दत्त संप्रदाय साहित्यातील माणिकमोती
भाष्यकार- अभय आचार्य
श्री दत्तसंप्रदाय साहित्य व घटना यांचे तौलनीक रसग्रहण- माणिकमोती
१) दत्त महाराज भक्तांचे कार्य सिद्धीस नेतात पण नियतीचे चक्रास न बदलता !
दत्त माहात्म्यात आयु राजाच्या वेळी हुंडासूर हा राक्षस सर्व जगताला त्रास देत होता, आपला मृत्यू आयुराजाच्या मुला हाती आहे हे कळल्यावर त्याने त्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाला पळवून नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आयु राजा हा दत्तमहाराजांचा भक्त, तेव्हा त्या मुलाच्या रक्षणाकरिता दत्तमहाराजांनी सुदर्शनचक्राची योजना केली होती, हुंडासुराला केवळ संकल्पमात्रे नष्ट करू शकणारे दत्तमहाराज केवळ सुदर्शनचक्राच्या योजनेवर स्वस्थ का राहिले? यावर ते दत्तभक्त म्हणाले, थोडक्यात कुठेही आक्रमण न करता संरक्षण का? हाच प्रश्न आहे ना? हा प्रकार बऱ्याच जागी तुम्हीं पाहाल. गुरुचरित्रात चौदावा अध्याय तसाच आहे. यवनाला काही न करता केवळ बुद्धी बदल केला. पापकर्म करणाऱ्यांचा मृत्यू हा महाराजांच्या हातून कसा होईल? म्हणजे पुन्हा सद्गतीच मिळणार नाही का? पापाचरण केल्यावर ती कर्मे भोगायला प्रारब्धयोगानुसार मृत्यू यायला हवा. दत्त महाराजांच्या हातून मृत्यू यायला सुद्धा अनंत जन्मांची पुण्याई लागते. फार क्वचित असे योग आलेले दिसून येतात, दहाव्या अध्यायात दत्त महाराजांनी चोरांना मारले पण त्यांना सद्गतीच मिळाली यात संशय नाही. तेव्हा हुंडासूराच्या मृत्यूची योजना दत्त महाराजांनी आधीच केली होती, आयराजाचा पुत्र नहूष याने त्याला मारले. ह्या नियत चक्रात दत्तमहाराज बदल करत नाहीत. श्री गुरुदेव दत्त !
२) ध्यानासाठी शांतता व एकांत आवश्यक
समर्पक उपमा देऊन एखादी गोष्ट समजावणे हि थोरल्या महाराजांची हातोटी. दत्त महाराजांचे चोवीस गुरु कोणते आणि त्यांची वैशिष्ठ्ये सांगताना महाराजांनी एक गोष्ट सांगितली आहे. एकांतात ध्यान घडते हे समजावताना हि गोष्ट आली आहे. एका घरी एक कन्या विवाहायोग्य झाली होती. तिला वरावें या करिता काही विद्वान ब्राह्मण आले होते पण त्यापूर्वी तिच्या घरील सर्व मंडळी काही कामानिमित्त गावी गेली होती, घरी धेनु होती तेव्हा तिच्या सोबत कोणीतरी असले पाहिजे म्हणून या कन्येला मागे ठेवून सर्व गावी गेले होते. विद्वान ब्राह्मणांना पाहून तिने त्यांना आसन दिले आणि क्षेमकुशल विचारून त्यांच्या माध्यान्हाच्या तयारीस लागली. साळी कांडताना तिच्या हातात असलेल्या बांगड्यांचा आवाज होऊ लागला. तेव्हा तिला वाईट वाटले. ह्या आवाजाने आपल्या पूर्वजाना दूषण येईल असा तिने मनात विचार केला. म्हणून तिने केवळ दोन दोन बांगड्या हातात ठेवल्या तरी त्यांचा आवाज होऊ लागला. कंकण विरहित हात ठेवणे शास्त्रात निषिद्ध आहे तेव्हा याचा विचार करून तिने केवळ एकेक बांगडी हातात ठेवली. यामुळे आवाजही झाला नाही आणि शास्त्राज्ञेचे पालनही झाले. या गोष्टीचा आधार घेऊन महाराज म्हणतात,
बहू जमता होई भांडण | दोघांचेही होई भाषण | एक असता ध्यान घडे ||
बहू जमता होई भांडण, हे अगदी खरे आहे. स्व स्व पक्ष सिद्ध करताना किंवा आपले मत मांडताना आपण आपल्या आवाजाची पातळी, समोरच्याची योग्यता, मार्दव, नम्रता सर्व विसरून बोलत राहतो. दोघे मित्रही असलो तरी विषयांना तोटा नसतो मात्र एक असताना ध्यान घडू शकते. शकते अशाकरिता म्हणतो आहे कि विषय चिंतनाची सवय असल्याने हे सहज शक्य होत नाही. दत्त महाराज हे सर्वांचे आचार्य तेव्हा त्यांनी ह्या विषयांपासून अभय द्यावे हि प्रार्थना करीत आहे.
३) दत्त उपासक व आत्महत्या
दत्त पुराणात कुठेही आत्महत्येचा उल्लेख दिसत नाही. प्रचंड त्रास झाला तर काकुळतीला येऊन देवाची प्रार्थना केलेली दिसून येते. दत्त पुराण आणि ओघाने दत्त माहात्म्यात प्रार्थना केल्याचे असे अनेक प्रसंग आहेत. दत्त माहात्म्यात शेवटचे टोक गाठणारा एकमेव प्रसंग म्हणजे मदालसा या गंधर्व कन्येला पातालकेतू राक्षसाने पळवून आणले आणि कामोपभोगाचा त्याचा हेतू लक्षात घेऊन मदालसा म्हणाली, विवाह न होता आमच्या वंशात पुरुष संबंध होऊ शकत नाही तेव्हा याचे उल्लंघन केल्यास मी प्राणत्याग करेन, यावर राक्षसाने मुहूर्त शोधून लग्नाची तयारी केली. राक्षसाची तयारी बघता तिने प्राणत्याग करण्याचे ठरविले आणि तेव्हड्यात तिथे कामधेनू प्रकट झाली. कामधेनू म्हणाली, एक वीर येऊन त्या राक्षसाचा निःपात करेल काळजी नसावी. असा आततायीपणा करू नकोस.
ईश्वरावरील श्रद्धा हि कोणत्याही संकटाला परतवू शकते मात्र विश्वास हवा. गुरुचरित्रात दोन उदाहरणे अशी आली आहेत. आठव्या अध्यायात माता आणि मंदमति असा सुत नदीत प्राणत्याग करावा या हेतूने गेले असता श्रीपादश्रीवल्लभ दत्त महाराज तिथे होते. ह्या महादोषाला का सामोरे जात आहात? असे म्हणून त्यांनी प्रदोष व्रताची कथा सांगितली. महाराजांच्या आशीर्वादाने तो मतिमंद मुलगा महाज्ञानी झाला. तेराव्या अध्यायात उदरव्यथेच्या विप्राने आत्यंतिक दुःखाने प्राणत्याग करण्याचे ठरविले तेव्हा श्रीनृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज तिथे होते, त्यांनी आत्महत्या हा महादोष सांगत त्याची व्यथा नाहीशी केली. ब्राह्मणाने आत्महत्या केल्यास दुहेरी दोष आहे, एक तर जीवहत्या आणि दुसरा ब्रह्महत्या.
मात्र आपल्या त्रासामुळे जर कोणी या टोकापर्यंत जात असेल तर खरोखरच आत्मचिंतन करायची गरज आहे हे नक्की . आपल्या हव्यासापोटी किंवा आत्यंतिक लोभापोटी आपण अनेकदा दुसऱ्यांना प्रचंड त्रास देत असतो. याची जाणीव आपल्याला होत नसली तरी त्या त्रासलेल्या जीवांचे अनन्वित हाल होतात आणि त्या समोरच्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्यास नंतर कैक जन्म ते आपल्याला दुःखदायक ठरते . गुरुचरित्रात शतद्रव्य घेतले आणि परत केले नाही म्हणून अनेक जन्मी पिशाच्च संततीचा नाश करीत होता. देऊ नंतर, काय घाई आहे अशा स्वरूपाच्या वागणुकीने आपले बिघडत नसले तरी ज्याचे ते पैसे आहेत तो परत कधी मिळतील याची आशेने वाट पाहत असतो आणि दरम्यान मृत्यू झाल्यास कैक जन्मात असे दुःख वाट्याला येते.
स्वतःला संपविणे हा कोणत्याही दुःखावरचा उपाय नाही, दत्त महाराजांच्या उपासनेने अनेक अशक्य गोष्टी लीलया घडून येतात. काही अशक्य वाटणारा प्रश्न पडल्यास प्रश्नावलीचा आधार घ्यावा. थोरल्या महाराजांची हि प्रश्नावली आजही अनेक प्रश्नांवर रामबाण उत्तर देत असते.
४) अन्न ग्रहण व दत्त संप्रदायिक साहित्य
गुरू चरित्र
गुरुचरित्रात परान्न दोष सांगितले आहेत, त्यामुळे होणारे तोटे लक्षात घेऊन आपण परान्न टाळावयास हवे पण सध्या हे बऱ्याचदा शक्य होत नाही. कोणाकडे अन्नग्रहण करावे आणि कोणाकडे करू नये याचे काटेकोर नियम गुरुचरित्रात सांगितले आहेत. अन्न हे दोष अथवा वासना वहनाचे कार्य करते आणि याची प्रचिती नेहेमी येते. सांप्रत काळात परान्न हा भाग कोणी पाळत नसले तरी त्याचे दूरगामी परिणाम हे नकारात्मकच दिसून येतात. का असं सांगितलं असेल? कोणाकडे केवळ जेवण्याने असा काय तोटा किंवा नुकसान होते? कैक उदाहरणे यादाखल देता येतील. नकारात्मक आणि सकारात्मक देखील.
थोरल्या महाराजांच्या चरित्रात एक कथा आहे. ब्रह्मावर्तास आप्पा खाडिलकर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला एकदा रक्ताची हगवण सुरु होऊन तो फार अशक्त झाला. त्या वेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला कि तुम्ही पंचपक्वांन्ने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरवून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेऊ घातले. याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. थोरले महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते, त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी हि अवस्था झाली आहे. तू यातून बरा होशील असे दिसत नाही. यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य. शेवटी काही दिवसात त्याचे दम्याने देहावसान झाले. हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम.
दत्त माहात्म्यात विष्णुदत्त ब्राह्मणाच्या घरी जडमूढ असा पुत्र जेवला तेव्हा,
सतीचे हाताने मिळता अन्न | तयाचा भ्रम गेला निघोन ||
असे म्हटले आहे. हा अन्नाचा सकारात्मक परिणाम. प्रत्यक्ष दत्त महाराजांना विष्णुदत्त ब्राह्मणाकडे भोजनाचा योग आला, दत्त महाराजांना आग्रहाने जेऊ वाढल्याचे फळ हे मोक्षस्वरूप होते, यापेक्षा अधिक कोणते फळ असेल? आलेल्या अतिथीला केलेले आनंदाने केलेले अन्नदान हे आपल्या पापनिष्कृतिकरिता उपयुक्त ठरते.
५) माणिकमोती
दत्त माहात्म्यात सातव्या अध्यायात योग्या योग्य द्यावे l हे सर्वज्ञा काय सांगावे l असे कार्तवीर्याने दत्त महाराजांना म्हटले आहे. दत्त महाराज हे सर्वज्ञ आहेत भक्तांना काय द्यावे हे भक्तांपेक्षा त्यांना चांगले कळते आणि त्यामुळे कार्तवीर्याने काही मागायच्या आधी सर्व भार त्यांच्यावर ठेवला. थोरल्या महाराजांच्या त्रिशति गुरुचरित्र काव्यात दुसऱ्या शतकाची सुरवात याच (योग्या योग्य द्यावे या) उक्तीने झाली आहे.
जो भगवान दत्तात्रेय भजकांचे दुर्दैव नाहीसे करतो, त्रिविध पापताप नष्ट करतो, जो जिज्ञासू साधकांना व परिव्राजकांना वैराग्य, ज्ञान आणि भक्ती देतो, प्रणव हे त्याचे अभिधान आहे त्यामुळे प्रणवाचे जपानुष्ठान करणाऱ्यांना अविद्या, काम, कर्मांपासून संरक्षितो.
स्वामी महाराजांनी केवळ दुर्दैव या एका शब्दात सर्व संसारतापांचे वर्णन केले आहे. दुर्दैव नाहीसे करतो यात सर्व आले.
दत्त महाराजांकडे काही मागावयाचे असल्यास गुरुचरित्रातील नंदीनामाचे उदाहरण अवश्य अभ्यासावे. नंदीनामाचे कुष्ठ गेले पण थोडे जांघेवर शेष राहिले, मनातील संदेहामुळे हे झाल्याचे सांगून गुरुमहाराज म्हणाले, हे ब्राह्मणा हा परमात्मा आहे या बुद्धीने माझी स्तुती कर. त्या स्तुतीने तुझी शुद्धी होईल. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, स्तुतीकरिता मला अक्षरलिपीचेही ज्ञान नाही. तेव्हा दत्त महाराजांनी त्या नंदीनामाच्या जिव्हेवर अभिमंत्रित भस्म प्रोक्षण केले. त्यानंतर तो ब्राह्मण कवित्वाने महाराजांची स्तुती करता झाला.
या स्तुतीमध्ये नंदीनामा म्हणतो हे नाथ ,माझ्याठिकाणी असलेल्या षड्रिपूंचा नाश कर पण हे तुला शक्य न झाल्यास त्यातील एका कामाला नाहीसा कर त्यानंतर बाकीचे पाच आपोआप नष्ट होतील. कारण हे बाकीचे पाच कामोद्भव अर्थात त्यापासून उत्पन्न झालेले आहेत.
तात्पर्य काय तर मनुष्याच्या अविद्येचा नाश झाला कि योग्य ते मागणे होते आणि गुरुमहाराज योग्य तेच पाहून देतात,
श्री गुरुदेव दत्त !
भाष्यकार- अभय आचार्य
६) माणिकमोती – श्री क्षेत्र गाणगापूर येथील मठ
श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराज हे गाणगापूर येथे असताना तेथील स्थानिक राजाने त्यांना प्रार्थना करून राहण्याकरिता मठ दिला . हा मठ म्हणजे बांधकाम केलेली वास्तू होती. मात्र राजाने दिलेला हा मठ अगदी ऐसपैस असावा. गुरु राहिले तया स्थानी l मठ केला शृंगारोनी (अध्याय २३) असे त्यावेळचे वर्णन आहे. महाराजांनी भक्ताच्या इच्छेखातर होकार देत तिथे राहण्याचे मान्य केले .
अडतिसाव्या अध्यायात या मठाच्या कोठीघराचे अप्रत्यक्ष वर्णन आहे.
ब्राह्मण मनी विचारिती l मठी सामग्री असे आयती l स्वयंपाक आता करविती l आम्हा निरोपिती याची गुणे ll
इतक्या माणसांचा शिधा असणारे कोठी घर हे मोठेच असले पाहिजे. गुरुमहाराज हे जिथे आसनस्थ होत त्या जागी पुष्कळ माणसे बसतील इतकी जागा असावी . सात शिष्य दीपावली नंतर गुरुमहाराजांकडे आले तेव्हा ते आणि इतर अनेक भक्त तिथे होते. म्हणजे जागा ऐसपैस असावी. या खेरीज सायंदेव ब्राह्मण गुरुमहाराजांना पंधरा वर्षांनी भेटावयास आला तेव्हा गुरुमहाराजांनी समस्त शिष्यांसह आपल्या पंगतीस बसवून घेतले.
भक्तवत्सल गुरुमूर्ती | तया विप्रा आपुले पंक्ति | समस्त शिष्यांहून प्रीती | ठाव देती आपुले जवळी || ( अध्याय ४१ )
तंतुकाने या मठाचे अंगण झाडल्याचा उल्लेख आहे . राजांगणा झाडी विचित्रा | नमस्कारी दुरोनी || (अध्याय ४४ ) गुरुमहाराज नित्य मठात मात्र राहत नसत . संगमावरून अनुष्ठान आटोपून आले कि ते यायच्या वेळी अनेक जण मठात दर्शनार्थ गर्दी करत . नंदीनामा ब्राह्मण शेतकुष्ठाने व्यापून चंदलापरमेश्वरी देवीचा निरोप झाल्याने आला तेव्हा महाराज संगमावर गेले होते . इतुकिया अवसरी | श्रीगुरु आले साक्षात्कारी | ग्रामलोक व्दिजाते वारी | दूर राहे सन्मुख || (अध्याय ४५). शिष्यांखेरीज गावातील अनेकजण या वेळी मठात होते
गुरुमहाराजांच्या मठाची वास्तू आज नसली तरी त्या वेळच्या कल्पनेने आपण एका अनोख्या विश्वात पोहोचतो. इथे गुरुमहाराज आले असतील, बसले असतील, त्या लीला कशा झाल्या असतील ? सर्वच रम्य आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेले. गुरुचरित्र हे एक मननाचे साधन आहे, या योगे आपण सर्व लीला प्रत्यक्ष अनुभवू शकतो. श्री गुरुदेव दत्त !
भाष्यकार- अभय आचार्य
७) माणिकमोती
गुरुचरित्रात अप्रत्यक्ष पापांपासून गुरुमहाराजांनी उद्धार केल्याची कैक उदाहरणे आहेत. आता अप्रत्यक्ष पाप म्हणजे आपल्या अज्ञानात घडलेले पाप. अर्थात काहीही म्हटले तरी पाप ते पापच. ते मग प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष.
याचे उदाहरण पाहू गेल्यास बाविसाव्या अध्यायात गुरुमहाराज एका अत्यंत गरीब अशा ब्राह्मणाघरी भिक्षेला गेले. गृहस्वामिनीने यथोचित आदरसत्कार करून म्हटले, “यजमान भिक्षेसाठी गेले आहेत तेव्हा ते येताच आपणास वाढते”. यावर गुरुमहाराज म्हणाले, “दारात म्हैस आहे तेव्हा तिचे दूध दिल्यास पुरेसे होईल”. गृहस्वामिनी म्हणाली, “ती दंतहीन वृद्ध वांझ म्हैस असून तिचा उपयोग आम्ही मृत्तिका वाहून नेण्याकरिता करतो. आज कोणी तिला मृत्तिकेसाठी नेण्यास न आल्याने ती येथे दिसत आहे”. यावर गुरुमहाराजांनी तिचे दूध काढून देण्यास सांगितले आणि गुरुवाक्यावर विश्वास ठेवत त्या स्त्रीने दूध काढले. दोन भांडी भरून दूध आले. त्या स्त्रीने अत्यंत आश्चर्याने आणि आनंदाने ते दूध तापविले आणि गुरुमहाराजांना पिण्यास दिले. प्रसन्न होऊन संतोषाने गुरुमहाराज आशीर्वाद देऊन निघून गेले.
आता यात अप्रत्यक्ष पाप म्हणजे वृद्ध अशा जनावराकडून केलेल्या श्रमावर उपजीविका. दोन्ही बाजूने गुरुमहाराजांनी कल्याण केले, त्या प्राण्याला होणाऱ्या कष्टापासून सोडवले आणि उद्धार केला. गुरुमहाराजांचे दर्शन कोणत्याही जन्मात होवो, सद्गती निश्चित आहे आणि ब्राह्मणाकडून होत असलेले अप्रत्यक्ष पाप दूर केले. खेरीज दारिद्र्य दोष घालविले. गुरुमहाराज केवळ ऐहिक भोग देत नाहीत तर उद्धारात येणारे पापरूपी अडथळे नाहीसे करतात.
श्री गुरुदेव दत्त !
८) माणिकमोती- वाडीकर मंडळी म्हणजे दत्तस्वरूपच
गरुडेश्वरी थोरल्या महाराजांचा मुक्काम असताना नृसिंहवाडीचे काही पुजारी आणि त्यांच्या समवेत दोन वयोवृद्ध स्त्रिया अशी मंडळी दर्शनार्थ गेली. नृसिंहवाडीतील पुजाऱ्यांना हे आपले थोरले महाराज म्हणून एका तह्रेचा आपुलकीचा अभिमान वाटे. त्याचबरोबर थोरले महाराज नृसिंहवाडीच्या पुजारीवर्गाला साक्षात दत्तप्रभू असे समजत असत. असो. एकदा त्या दोन वयोवृद्ध स्त्रिया थोरल्या स्वामी महाराजांजवळ गेलेल्या पाहून तेथे उपस्थित असलेल्या एका साधुमहाराजांना फार राग आला आणि ते त्या वृद्ध स्त्रियांना पुष्कळ टाकून बोलले. हे स्वामी महाराजांना समजताच त्या साधुमहाराजाना ते असे म्हणाले कि हि वाडीकर मंडळी दत्तस्वरूप असून स्त्रिया ह्या अनुसूया माता आहेत. त्यांचा अपमान येथे व्हावा हि फारच वाईट गोष्ट ! आधी त्यांची माफी मागा.
हि कथा सांगून आमचे वयोवृद्ध काका म्हणाले, कालच प्रसार माध्यमातील फेसबुकवर ह्या पुजारीवर्गाच्या अयोग्य वर्तनाबद्दल लेख आला होता. प्रत्येक व्यवसाय किंवा पेशामध्ये बरे वाईट सर्व प्रकार असतात, सर्वच वाईट म्हणून कसे चालेल? पण चांगले असणारे किंवा अपवाद असणारे आपल्या पूजेकरिता असायलाहि दत्त महाराजांची उपासना तितकीच श्रद्धेने असावी लागते. आजही अत्यंत तन्मयतेने पूजाअर्चा करणारा पुजारी वर्ग आहे, त्यांच्याकरवी केलेली उपासना हि दत्त महाराजांना मान्य होतेच होते मात्र त्यांचे पौरोहित्य आपल्याला मिळायला आपली उपासना कितपत आहे ते पहा म्हणजे झाले.
श्री गुरुदेव दत्त !
९) माणिकमोती- लातूर येथील प्राप्त गुरुचरित्र प्रतीची वैशिष्ट्ये
लातूर म्हणजे पूर्वीचे अलक्षपूर, इथे उत्खननात मिळालेली गुरुचरित्राची प्रत हि विस्तारित स्वरूपाची असून याला गुरुचरित्र परमकथामृतम म्हटले जाते. अकरा पंचक, पंचावन्न अध्याय असे या गुरूचरित्राचे स्वरूप आहे. या गुरुचरित्राचा विस्तारित भाग सध्या प्रचलित गुरुचरित्रापेक्षा बराच मोठा आढळतो आणि बहुधा हा विस्तार अध्यायाच्या शेवटास आहे. विस्तारीत भाग म्हणजे नेमके काय ? एक उदाहरण घ्यावयाचे झाल्यास गुरुचरित्राचा दहावा अध्याय घेऊ. या अध्यायात सध्या प्रचलित गुरुचरित्रात शेवटी वल्लभेश ब्राह्मणाने इच्छा भोजन घालून आपल्या नवसाची फेड केली आणि अश्विन वद्य द्वादशीला श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज हे गंगेत अदृश्य झाले हा उल्लेख येऊन अध्याय समाप्त होतो. मात्र गुरुचरित्र परमकथामृतात वल्लभेश ब्राह्मणाबरोबर तो जीवदान मिळालेला तस्कर देखील कुरवपूर यात्रेला आल्याचा उल्लेख आहे.
निघाले पुढे उभयता कुरवपुरासी ll७५ ll कृष्णातीरी दोघेही येती l नदी एकमेका आधारे ओलांडिती l पैलतीरी जाती भक्तगणे परिचिति l तयासवे संवादी रमला स्वये ll ७६ ll
खाली गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराज समाधी अवस्थेत असल्याचे भिंतीतून आरपार चित्र त्याला दिसले, सभोवताली काही पार्षद गण सेवेसाठी उभे होते, आश्चर्य म्हणजे वाटेत बरोबर असलेले तस्कर वल्लभेशाला तिथे गण म्हणून उभे दिसले आणि दत्त महाराज पतितोद्धारक कसे आहेत याची खूण पटली. भगवंताच्या या लीलेने तो नतमस्तक झाला. या परमकथामृतमच्या दहाव्या अध्यायात सिद्धांनी नामधारकाला एक सिद्धांत सांगितला आहे.
श्रींचा क्रोध आणि वर l दोन्हीचा फल एकची प्रकार ll
दत्त महाराजांचा क्रोध आणि कृपा दोघांच फळ एकच (मात्र कृपा अधिक श्रेयस्कर !)
श्री गुरुदेव दत्त !
१०) माणिकमोती- सद्गुरुंचे निजानंद गमन
चरित्राचा एकावन्नावा अध्याय हा गुरुमहाराजांच्या निजानंदगमनाचा अध्याय. गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय हा त्या त्या अध्यायातील वैशिष्ठ्याच्या नावाने ओळखला जातो अपवाद म्हणजे हा एकावन्नावा अध्याय. अनेक प्रतींमध्ये याची अनेक नावे दिसून येतात. मुळतापी प्रतीत — गुरुसमाधी नाम विख्यात– असे नाव आहे तर नृसिंहवाडी प्रतीत — गुरुमूर्ती अदृश्य रूपं नाम — असे नाव आहे. मनातील भावाप्रमाणे भक्तांनी याचे नामकरण केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुष्पासनावर बसून महाराज हे गंगेत गुप्त झाले आणि नंतर पैलतीरावर ते जाताना दिसले या उल्लेखावरून अनेक समर्पक नावे या अध्यायाची ठेवलेली दिसून येतात. मात्र समाधी हे नामकरण थोडेसे मनाला बोचणारे वाटते कारण गुरुमहाराजांनी अवतार समाप्ती केलेली नाही, महाराज तेव्हाही होते आणि आजही आहेत. अदृश्य रूपात आहेत इतकेच म्हणून समाधी हे नाव तितकेसे योग्य वाटत नाही. ह्या अध्यायाला आपण पोहोचलो कि काही काळ आपल्यालाही वाईट वाटल्यावाचून राहवत नाही, गुरुमहाराज आता जाणार या जाणिवेने फार वाईट वाटते. काही दिवसांच्या वाचनाने जर आपल्या मनाची हि अवस्था होत असेल तर त्यावेळी सर्व भक्तांना किती वाईट वाटले असेल याची कल्पना करावी. मात्र ह्यावर एक सोपा उपाय म्हणजे ग्रंथ पुन्हा उलटून सरळ ठेवा, गुरुमहाराजांना नमस्कार करून प्रार्थना करा आणि पुन्हा पहिले पान उलटून वाचनास सुरुवात करून गुरुमहाराजांचे सान्निध्य अनुभवा.
११) माणिकमोती- श्री दत्त महाराज व आदी शंकराचार्यांचे दत्त स्तवराज
आदि शंकराचार्यांनी दत्त स्तवराज हे दत्त महाराजांच्या स्तुतीपर स्तोत्र रचले आहे. दत्तात्रेय पंचरत्नात याचा समावेश होतो. दत्तात्रेय पंचरत्न म्हणजे दत्त महाराजांची पाच निवडक स्तोत्रे असून यात दत्त कवच, दत्त स्तवराज, दत्त हृदय स्तोत्र, दत्त सहस्त्र नाम आणि अवधूत गीता हि स्तोत्रे येतात. या सर्व स्तोत्रांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे हि सर्व स्तोत्रे संवादरुपी आहेत. शिव पार्वती संवादात दत्त कवच, शुकाचार्य आणि शिव संवादात दत्त स्तवराज, शिव पार्वती संवादात दत्त हृदय स्तोत्र, दास आणि मुनी संवादात दत्त हृदय स्तोत्र, आणि दत्त महाराजांनी कार्तिकेयाना केलेला उपदेश म्हणजे अवधूत गीता आहे.
आदि शंकराचार्यांनी दत्त स्तवराज हे दत्त महाराजांच्या स्तुतीपर स्तोत्र रचताना व्यास महर्षींचा उल्लेख केला आहे . शुकाचार्य हे व्यासपुत्र तेव्हा भगवान महादेवांना ते म्हणतात हे देवदेव दत्त महाराजांहून कोणी श्रेष्ठ नाही हे पूर्वी व्यासांनी सांगितले आहे तेव्हा त्यांचे माहात्म्य मला सांगावे. यावर भगवान महादेव शुकाचार्याना हे माहात्म्य सांगतात.
भगवान महादेव म्हणाले,
यस्य स्मरणमात्रेण मुच्यते सर्व बंधनात् ll
दत्त महाराजांच्या केवळ स्मरणाने मनुष्य सर्व बंधनातून मुक्त होतो.
नारायणं शिवं शुध्दं दृश्यदर्शन वंदितम् ll
नारायण आणि शिव तेच असून समस्त दृश्य विश्वाने त्यांना वंदन केले आहे.
पुढे या स्तुतीत —
एतत्सर्वं कृतं तेन दत्त इत्यक्षरव्दयम् ll
या पदाची वारंवारता आली आहे, याचा अर्थ — ज्याने दत्त हि दोन अक्षरे (भक्तिभावाने) उच्चारली त्याने —- असा होतो. भगवान महादेव म्हणतात या दोन अक्षरांच्या उच्चाराने अर्थात जपाने, सर्व नद्यांत स्नान केल्याचे पुण्य मिळते, सर्व तीर्थक्षेत्रात दर्शनाचे पुण्य मिळते, सर्व व्रते, दान, अष्टांग योग, तप केल्याचे पुण्य मिळते. सर्वदेव नमस्कारं — दत्त नामस्मरणाने सर्व देवांना नमस्कार केल्यासारखेच आहे. या स्तोत्रात दत्त महाराजांना सुराध्यक्ष हि उपाधी आहे म्हणजे सर्व देवांचे अध्यक्ष. आचार्यांच्या इतर वाङ्मयापेक्षा हे स्तोत्र उच्चारण करण्याला अर्थात म्हणायला फार सोपे आहे आणि स्तोत्र महिमा पाहता दत्त भक्तीमध्ये अग्रेसर आहे.
आपल्या पहिल्या श्वासाबरोबर आपल्या हृदयात वास करणार्या दत्त महाराजांच्या सामर्थ्याची प्रचिती या स्तोत्ररूपी स्तुतीने दत्त भक्तांनी अवश्य घ्यावी.
श्री गुरुदेव दत्त !
— अभय आचार्य
१२) माणिकमोती- महाराज आपल्या भक्तांच्या खुणा प्रेमाने स्वीकारतात
विजापूरच्या बादशहाची मुलगी जन्मांध होती. एके दिवशी बादशहा चिंतेत बसला असताना एका मुसलमान साधूने सांगितले कि अमरापूर (नृसिंहवाडी) येथे हिंदू साधू श्री नृसिंहसरस्वती यांचे जागृत स्थान आहे. तेथे मुलीस घेऊन जा, सेवा कर, तुझे काम होईल. बादशहा कन्येला घेऊन नृसिंहवाडीला गेला, सेवा केली. मुलीस दृष्टी आली. बादशहाने नित्य दर्शन पाहिजे म्हणून नृसिंहसरस्वती स्वामी दत्त महाराजांना प्रार्थना केली. नंतर एक दिवस बादशहाला महाराजांचा दृष्टांत झाला किल्ल्याजवळ (विजापूरच्या) दोन्ही खंदकाच्या मध्यभागी अश्वत्थ वृक्षाखाली मी सदैव मूर्त स्वरूपात आहे. तेव्हा बादशाहाने तेथे नित्य पूजाअर्चेस सुरुवात केली.
ह्या विजापूरच्या बादशहाच्या भक्तिखुणा आजही नृसिंहवाडीला कायम आहेत. नृसिंहवाडीच्या मंदिराचे बांधकाम हे त्या काळाच्या बादशाही राजवटीतील त्यांच्या धार्मिक स्थानांप्रमाणे कळसरहित आहे. आजही मनोहर पादुकांवर घातल्या जाणाऱ्या वस्त्राला बनातीचे वस्त्र म्हणतात आणि त्याचा आकार हा बादशहाच्या आसनावर घातल्या जाणाऱ्या वस्त्राप्रमाणे असतो. त्याला सात पाकळ्या असतात. दत्त महाराजांच्या (उत्सव मूर्तीकडे अर्थात) स्वारीकडे आपण नीट निरखून पाहिल्यास महाराजांच्या डोक्यावरील जिरेटोप हा बादशाही काळातील शिरपेच वाटतो. दत्त महाराज हे आपल्या भक्ताच्या खुणा आजही प्रेमाने मान्य करताना दिसतात.