विठोबाचे पाय राहो अखंड – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 7
विठोबाचे पाय राहो अखंड । चित्ती अखंड श्रीपती हेची द्यावे ।।
ध्यानी, मनी, वनी असता सर्वकाळ । साधी काळ-वेळ याची परी ।।
नाम हे तारक साचार जीवाचे । सावता म्हणे वाचे सदा घेई ॥
मथितार्थ : या अभंगात सावता महाराजांनी नवविधाभक्तीपैकी नामस्मरण ही भक्ती सांगितली आहे. देवाचे सतत नाम मुखाने घ्यावे, या बाबतीत संत नामदेव म्हणतात, देवाचे नाव अमृताहुनी गोड आहे हेच सावता महाराज सांगतात, देवाचे नाव आपल्याला संसाररूपी सागरातून तारणार आहे, म्हणून आपण देवाचे नामस्मरण करावे, विठ्ठलाचे नाव घेण्यासाठी काळ वेळ यांचे बंधन नाही. सदा सर्वकाळ आपण मुखाने नाम घेऊ शकतो. जनाबाई म्हणतात “दळीता कांडिता तुज गाईन अनंता” हेच सावतोबाही सांगतात, देवाच्या नामस्मरणामध्ये सतत आपला वेळ घालवावा. या अभंगात संसारिक माणसाने कर्म करत असताना नामस्मरण करावे, कारण सर्व मानव जातीला भवसागर तरून जाण्यासाठी नामच उपयोगी पडणार आहे. अशाप्रकारचा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.