संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्रे घोरकष्टोद्धरण स्तोत्र
‘घोरकष्टोद्धारणस्तोत्र’ या नावामध्येच या स्तोत्राचे फलीत आहे. ‘घोर+कष्ट+उद्धार’ अशी याची फोड केल्यास, असे लक्षात येते की मनुष्य जन्म हाच मुळी, पाप आणि पुण्य याच्या संमिश्रणातून साकार होतो. अशा ‘मनुष्य’ जन्माला आल्यानंतर. या ‘जन्म आणि मृत्यू’ या चक्रात अखंडपणे फिरताना होणार्या ‘घोर’ कष्टाची जाणीव झाल्यामूळे आणि यातून सुटण्याची जीवाची असहाय्यता लक्षात आल्यामूळे होणारी जीवाची ‘तडफड’ पाहून अतिशय करूणा आल्यामूळे स्वतः प. पू. श्री सदगुरु भगवान श्री श्रीपाद वल्लभ स्वरूप प. प. श्री वासूदेवानंद सरस्वती, श्री टेंब्येस्वामी यांनी या स्तोत्राची रचना केली आहे.
या दृष्टीने पाहू गेल्यास या स्तोत्राचे फलीत अगोदर पाहू यात.
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं |
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ||५||
श्रीगुरूमुखातून मिळालेल्या या स्तोत्राच्या पठणाने सद-धर्माविषयी प्रेम, सु-मति (सद्-बुद्धी), भक्ति, सत्-संगती याची प्राप्ति होते. त्यामूळे याच देहात भुक्तिं म्हणजेच सर्व ऐहिक आणि पारलौकिक कामनांची पुर्तता झाल्यामूळे, अंतिमतः ‘मुक्तिं’ या चतुर्थ पुरुषार्थाचा लाभ होतो. म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाची पुर्तता होऊन “भाव आसक्तिं च आखिल आनंद मूर्ते” रुपी, श्रीदत्तात्रेय-आनंद स्वरुपाची, म्हणजेच ‘भक्ति’ या पंचम पुरुषार्थाची निश्चितपणे प्राप्ती होते.
श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||
अशा प्रकारे या पाच श्लोकाचे ‘नित्य’ पठण करणार्या कर्त्याचे, सर्वार्थाने ‘मंगल’ होते. असा अनन्य भक्त, प्रभु श्री दत्तात्रेयाना अतिप्रिय होतो.
आता थोडक्यात अर्थ पाहू,
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव |
श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||
हे प. पू. प. प. श्रीपाद श्रीवल्लभा, देवाधीदेवा, ‘मी’ आपणास शरण आलो आहे. हा माझा भाव लक्षात (ग्राह्य मानून) घेऊन, आपण माझे सर्व क्लेश दूर करावेत आणि माझा या घोर संकटातून कृपया उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.
त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं |
त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||
हे प्रभो, विश्वमूर्ते, माझे माता-पिता-बांधव-त्राता आपणच आहात. आपणच सर्वाचे ‘योग-क्षेम’ पहाता. माझे सर्वस्व आपणच आहात. म्हणून आपण कृपावंत होऊन या संसाररुपी-भवसागररुपी घोर संकटातून माझा उद्धार करावा. हे प्रभो आपणास माझा नमस्कार असो.
पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम |
भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||
आपण आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, अशा पापयुक्त त्रिविधतापातून माझी सुटका करावी. माझ्या शारिरीक-मानसिक व्याधी, माझे दैन्य, भीति इ. क्लेश दूर करावेत आणि या घोर-कलीकाळापासून या घोरसंकटातून माझा उद्धार करावा. हे श्री दत्तात्रेया, आपणास माझा नमस्कार असो.
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता |
त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते |
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||
हे श्री अत्रिनंदना, आपणाशिवाय मला अन्य कोणी समर्थ ‘त्राता’ नाही. आपणासम दानशूर ‘दाता’ ही नाही. आपणासम भरण-पोषण करणारा ‘भर्ता’ ही नाही. हे आपण लक्षात घेऊन, हे शरणागताची कोणत्याही प्रकारे उपेक्षा न करणार्या देवाधिदेवा, आपण माझा या ‘घोर’ संकटातून, माझ्यावर ‘पुर्ण-अनुग्रह’ करून उद्धार करावा. आपणास माझा नमस्कार असो.
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् ।
सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते ।
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥
श्लोकपंचकमेतधो लोक मंगलवर्धनम् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥
“धर्मे प्रीतीम सन्मतिं” सर्व प्रकारच्या कष्टातून, हे प्रभो, तू मला सोडव. त्या सगळ्यातून का सोडव, तर मला “धर्मा बद्दल प्रीती, सन्मती, विवेकपूर्ण चांगली बुद्धी (वरील कष्ट दूर झाल्या नंतर) उत्पन्न होण्यास मदत होईल आणि तुझ्याबद्दलचा (पूज्य) भाव प्राप्त होईल. म्हणून मला वर दिलेल्या सर्व आपत्तीतून सोडव. पहिल्या ४ श्लोकांमध्ये व्यावहारिक गोष्टी आहेत, पण खरे इंगित म्हणजे व्यावहारिक कष्टातून सुटका झाल्याशिवाय सर्वसामान्य माणूस परमार्थात नीट लक्ष घालू शकणार नाही.
इति श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं
घोरकष्टोद्धरण स्तोत्र सम्पूर्णम् ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||
वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेले घोरकष्टोद्धरण स्तोत्र – संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१ वा चातुर्मास शके १८३३ (इ. स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला. कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. “आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?”, असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या. स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले. शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की, “माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे.” शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी “घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र” रचून त्यांना दिले. श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे. खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.