श्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र

श्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र, प्रासादिक अनुभूती

श्री आनंदनाथ महाराज रचित श्री गुरुस्तवन स्तोत्र आणि श्रीस्वामी चरित्र स्तोत्र ह्या दोन्ही रचनेबद्दल किती बोलावे तेवढे थोड़े आहे. जवळपास १६ वर्ष ही दोन्ही स्टोत्रे नित्य उपासनेमधे आहेत. ह्याचे किती अनुभव सांगावेत तितके थोड़े आहेत. श्री स्वामी महाराजांच्या जवळ पोहोचायचे असेल ह्या एवढे सूंदर साधनच नाही. अनेक स्वामी भक्त प्रतिभानुज रचित तारक मंत्र मनापासून करतात. श्रद्धे मुळे प्रचिती तर येतेच. पण श्री आनंदनाथ महाराज हे श्री स्वामींचा सहवास प्रत्यक्ष लाभलेले शिष्योत्तम आहेत. ज्यांना श्री स्वामी माऊलीने स्वमुखातुन पादुका देवून जणु माता भगवती सरस्वती चे अधिष्ठान दिले आहे. सर्व स्वामीभक्ताना मी विनम्र आवाहन करतो की ह्या दोन्ही प्रासादिक स्तवनांचा नित्यउपासनेमधे समावेश करून श्री स्वामी कृपेची प्रचिती घ्यावी.


श्री स्वामी चरित्र स्तोत्र व गुरू स्तवन स्तोत्र

परब्रह्म परमेश्वर सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या प्रेरणेने रचिलेले दिव्य “श्रीस्वामीचरित्र स्तोत्र” आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहोत. श्री आनंदनाथ महाराजंचे नातू श्रीगुरुनाथबुवा गणपती वालावलकर (परमपूज्य श्री अण्णा) ह्यांच्या नित्यउपासनेत त्यांच्याच आजोबांनी रचिलेले श्रीस्वामीचरित्र स्त्रोत्र आणि श्रीगुरुस्तवन स्तोत्र आवर्जून असायचे. ते प्रत्येक भक्ताला हक्काने ही दोन स्तोत्रे म्हणायला सांगत आणि स्तोत्रांच्या दिव्य अनुभूती सुद्धा भक्तांना आल्या आहेत. श्री अण्णांची आजी म्हणजेच श्री आनंदनाथ महाराजांची पत्नी गंगुबाई नेहमी सांगती की गुरुस्तवनमध्ये एवढी ताकद आहे की ते मेलेल्या माणसाला पण जिवंत करेल.


श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीस्वामीचरित्र स्तोत्र

श्रीगणेशाय नमः ll
श्रीस्वामीचरित्रस्तोत्र प्रारंभः llआधीं नमू श्रीसद्गुरूनाथा ll भक्तवत्सल कृपावंता ll तुजवांचूनि या जगीं त्राता ll अन्य आतां नसेचि ll १ ll अवतार घेतला समर्थ ll नाम शोभे कृपावंत ll पाप जाळूनियां सत्य ll भार उतरिला जगतींचा ll २ ll मूळ स्वरूप निर्गुण ll निराकार नित्य ध्यान ll अघटीत लीला करूनि जाण ll तारिलें जना कौतुकें ll ३ ll म्हणुनि नमन तुझे पायीं ll तुजविण अन्य दाता नाहीं ll विश्वव्यापक तूंच पाहीं ll ध्याती हृदयीं साधुजन ll ४ ll रूपारूपासी वेगळा ll गुणगुणाच्या निराळा ll परी अघटित जगीं कळा ll सूत्र हातीं वागवित ll ५ ll स्वस्वरूपीं निपुण ll सादर कराया जगतीं पालन ll स्वामीनाम सगुण ll उद्धराकारण धरियेलें ll ६ ll तो दिगंबरवेष द्वैतरहित ll दत्तदिगंबर हाची सत्य ll भार उतरावया यथार्थ ll कलियुगीं समर्थ अवतरला ll ७ ll दीन जनांचिया पोटीं ll पाप जाळूनि तारी संकटीं ll नाम जयाचें धरितां कंठीं ll मग सृष्टीं भय नाहीं ll ८ ll ॐ आदिस्वरूपरूपा ll ओंकार निर्गुणरूपा ll जगव्याप्यव्यापककौतुका ll दाखविता सखा तूंचि खरा ll ९ ll कोण करील तुझी स्तुती ll शेष शिणला निश्चितीं ll तेथें मानव बापुडे किती ll अल्पमती निर्धारें ll १० ll सुख करा स्वामीराया ll भक्तवत्सला करुणालया ll जगतारक तुझ्या पायां ll नमन माझें सर्वदा ll ११ ll मी अन्यायी थोर ll परी तूं कृपेचा सागर ll जगतारावया निर्धार ll सगुण अवतार धरियेला ll १२ ll जयजयाजी गुरुनाथा ll भक्तवत्सला समर्था ll तुजवांचूनि अन्य त्राता ll मज आतां पाहतां नसेचि ll १३ ll सर्व सुख सगुण ll अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण ll जग तारावया कारण ll अवतार जाण धरियेला ll १४ ll अनंत ब्रह्मांडाचा नायक ll तूंचि सखा माझा देख ll तुजवांचूनि अन्य कौतुक ll नको नको मजलागीं ll १५ ll कैसी करावी तुझी स्तुती ll हें मी नेणें बा निश्चितीं ll चरणीं जडो तुझ्या प्रीती ll ऐसें आतां करावें ll १६ ll दीन दयाळा गुरुराया ll भावें वंदिलें तुझ्या पायां ll सोडिली समूळ मोहाची माया ll आतां मज वायां दवडू नको ll १७ ll हें स्तोत्र तुझें लघुस्थिती ll तूंचि बोलविता निश्चितीं ll भक्त तारावया गुरुमूर्ती ll अवतारस्थिती दाविली ll १८ ll दीनवत्सला स्वामिराया ll अगाधतेजा करुणालया ll अघटित जगतीं तव माया ll लीला कौतुक निर्धार ll १९ ll निरंजन स्वरूपरूपा ll विश्वरूपा आदिरुपा ll अक्कलकोटीं दावूनि कौतुका ll जगसुखा राहिला ll २० ll अक्कलकोटीं जरी जन ll अवचित कोणी जातां जाण ll उद्धार तया कारण ll स्वामिकृपें होय खरा ll २१ ll अवधूतवेष निर्धारी ll निर्गुण निराकारी ll तेज पाहतां थरारी ll काळ पोटीं बापुडा ll २२ ll वेदीं रूप वर्णिलें निर्धार ll तैसी लीला दाविली साहाकार ll विश्वविश्वंभर गुरुवर ll सद्गुरूनाथ स्वामी माझा ll २३ ll चरण पाहतां सुकुमार ll कैसें पूजावें निर्धार ll ठेऊनि प्रेम गादीवर ll सत्य सादर पूजावें ll २४ ll प्रेम गंगा यमुना सरस्वती ll सिंधु कावेरी भागीरथी ll तयासी प्रार्थावें निश्चितीं ll स्नानालागीं समर्थाच्या || २५ ll मन कलश घेऊनि निर्धार ll प्रेम गंगा जलसागर ll स्नान घालूनि उत्तरोत्तर ll पूजन प्रकार करावा ll २६ ll आवडी अक्षता निर्धारीं ll सुमन संगती घेऊनि वरी ll सद्गुरुनाथ पुजावा अंतरी ll प्रेमभरी होऊनियां ll २७ ll भक्तिची ती जाण ll वरी नामाचा चंदन ll शांती केशर मिळवून ll गंध अर्चन समर्थांचे ll २८ ll क्षमा धूप दीप निर्धारीं ll प्रेम नैवेद्य वरी ll भावें समर्पोनि निर्धारीं ll सद्गदित अंतरीं होऊनियां ll २९ ll क्रोध कापूर जाळावा ll प्रेमें स्वामी आळवावा ll आवडीचा तो ध्यानीं पहावा ll शुद्ध चित्त करूनियां ll ३० ll ऐसी पूजा झालियावरी ll मग प्रार्थावा निजांतरी ll हृदयीं उठती प्रेमलहरी ll ऐशापरी आळवावा ll ३१ ll जयजयाजी गुरुराया ll जयजयाजी करुणालया ll भक्ता दाउनियां पायां ll भवभया निवारिलें ll ३२ ll जयजयाजी अनंतरूपा ll जयजयाजी आदिरुपा ll चुकवा चुकवा जन्मखेपा ll मार्ग सोपा दाऊनियां ll ३३ ll जयजयाजी त्रिगुणा ll जयजयाजी अवतार सगुणा ll पुरवावया मनकामना ll जनीं वनीं फिरीयेला ll ३४ ll जयजयाजी दिगंबरा ll जयजयाजी सर्वेश्वरा ll मज सांभाळा लेंकरा ll तुजविण आसरा नाहीं नाहीं ll ३५ ll जयजयाजी समर्था ll स्वामिराया कृपावंता ll ll तुजविण आम्हां त्राता ll नाहीं नाहीं जगत्रयीं ll ३६ ll शुद्धतेजा तेजरुपा ll दिव्य स्वस्वरूपा ll चुकवा चुकवा जन्म खेपा ll आदिरुपा जगद्गुरू ll ३७ ll जयजयाजी यतिरुपा ll जयजयाजी अघटित स्वरूपा ll निर्गुण सगुणरूपा ll सच्चिदानंद जगद्गुरू ll ३८ ll जयजयाजी त्रिगुणरहिता ll जयजयाजी त्रिदोषहारका ll जयजयाजी ब्रह्मांडनायका ll निजभक्त सख्या स्वामिराया ll ३९ ll जयजयाजी दत्तात्रेया ll जयजयाजी करुणालया ll जयजयाजी विश्वमाया ll संशयभयहारका स्वामिराया ll ४० ll जयजयाजी आनंदविलासा ll जयजयाजी पापतमनाशा ll जयजयाजी अवधूतवेषा ll भवभयपाश निवारका ll ४१ ll जयजयाजी निजभक्तपालका ll जयजयाजी विश्वव्यापका ll निज दासासि सखा ll कलियुगीं देखा तूं एक ll ४२ ll जयजयाजी विराटस्वरूपा ll जयजयाजी आदिरूपरूपा ll जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका ll मायबापा गुरुराया ll ४३ ll त्रिलोकीं तूं समर्थ ll अवतार तुझाचि यथार्थ ll तारक भक्तांलागीं सत्य ll दैवीरूप दाऊनि ll ४४ ll तूं पूर्णब्रह्म जाण ll निर्विकार निर्गुण ll निरंजनी सदा ध्यान ll लीला कौतुक दाविलें ll ४५ ll तेज पाहतां थरारे ll कली मनीं सदा झुरे ll विश्वव्यापक व्यापूनि उरे ll तारक खरे पतितासी ll ४६ ll तुजविण आणिक आधार नाहीं ll कलियुगीं दुजा आम्हां पाहीं ll सद्गुरुनाथ तूंचि खरा तोही ll अवताररूपें नटलासी ll ४७ ll लीला दाविली अगाध ll शेषा न करवे त्याचा शोध ll जें तुम्ही केलें विविध ll ज्ञानरूपें जाणविलें ll ४८ ll अक्कलकोटमहापुरीं ll वास केला निर्धारीं ll पवित्रक्षेत्र करूनि तारी ll पाय ठेऊनि जगतासी ll ४९ ll तरी जनीं सत्य आतां ll अक्कलकोटीं जावें तत्वतां ll हित साधावया यथार्थ ll पवित्र भूमी पैं केली ll ५० ll हें वचन निर्धार ll समर्थांचें असे साचार ll बोल बोलवितां उत्तर ll स्वामी माझा निर्धारीं ll ५१ ll अक्कलकोटीं करितां अनुष्ठान ll हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन ll शुद्ध चित्त करून ll ध्यान सदा समर्थांचें ll ५२ ll भिक्षान्न निर्धारीं ll पवित्र राहे सदा अंतरी ll षण्मास वाचितां तरी ll महाव्याधी दूर होय ll ५३ ll एक संवत्सर अनुष्ठान ll वटछायेसी करितां जाण ll तयासी होईल पुत्र संतान ll वचन सत्य समर्थांचें ll ५४ ll तेरा मासी जोडे धन ll चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण ll प्रेमभावें करितां अनुष्ठान ll सत्य वचन निर्धार ll ५५ ll वटपूजा आवडी पूर्ण ll तेथेंचि पादुका स्थापून ll प्रेमभावें करितां अनुष्ठान ll मनोरथ पूर्ण होतील ll ५६ ll कलियुगीं तारक निर्धारीं ll स्वामी माझा सगुण अवतारी ll जग तारावया निर्धारीं ll सृष्टीवरीं पैं आला ll ५७ ll तरी सादर सादर मन ll ठेऊनि वंदा आतां चरण ll पुढें न मिळे ऐसें निधान ll मायाबंधन तोडावया ll ५८ ll नाम घेतां निर्धारीं ll स्वामी माझा कैवारी ll भवामाजीं पार करी ll वचन निर्धारीं सत्य हो ll ५९ ll आनंद म्हणे तरी आतां ll स्वामीराया जी समर्था ll भक्तवत्सला कृपावंता ll वाचितां जगव्यथा चुकवावी ll ६० ll हाच देऊनि प्रथम वर ll भक्तिपंथ वाढवावा निर्धार ll आणिक काहीं मागणें साचार ll तुजपाशीं दयाळा ll ६१ ll परोपकार हाचि एक ll तुझ्या नामें तारावे लोक ll आणिक मागणें तें कौतुक ll नाहीं नाहीं सर्वथा ll ६२ ll विश्व विश्वाकारी ll विश्वरूप तूंचि निर्धारीं ll चालविता तुजविण तरी ll कोण आहे दयाळा ll ६३ ll तूंचि सर्व सुखदायक ll तूंचि कृपा नायक ll तुजवांचूनि जगा तारक ll नाहीं कोणी सर्वथा ll ६४ ll आतां न करीं निष्ठुर चित्ता ll माय जाणे बालकाची व्यथा ll तुजवांचूनि अन्य सर्वथा ll माय दुजी न जाणो ll ६५ ll तूंचि मातापिता सर्वेश्वरू ll जगतारक जगदगुरू ll नको नको अव्हेरुं लेंकरुं ll दीना उदारु तूं एक ll ६६ ll दीनदयाघन नाम ll तुमचें असे हो उत्तम ll जग तारावया कारण ll स्वामी समर्थ धरियेलें ll ६७ ll महापूर बोरी पायीं उतरला ll मैदार्गीहुनी येतां सोहळा देखिला ll अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला ll अघटित लीला समर्थांची ll ६८ ll प्रेम उंदीर सजीव केला ll मुक्यासी वाचा देऊनि बोलविला ll अंधासी रत्नें पारखविला ll अघटित लीला जगीं तुझी ll ६९ ll अघटित केलें चमत्कार ll किती लिहावे साचार ll ग्रंथ वाढेल निर्धार ll या भेणें सादर लेखणी आवरिली ll ७० ll स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार ll पुढें स्वामिराज बोलवील सादर ll भक्त तारावया निर्धार ll कली जोर मोडोनियां ll ७१ ll म्हणुनियां आतां लघुचरित्र ll स्वामी नाम नामाचें स्तोत्र ll जग तारावया पवित्र ll लघुस्तोत्र वर्णिलें ll ७२ ll अक्कलकोटीं बहु लीला ll ज्याणें दाखविली अघटित कळा ll कोटीमदनमदनाचा पुतळा ll स्वरुपीं जयाच्या तुळेना ll ७३ ll बहु वर्षें एकभूमी वस्ती ll एक विचार एक स्थिती ll अघटित रूप तें निश्चितीं ll जगतालागीं तारावया ll ७४ ll हे निर्जीव पाटावरी ll पादुका उठल्या कलिमाझारी ll अजूनि भुली कैशी जगांतरी ll तरणोपाया चुकती हे ll ७५ ll नाम घेतां प्रेमभरीं ll हृदय शुद्ध आधीं करीं ll दया ठेऊनि अंतरीं ll वाच निर्धारीं स्वामिलीले ll ७६ ll स्वामिपादुकापूजन ll नामस्तोत्र भजन ll तेणें वंश उद्धरे जाण ll कलीमाझारी निर्धार ll ७७ ll म्हणुनियां आतां ll स्वामिनाम आठवावें सर्वथा ll तयावीण अन्य वार्ता ll तारक नाहीं जगांत ll ७८ ll अहा सुंदरस्वरूपनिधान ll अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान ll सच्चिदानंद आनंदघन ll स्वामी माझा दयाळू ll ७९ ll या प्रपंचमोहाचे काठीं ll बुडोनियां जातां रे निकटी ll तुम्हां तरावया सुलभ गोष्टी ll स्वामिनाम पोटीं धरा ll ८० ll स्वामिनामाचा प्रताप ll पाप जाळूनि करी राख ll अपूर्व दाविलें कौतुक ll कलीमाजी तरावया ll ८१ ll तरी आतां शुद्ध करूनि मन ll हेंचि जाण संध्यास्नान ll दया क्षमा शांती पूर्ण ll गुणवर्णन समर्थांचें ll ८२ ll खोट्याचा जाणूनि पसारा ll तोडीं तोडीं मायेच्या व्यवहारा ll न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा ll मोहपसारा दूर करोनी ll ८३ ll मूळबिंदु हा प्रमाण ll तेथोनि वाढविता कोण ll कोणी केलें हो रक्षण ll पिंडालागीं जाण पां ll ८४ ll कैंची माया कैंसा मोह ll कोठें आहे तुझा ठाव ll तो आधीं शोधुनी पहा हो ll भुलू नको मानवा ll ८५ ll मूळ बिंदुरूप प्रमाण ll देह झाला बीजा कारण ll वाढवोनि करचरण ll दीनानाथें अर्पिले ll ८६ ll तेथें झाली जीवशिवाची वस्ती ll तीन गुण गुणांची प्राप्ती ll सहा विकारांची स्थिती ll मायेसंगती खेळोनिया ll ८७ ll दया क्षमा शांती विचार ll विवेक ज्ञान जागृतीसार ll अविद्येची गती निर्धार ll सोडोनि भवपार करीतसे ll ८८ ll धरितां स्वामी नावाची आवडी ll घेतां भवामाजीं घाली उडी ll नेवोनि भक्तां पैलथडी ll पार करी दयाळू ll ८९ ll नाम जगीं तारक ll काय सांगू नामाचें कौतुक ll नामें तारिले कितीएक ll महापापी कलियुगीं ll ९० ll नाम घेतां संकट हरे ll वारी केल्या पाप सरे ll सेवा करितां भवांत तरे ll चुकती फेरे चौऱ्यांशीचें ll ९१ ll अक्कलकोटीं न जातां तरी ll वटछायेसी अनुष्ठान करी ll तयासीं तारक निर्धारीं ll दृष्टांतरूपें स्वामी माझा ll ९२ ll स्वामींची मूर्ति मनोहर ll प्रेमें घेऊनि अयन्यावर ll भावें मांडोनि गादीवर ll पूजन करावें प्रेमभावें ll ९३ ll भजनपूजनाच्या रीती ll कलीमाजीं जग उद्धरती ll प्रेम ठेउनियां चित्तीं ll स्वामी कृपामूर्ति आठवावा ll ९४ ll काय न करी श्रीगुरुनाथ ll सत्य होती शरणांगत ll भक्ततारक अवतार समर्थ ll कलियुगीं यथार्थ अवतरला ll ९५ ll विश्वव्यापक विश्वंभरू ll त्यासी कैंची समाधी निर्धारु ll जगीं जगप्रकार दाखवणें साचारु ll लीला थोरु समर्थांची ll ९६ ll द्वैत नाहीं तिळभरी ll आशा कैंची अंतरीं ll योगमाया दवडिली दुरी ll अवतार निर्धारीं स्वामी माझा ll ९७ ll भक्तांकारणे अक्कलकोटीं ll वास केला हो निकटी ll पाय दाऊनियां सृष्टीं ll पतित उद्धार करविला ll ९८ ll अघटित कळा अघटित लीला ll पूर्णतेज तेजाचा पुतळा ll अगम्य ज्याची अवतार लीला ll कलीचा सोहळा मोडावया ll ९९ ll तरी नामाची संगती ll प्रेम ठेउनी सदा चित्तीं ll स्वामी आठवा दिवसरात्रीं ll भवामाजी तरावया ll १०० ll स्वामीनामाचा सोहळा ll धाक पडे कलीकाळा ll निजदासासी सांभाळी वेळोवेळां ll अवतार सोहळा करूनियां ll १०१ ll कलीमाजी तारक ll भक्तासी एकचि नाम देख ll स्वामीरायाविण कौतुक ll आणिक नको सर्वथा ll १०२ ll स्वामीनामाचें कीर्तन ll सप्रेमें पादुकापूजन ll करितां कलीमाजी जाण ll जन उद्धरे निर्धारें ll १०३ ll स्वामीपंथ तारक ll भव नाशील हा सत्य देख ll कलीमाजीं जगतारक ll परमसुखदायक उद्भवला ll १०४ ll म्हणुनि जनीं आपुल्या हिता ll शरण जावें श्रीगुरूनाथा ll मुखीं धरोनि स्वामीवार्ता ll जन्मव्यथा चुकवावी ll १०५ ll ऐसी भुललिया सोय ll पुढें नाहीं रें उपाय ll भवाचा हा भय ll दूर कराया निर्धारीं ll १०६ ll तरी सुंदर मानवाची काया ll नेवोनि लावा स्वामिपाया ll सुखें निवारा भवभया ll मोहमाया तोडोनियां ll १०७ ll समर्थें दिधलें अभय वचन ll जो हें स्तोत्र करील पठण ll तयाचे मनोरथ पूर्ण ll होतील जाण मज कृपें ll १०८ ll येथें धरितां संशय ll तयासी भवामाजी भय ll पुढें नाहीं ऐशी सोय ll सत्य सत्य त्रिवाचा ll १०९ ll हें लघुस्तोत्र समर्थांचें ll मनोभावें करितां पठण याचें ll अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे ll परमार्थकांसी मोक्षपद ll ११० ll आनंद म्हणे तरीं आतां ll स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा ll प्रेमभावें स्तोत्र गातां ll मोक्ष हातां येईल ll १११ ll इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र ll हें जगतारक पवित्र ll जपामाजीं महामंत्र ll अर्थ सादर पुरवावया ll ११२ ll इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदापर्णमस्तु ll

राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय ll श्रीरस्तु ll शुभंभवतु ll


श्री आनंदनाथ महाराज कृतll श्रीगुरुस्तवन स्तोत्र

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा ll भक्तवत्सल समर्था ll तव पदी ठेऊनि माथा ll स्तवितो ताता तुजलागी ll १ ll तू नित्य निरंजन ll तुज म्हणती निर्गुण ll तूच जगाचे कारण ll अहंभावे प्रगटलासि ll २ ll तुझी स्तुती करावया ll शक्ति नसे हरिहर ब्रह्मया ll परि अघटित तुझी माया ll जी संशयभया निवारीत ll ३ ll मूळ मूळीचा आकारू ll तुज म्हणती श्रीगुरू ll सच्चित शक्तीचा आधारू ll पुर्णाधारू ॐकारासी ll ४ ll ऐसा तू देवाधिदेव ll हे विश्व तुझेचि लाघव ll इच्छेचे वैभव ll मूळब्रह्मी नटविले ll ५ ll ऐसा तू बा अपरंपारू ll या अनंत ब्रह्माचा आधारू ll चराचरीचा आकारू ll पुर्णाधारू म्हणविले ll ६ ll ऐशा तुजप्रती ll स्तवावया अल्प माझी मती ll तू जाणसि हे चित्ती ll विश्वव्यापक म्हणवूनी ll ७ ll तरी देवा मतिदान ll देणे तुझचि कारण ll जरी करणे समाधान ll तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ll ८ ll अहा जी निर्गुणा ll विश्वव्यापक सगुणा ll सत्य निराकार निरंजना ll भक्तांकारणे प्रगटलासी ll ९ ll रूप पहाता मनोहर ll मूर्ति केवळ दिगंबर ll कोटी मदन तेज निर्धार ll ज्याच्या स्वरूपी नटले ll १० ll कर्ण कुंडलाकृती ll वदन पाहता सुहास्य मूर्ति ll भ्रुकुटी पहाता मना वेधती ll भक्त भाविकांचे ll ११ ll भोवयांचा आकारू ll जेथे भुले धनुर्धरु ll ऐसे रूप निर्धारु ll नाही नाही जगत्रयी ll १२ ll सरळ दंड जानु प्रमाण ll आजानबाहु कर जाण ll जो भक्तां वरद पूर्ण ll ज्याचे स्मरणे भवनाश ll १३ ll ऐसा तू परात्परु ll परमहंस स्वरूप सद्गुरू ll मज दावुनि ब्रह्म चराचरू ll बोलविला आधारू जगतासी ll १४ ll ऐशा तुज स्तवुनी ll मौन्य पावले सहस्त्रफणी ll वेद श्वान होऊनी ll सदा द्वारी तिष्ठती ll १५ ll तेथे मी लडिवाळ ll खरे जाणिजे तुझे बाळ ll म्हणवोनी पुरवि माझी आळ ll माय कणवाळ म्हणविसी ll १६ ll मी अन्यायी नानापरी ll कर्मे केली दुर्विचारी ll ती क्षमा करोनि निर्धारी ll मज तारी गुरुराया ll १७ ll मनाचिया वारे ll जे उठवि पापांचे फवारे ll तेणें भ्रमे भ्रमलो बारे ll चुकवि फेरे भवाचे ll १८ ll कायिक वाचिक मानसिक ll सर्व पापे झाली जी अनेक ll ती क्षमा करुनी देख ll मज तारी गुरुराया ll १९ ll माता उदरी तुम्ही तारिले ll ते विस्मरण जिवासी पडिले ll हे क्षमा करोनि वहिले ll मज तारी गुरुराया ll २० ll पर उपकार विस्मरण ll पापे केली अघटित कर्म ll अहंभाव क्रोधा लागून ll सदाचि गृही ठेवियले ll २१ ll हे क्षमा करोनि दातारा ll मज तारावे लेकरा ll तुजविण आसरा ll नाही नाही जगत्रयी ll २२ ll मज न घडे नेम धर्म ll न घडे उपासना कर्म ll नाही अंतरी प्रेम ll परी ब्रीदाकरण तारणे ll २३ ll नाम तुझे पाही ll कदा वृथा गेले नाही ll ऐसे देती ग्वाही ll संत सज्जन पुराणे ll २४ ll मागे बहुत तारिले ll हे त्यांही अनुभविले ll मज का अव्हेरिले ll निष्ठुर केले मन किंनिमित्त ll २५ ll तू विश्वाकारु विश्वाधारू ll त्वांचि रचिले चराचरू ll तूचि बीज आधारू ll व्यापक निर्धारु जगत्रयी ll २६ ll चार देहाच्या सूक्ष्मी ll तूचि झुलविशी निज लगामी ll हे ठेऊनी कारणी ll अहंभाव तोडावया ll २७ ll जन्ममरणाच्या व्यापारी ll जे भ्रमुनी पडले माया भरारी ll ते सोडविशी जरी ll निजनामे करुनिया ll २८ ll ऐसा तू अनादि आधारू ll तुज म्हणती वेद्गुरू ll परी हे व्यापुनी अंतरु ll स्थिरचरी व्यापिले ll २९ ll भावभक्ती चोखट ll करणे नेणे बिकट ll नाम तुझे सुभट ll तोडी घाट भवाचा ll ३० ll हे जाणुनी अंतरी ll पिंड ब्रह्मांड शोधिले जरी ll तरी सूक्ष्मीच्या आधारी ll व्यापक निर्धारी तूचि एक ll ३१ ll म्हणोनि मौन्यगती ll तुज निजानंदी स्तविती ll जरी बोलविसी वाचाशक्ती ll तरी हाती तुझ्या दयाळा ll ३२ ll म्हणोनि स्तवने स्तवनी ll तुज सांगणे एक जनी ll वश व्हावे भक्ती लागुनी ll अवतार करणी जाणोनिया ll ३३ ll अहंभाव तुटोनि गेला ll प्रेमभाव प्रगटला ll देव तेथेचि राहिला ll अनुभवशुद्धी खेळवी ll ३४ ll यज्ञ कोटी करू जाता ll जे फळ न ये हाता ll ते प्रेमभावे स्तविता ll हरिते व्यथा भवाची ll ३५ ll म्हणोनि सांगणे खूण ll हा स्तव नित्य प्रेमे जाण ll जो वाचील अनुप्रमाण ll अकरा वेळा निर्धारे ll ३६ ll शुचिस्मित करूनि चित्ता ll जो जपे प्रेमभरिता ll पुरवि तयांच्या मनोरथा ll सत्य सत्य त्रिवाचा ll ३७ ll हे लघु स्तव स्तवन ll तारक जगाच्या कारण ll भक्तिभावे पूर्ण ll चुके चुके भव फेरा ll ३८ ll जो हा स्तव करील पठण ll त्या घरी आनंद प्रकटेल जाण ll देवोनि भक्ता वरदान ll तारक त्रिभुवनी करील ll ३९ ll हा स्तव नित्य वाचा ll भाव धरुनि जीवाचा ll फेरा चुकवा चौऱ्यांशीचा ll गर्भवास पुन्हा नाही ll ४० ll हे जगा हितकारी ll चुकवि चुकवि भ्रमफेरी ll मृगजळ दाऊनि संसारी ll मग तारी जीवाते ll ४१ ll हे आनंदनाथांची वाणी ll जग तारक निशाणी ll स्मरता झुलवी निरंजनी ll योगी ध्यानी डुलविले ll ४२ ll ऐसा ऐकता गुरुस्तवन ll जागे केले सच्चित गुरुकारण ll केवळ तो हरि हर ब्रह्म ll मुखयंत्रीचा गोळा पूर्ण ll गुरुहृदय भुवन व्यापिले ll ४३ ll तेणे होवुनि स्मरती ll स्वये प्रगटली स्फूर्ती ll नाभी नाभी आवरती ll अवतार स्थिती बोलतो ll ४४ ll अयोनिसंभव अवतार ll हिमालय उत्तरभागी निर्धार ll होऊनी पूर्ण हंस दिगंबर ll व्यापू चराचर निजलीले ll ४५ ll तेथून प्रगट भुवन ll मग उद्धरु धरा जाण ll धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ll ४६ ll ऐशी ध्वनी निर्धार ll गर्जला गुरु दिगंबर ll सर्व देवी केला नमस्कार ll आनंद थोर प्रगटला ll ४७ ll शालिवाहन शके तिनशे चाळीस ll शुद्धपक्ष पूर्ण चैत्र मास ll अवतार घेतला द्वितीयेस ll वटछायेसी दिगंबरु ll ४८ ll तै धरा आनंदली थोर ll मज दावा रूप सुकुमार ll सेवा करीन निर्धार ll पादकिंकरी होऊनिया ll ४९ ll ऐसी गर्जना प्रकट ll आनंद बोधवी हितार्थ ll गुह्य हे निजबोधार्थ ll न बोलावे दांभिका ll ५० ll

ll श्रीगुरुस्वामीसमर्थापर्णमस्तु ll


श्री स्वामी चरित्र व श्री गुरुस्तवन स्तोत्र माहिती समाप्त