श्री दत्तभावसुधारस स्तोत्र

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र

दत्तसंप्रदायातील सनातन धर्मीयांमध्ये श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री नारायण स्वामी, गोविंद स्वामी या थोर महात्म्यांच्या परंपरेत प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामींचा आदरपूर्व उल्लेख होतो. श्री स्वामी मुर्तीमंत परंवैराग्यमुर्ती होते, संन्यास धर्माचा आदर्श होते. मंत्रसिद्धी, यंत्र-तंत्रज्ञ, असल्याकारणाने त्यांनी अनेक सिध्द मंत्राची रचना केली. त्याबरोबरच ते उत्तम वैद्य, सिध्द ज्योतिषी होते. त्यांच्या अद्वितीय भक्तीतून त्यांनी अनेक सिध्द ग्रंथाची मंत्राची निर्मिती केली. त्यातीलच एक सिध्द प्रासादिक स्तोत्र म्हणजे “श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र.” या स्तोत्रातील आर्तता, करुणा अगतिकता हृदयन गम आहे. या स्तोत्रात श्री गुरुचरित्र आणि श्री दत्त माहात्म्य या दोन्ही प्रासादिक दिव्य ग्रंथातील कथांचा सुरेख संगम आहे. दत्त संप्रदायात विशिष्ठ साधना पद्धतीत श्री गुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य अतुलनीय आहे. या ग्रंथाबाबत दत्तभक्तात आदर युक्त भीती आहे. तेव्हा जिज्ञासु आर्तभावी सामान्य भक्तांना व स्त्रियांना या कथांचा पारायण लाभ व्हावा म्हणून थोरल्या स्वामी महाराजांनी श्री सप्तशती गुरुचारित्राची निर्मिती केली. श्रीगुरुचरित्रातील कथासार सुलभ श्लोकांच्या रूपाने श्री दत्तभावसुधारस स्तोत्रात सूत्ररूपाने घेतलेले आहे. तसेच श्री दत्तमहात्म्याच्या कथांवर आधारित परा तत्वाचा अलौकिक स्पर्शाचा सुवास या स्तोत्रातून जाणवतो. या दोन्ही ग्रंथातील दिव्य दैवी शक्तीनी भारलेले सिध्द मंत्र स्वरूप या महाप्रासादिक स्तोत्रातून प्रकट होते. ईश्वरी रूपाने ज्ञान मिळाल्यामुळे अहंकाराचा, द्वाईताचा नाश होऊन भक्ती सुखाचे अद्वैत भक्ताला प्राप्त होते. यातून श्री स्वामींच्या सिध्द कावित्वाचा आशीर्वाद दत्तभक्तांना मिळाला आहे. श्री दत्त महात्म्यांच्या सिद्धांतात नवविध भक्तीचा परिपाक आहे. कार्तवीर्य आख्यान म्हणजे समारंभक्ती, अलंर्क।चे ज्ञानविज्ञान म्हणजे वंदन भक्ती, आयु राजाचे उध्दरण म्हणजे दास्यभक्ती, परशुरामाचे स्वात्मानिवेदन म्हणजे संख्यभक्ती, विष्णूदत्ताची अर्चन भक्ती, वेद धर्माची कीर्तन भक्ती आणि दिपकाची श्रवणभक्ती असा संपूर्ण नितांत सुंदर, नवविध भक्तीचा आविष्कार या ग्रंथात विशद केला आहे. श्रवणानी संशय नष्ट होतो. परमेश्वरशक्तीशी एकत्व साधून होणारे अनुसंधान म्हणजे मनन आणि या परमेश्वर रूपाचे निरंतर चिंतन म्हणजे निधीध्यासन, ज्यांनी विपरीत भावनांचा नाश होतो.

श्री गुरुचरित्रातील महात्म्यात भाविकांच्या अधि्भौतिक, अधि दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांच्या शामनार्थ भवऔषधीरूपाचे अद्वितीय रसायन आहे. यातील सतीची पिशाच्च पीडा निवारण मंत्र संतती वर्धक आहे. सतीच्या मृत पतीला जिवंत करणारा श्लोक म्हणजे सौभाग्यवर्धक मंत्र आहे. गरीब विप्र।कडील घेवड्याच्या भिक्षेचा श्लोक म्हणजे संपत्ती वर्धक मंत्र आहे. या दोन्हींचा समन्वय म्हणजे श्री स्वामींचे श्री दत्तभवसुधारस भाव स्तोत्र आहे. यातील भक्तीविज्ञान सामान्य जन मानसा पर्यंत पोचवण्यासाठी या दिव्य स्तोत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. या स्तोत्राच्या श्रावणाने मनाच्या ओढी कमी होऊन समाधान, शांती मिळते. त्यामुळे एकाग्रता प्राप्त होऊन वस्तू प्राप्तीच्या ज्ञानाने कैवल्याप्राप्ती होते. पठाणाने कृतकृत्यता येते आणि दृढबोध होऊन जीवनंमुक्ती मिळते. श्री स्वामीमहाराज यात श्री दत्तात्रेयांना संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना करतात की “आम्ही तुझी अज्ञानी असमर्थ लेकरे आहोत. आमच्या अपराधाना क्षमा करून आम्हाला सांभाळून घे. तूच आमचा त्राता, दाता, हर्ता, कर्ता संगाती आहेस. तूझ्या विना आम्हाला गती नाही. आमचे सर्व व्यवहार केवळ तुझ्या नामस्मरणाने व्हावेत”. या स्तोत्राच्या सा मर्थ्य संचारात मनोरथ सिद्धीच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील. या मानसशास्त्राचा, योग शास्त्राचा आणि ध्वनिशास्त्राचा सिद्धांताचा अद्वितीय योग यात जुळून आलेला आहे. श्री गुरुचरित्र आणि श्री दत्तमहात्म्य ग्रंथा च्या परायणाची हीच फलश्रुती होय. यांच्या श्रावण पठणाने हृदय सद्गतीत, वाचा गदगतीत तर शरीर रोमांचित होऊन अध्यात्म ज्ञानाची, मुक्तीची सुखानुभूती येते. हे दिव्य शक्तींनी भारलेले महाप्रसादीक स्तोत्र आहे. याच्या माध्यमातून ईश्वरसेवा प्रथमतः ज्ञानप्राप्तीसाठी आणि मागवून कृतघ्नता दोष लागू नये म्हणून भक्त।कडून अखंड होत राहो, हीच श्री दत्तात्रेय चरणी विनम्र प्रार्थना आहे. आणि सर्व दत्तभक्त या दिव्य शक्तीच्या लाभाने लाभान्वित व्हावेत हीच सदिच्छा!

श्रीदत्तभावसुधारसस्तोत्रम् हे एक अद्भुत प्रासादिक स्तोत्र आहे. याच्या नियमित पठाणाने श्री गुरुचरित्र पाठणाचे फळ आहे.

स्तोत्र हे भक्तिमार्गांतील एक प्रभावी साधन आहे.* विष्णुसहस्रनामांत भगवंताला स्तोत्रप्रिय असे म्हटले आहे. परमेश्वराला त्याची स्तुति आवडते. अशा स्तुतीने ईश्वरप्रसाद पावलेल्या गजेंद्र, पुष्पदंत आदि भक्तांची यादी मोठी आहे. श्रीदत्तभावसुधारस हे स्तोत्र हे श्रीमहाराजांच्या गरुडेश्वरांतील अंतिम चातुर्मासात प्रकट झालेले आहे. श्रीदत्तप्रभूंची श्रीमहाराजांनी पन्नास एक स्तोत्रे केली आहेत. त्यांतील विशेष प्रभावशाली स्तोत्रांत या स्तोत्राची गणना करावी लागेल. अतिशय सुलभ संस्कृत भाषेंत याची रचना आहे. भावानुरूप विविध वृत्तांच्या योजनेने हे गेय झालेले आहे. श्रीमहाराजांच्या भक्तिरसार्द्र अंतःकरणातून ह्याचा उद्गम असल्याने हे भक्तिरसाच्या अमृताने रसरसलेले आहे. ह्या स्तोत्राच्या केवळ आवर्तनांतून झंकारणाऱ्या नादलहरींतच पाठकाचे चित्त भावभक्तीच्या रसाने संपृक्त करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांतच त्यांतील शब्दांचा आशय आकलन झाला तर ते चित्त तदाकार होईल यांत काय आश्चर्य? असे हे दत्तभक्तीच्या अमृतधारांची वृष्टी करणारे स्तोत्र असल्याने दत्तभावसुधारस हे नांव अन्वर्थक आहे हे वेगळे सांगायला नको. यथाशक्ति यथामति या स्तोत्राचा भावार्थ क्रमशः पाहूं या.

स्तोत्राचा पहिला श्लोक मंगलाचरणात्मक असून त्यांत श्रीदत्तात्रेयांच्या स्वरूपाचे वर्णन आहे.

दत्तात्रेयं परमसुखमयं वेदगेयं ह्यमेयं
योगिध्येयं हृतनिजभयं स्वीकृतानेककायम्॥
दुष्टागम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवन्द्यं
वन्दे नित्यं विहितविनयं चाव्ययं भावगम्यम् ।।१।।

दत्तात्रेयं वंदे हे मुख्य वाक्य आहे. इतर सर्व द्वितीया विभक्तीचे शब्द दत्तात्रेयाची विशेषणे आहेत. म्हणजेच श्रीदत्तप्रभूंच्या गुणवर्णनपर आहेत. परमसुखमयं अमेयं नित्यं अव्ययं या विशेषणांतून परमब्रहमाची स्वरूपलक्षणे सुचविली आहेत. सच्चिदानंदस्वरूप सनातन असीम आणि अक्षय अशा दत्तात्रेयांस वंदन असो. ह्या विशेषणांतून श्रीस्वामीमहाराज, श्रीदत्तप्रभूंचे शुद्ध ब्रह्मस्वरूप सुचवीत आहेत.

भाव+गम्य( भक्तीनेच गंवसणारा) दुष्ट+अगम्य (दुष्टांना न आकळणारा), स्वीकृता+अनेक+काय (कार्यानुरूपअनेक शरीरे धारण करणारा), वितत+विजय (त्रैलोक्यांत कीर्ति पसरलेला), हृतनिजभयं (आपल्या भक्तांचे भय निवारण करणारा), विहित+विनयं (शरणागतांचे संरक्षण करणारा आणि म्हणूनच), देव+दैत्य+ऋषि+वन्द्यं (सुरासुरांना आणि ऋषींनासुद्धां वंदनीय असणारा) ही सर्व लक्षणे सगुण ब्रह्माची आहेत. वेदांताच्या परिभाषेत यांना तटस्थ लक्षणें म्हणतात.

श्रीदत्तप्रभू हेच निर्गुण, निराकार, अखंडैकरस, सच्चिदानंदस्वरूप ब्रह्म आहेत. तेच भक्तांच्या भावानुरूप आपल्या मायेच्या गुणांचा अंगीकार करून आपल्या सम्पूर्ण ऐश्वर्यासहित साकार होतात. दुष्टांचे निर्दलन आणि सुष्टांचे पालन हे आपले अनंत युगीचे ब्रीद सांभाळतात. असा या श्लोकाचा भावार्थ. “सगुण निर्गुण एकु गोविंदु रे” हा श्रीज्ञानेश्वर माउलींचा सिद्धांतच श्रीस्वामी महाराजांनी इथे सूचित केला आहे.

॥नमो गुरवे वासुदेवाय॥


श्री दत्तभावसुधारस स्तोत्र माहिती समाप्त