आमुची माळियाची जात – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -36

आमुची माळियाची जात – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -36

आमुची माळियाची जात । शेत लावू बागाईत ॥
आम्हा हाती मोट नाडा । पाणी जाते फुल झाडा ॥
शांती- शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥
सावताने केला मळा । विठ्ठल देखियेला डोळा॥
स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ॥

मथितार्थ —– या अभंगात सावता महाराज सांगतात की मी जातीने माळी आहे. मी शेती करतो आणि शेती करणे हा माझा व्यवसाय आहे. कृषिप्रधान देशातील हा शेतकरीच आहे सावतोबांना त्यांच्या शेतातील बहरलेला मळा पाहून अत्यानंद व्हायचा त्यांचा मळा हाच त्यांचा” देव” शेतीतील पिकांना मोटेने पाणी पाजल्याने फुलझाडे फुलली आहेत. शेवंती हे शांततेचे रूप आहे जाई जुईमध्ये प्रेम बरसले आहे प्रेम बहरले आहे. त्यांच्या मळ्यामध्ये विविध प्रकारच्या फुल झाडांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो या फुलझाडातच त्यांना त्यांचा विठ्ठल दिसतो माणसाला मिळालेले काम त्याने आनंदाने स्वीकारले तर मोक्ष आपोआप मिळतो हा संदेश त्यांनी दिला आहे स्वकर्मालाच म्हणजे स्वतःच्या कामालाच त्यांनी मोक्षाचा मार्ग म्हटले आहे.” श्रममेव जयते” हा मोलाचा विचार त्यांनी या अभंगात मांडला आहे. शेतातील फुलझाडे व इतर वनस्पती यावरून असे लक्षात येते की, सावता महाराजांना शेती करता करता आपल्या शेतातील आयुर्वेदिक वनस्पतीचा अभ्यास झाला असावा म्हणजे ते आयुर्वेदाचार्य असावेत. शेवटी त्यांना वाटते आपला मळा म्हणजे विठ्ठल. ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांनी सांगितलेला कर्मयोग महाराजांनी या अभंगात सांगितला आहे.

श्री .दत्ताञय संभाजी ढगे,
श्रीक्षेञ अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.