संत बाळूमामा मंदिर आदमापूर – दुजे झाले पंढरपूर
आदमापूर येथे सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो. मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणा-या ठसठशीत ओव्या पहात रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभा-यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सदगुरू परमहंस मुळे महाराज, गारगोटी यांची मुर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे.
गाभा-यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेल्या आहेत. समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभा-यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे.
सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तुंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे. तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मनं वेधून घेतात.स्नान वैगेरे आटोपून पवित्रपणा शिवाय गाभा-यात कोणी जात नाही. बाहेरूनचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. प्रसाद म्हणून तिर्थ आणि भंडारा ( हळदपूड) देतात. विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. येथे दक्षिणा वैगेरे काही मागणे जात नाही. मात्र भक्तांनी मामांचा आशिर्वाद मागावा, इच्छेनुसार दान पेटीत टाकावा.भक्तगणांनी आणलेले नारळ भंडा-यासह प्रसाद रूपाने ज्याचे त्याला परत देतात. अर्पण करण्यास काही आणले असल्यास ठेवून घेतात. आपले जेवण आपण घरून आणायचे. मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदिक्षिणा घालायची अशी पद्धत आहे. असंख्य प्रेक्षणीय उपशिखरे, अनेक मुर्त्या यांनी घडवलेले रंगीत भव्य मोठे उंच शिखर पाहात मंदिराच्या प्रदक्षिणा सहज घातल्या जातात.मंदिराच्या दक्षिण बाजूस औदुंबराच्या शांत, शीतल छायेत श्री गुरू दत्तात्रयांची मूर्ती असून असून त्यांचेही दर्शन घेवून प्रदक्षिणा घालतात.मंदिरामागे दुमजली सिमेंट क्रॉक्रिटची धर्मशाळा आहे. प्रवासी, यात्रेकरू आणि उपासक यांची तात्पुरती मुक्कामाची सोय येथे असते. मंदिराच्या समोर भरपूर मोकळी जागा आहे. ही पूर्व बाजू असून येथे भव्य दिपमाळ व त्या शेजारी पार कट्ट्यासह पिंपळवृक्ष आहे. येथून जवळच आदमापूर गाव आहे.
संत बाळूमामा मंदिर आदमापूर
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या