यासाठी श्रीशंकराने स्वत: प्रकट होऊन श्री भगवतीची स्थापना केली. श्री भगवतीदेवीने संपूर्ण राक्षसांचा नायनाट केला. देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भगवतीमातेच्या श्री भवानी माता, श्री रेणुकामाता, श्री सप्तश्रृंगीमाता या भगिनी येथे आल्या असल्याचे मानले जाते.
असा उल्लेख सापडला आहे. कोल्हार भगवतीपुर येथील श्री महादेव मंदिरामध्ये एक मोठया नंदीची दगडी प्रतीकृती असून त्या नंदीच्या पाठीमागच्या बाजूकडून पूर्वीच्याकाळी जमिनीखालून भूयार खोदलेले होते. हे भूयार थेट श्री भगवतीदेवीच्या मंदिराच्या मागे पोहीच्या पलिकडे निघते. परंतु ते भुयार आता सापडत नाही. भुयाराचे पहिले द्वार श्री महादेव मंदिराच्या पिंडीखाली आहे. असे सांगण्यात येते. कोल्हार भगवतीपूर हे गाव पौराणिक पार्श्वभूमीमुळे सुमारे दोन हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. प्रवरा परिसरात मानवी जीवन अश्मयुगापासून अस्तित्वात असल्याचे तसेच सिंधू संस्कृतीप्रमाणेच ‘प्रवरा संस्कृती’ प्राचीन कालापासून अस्तित्वात असल्याचे डॉ. संकलिया या इतिहास संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे.
प्रभु श्रीरामचंद्र बंधु लक्ष्मण पत्नी सितामातेसह पंचवटीकडे १४ वर्षाचा वनवास भोगण्यासाठी जात असतांना प्रवरानदीकाठी मुक्काम केला व प्रवरा नदीत वाळूची महादेव पिंड तयार केली. त्यांनी कोल्हाळेश्वराची येथे प्रतिष्ठापना केली. या कोल्हाळेश्वराच्या या गावाला कोल्हार असे नांव पडले असावे असे जानकार सांगतात. या ठिकाणी त्यांना श्री महादेव प्रसन्न झाले. पुढे याचठिकाणी मंदिर बांधण्यात आले. त्या शिवलिंगाभोवती उभारलेल्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडले. कोल्हाळेश्वर वरुन या गावास ‘कोल्हार’ नाव पडले असे काही जण मानतात. याच ठिकाणी श्री भगवती मातेने अवतार घेऊन प्रभूरामचंद्रास दृष्टांत दिला व दृष्टांचा नाश करण्यासाठी आशिर्वाद दिला. त्यामुळे श्री भगवतीमातेच्या पदस्पर्शाने पूणित झालेल्या स्थानाला ‘भगवतीपूर’ हे नाव पडले. महिनाभराच्या यात्रोत्सव काळात व नवरात्रोस्तवाच्या काळात तुळजापूरची श्री भवानी माता, माहूरची श्री रेणुका माता, वणीची श्री सप्तश्रृंगी माता आणि कोल्हार भगवतीपूरची श्री भगवतीमाता ही साडेतीन शक्तीपीठे येथे वास्तव्य करतात असे सर्वजण मानतात.
श्री भगवतीमातेचा यात्रामहोत्सव दरवर्षी पौष शुध्द पौर्णिमा ते माघ शुध्द पौर्णिमा असा महिनाभर साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे हे संपूर्ण भारत वर्षातील एकमेव जागृत देवस्थान आहे. या काळात अनेक धार्मिक विधींबरोबरच श्री भगवतीदेवी यात्रोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यात्रा महोत्सवास पहाटे महाआरतीने प्रारंभ होतो. सायंकाळी श्री भगवतीमातेच्या छबीना पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. यामध्ये ढोलताशे, सनई, चौघडा, नाचगाणे यांचे आकर्षण ठरते. मिरवणुकीत बहुसंख्येने ग्रामस्थ सहभागी होतात.
छबीना मिरवणूक देवी मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री शोभेच्या दारु कामाची जोरदार आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी फड भरविला जातो. तसेच लोककलावंतांच्या हजेऱ्या होऊन त्यांना बिदागी वाटप केली जाते. यात्रेनिमित्ताने मंदिर तसेच परिसरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई केली जाते. मंदिराच्या भव्य प्रांगणात पुजा साहित्य, मिठाई, तांब्यापीतळेची भांडी, खेळणी तसेच स्त्रीयांच्या अलंकार-आभुषणांची दुकाने थाटली जातात. ओटी भरणे, देवीला चोळीपातळ नेसवणे, लिंब नेसणे, लोटांगणे घालणे. नवस फेडणे व इतर विधी येथे मोठ्या उत्साहात पार पाडले जातात. देवीची दररोज पूजा व आरती करुन नैवेद्य दाखविण्यात येतो.
श्रीभगवतीदेवीचा नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत मोठया उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो.
श्री भगवती मंदिर व परिसरात तसेच गावात मुख्य ठिकाणी नेत्रदिपक विद्युत रोषणाई केली जाते.
नवरात्रात दररोज पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती व सायंकाळी सव्वा सात वाजता महाआरती होते.
नवरात्र काळात दररोज दुर्गा सप्तशती पाठ पठण, जोगवा, देवीची दृष्ट काढणे, स्त्रीयांचा फेर आदि
धार्मिक कार्यक्रम मंदिराच्या भव्य सभामंडपात साजरे होतात.
नवरात्रकाळात नवस फेडण्यासाठी भाविक सवाद्य मिरवणुकीने देवीस फुलवरा वाहतात.
स्थानिक तसेच बाहेर गावाहून येणारे, नऊ दिवस उपवास करणारे (घटी बसणारे)
स्त्री-पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्यास असतात.
त्यांची सर्व व्यवस्था मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ करतात.
पाचव्या व सातव्या माळेला कोल्हार-भगवतीपूर गावच्या
पाटील परिवाराच्या वतीने देवीस चोळी-पातळ व तळी भरण्याचा मान असतो.
यावेळी उपस्थित भाविक व गावकऱ्यांना पानसुपारी दिली जाते.
अष्टमीस नवचंडी होम-हवन (यज्ञविधी) होतो. नवमीस घटविसर्जन होऊन दशमीस महापूजा होते.
नवरात्रात देवीस अलंकृत केले जाते. यात सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट यांनी सुमारे ५५ लाख रु.
खर्च करून भक्तांना राहण्याकरीता भक्त निवासाची सोय केलेली आहे.
यासाठी भक्तनिवास बांधून त्यात उत्तम राहण्याची व्यवस्था केली आहे.
घटी बसणाऱ्यांचीही राहण्याची व्यवस्था या भक्तनिवासात करण्यात आली आहे.
यातच स्वयंपाकासाठी मोठा स्वयंपाकगृह बांधला आहे. यात आठ रुम्स आहे. एक मोठा हॉल बांधला आहे.
भक्तनिवासामध्ये धार्मिक कार्यक्रम, श्री शिर्डी साईबाबा, श्री शनि शिंगणापूर, श्री क्षेत्र पंढरपूर
अशा येणाऱ्या दिंडयांची व पालख्यांची विनामूल्य व्यवस्था केली जाते.
तसेच गोरगरीब कुटुंबातील लग्नकार्य व इतर शुभकार्यांची अल्पदरात व्यवस्था केली जाते.
श्री क्षेत्र कोल्हार